रोखठोक- राम लहर संपली! आता राम नाम सत्य है!

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश म्हणजे मोदी-शहा-फडणवीसांच्या पराभवाची सुरुवात आहे. चारशे पारचा नारा झूठा आहे व ‘राम लहर’ वगैरे काहीच उरली नसल्याचा हा पुरावा आहे. ‘आदर्श’ कारगिल घोटाळय़ावर मोदींपासून फडणवीसांपर्यंत चव्हाणांवर जोरदार हल्ले केले. शहिदांचा अपमान झाल्याचे बोंबलले. त्याच चव्हाणांच्या स्वागतासाठी फडणवीसांनी भाजप कार्यालयात सतरंजी अंथरली!

एकेकाळी महाराष्ट्र पुरोगामी विचार व विचारांवरील निष्ठेसाठी ओळखला जात असे. आज महाराष्ट्र बेइमानी, राजकीय बेडूकउडय़ा व घसरलेल्या राजकीय संस्कृतीसाठी ओळखला जात असेल तर या घसरणीस फक्त भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर भ्रष्टाचाराच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजप करीत आहे. ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे व ज्यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेसच्या विचारांवर पोसले ते अशोक चव्हाणही अखेर काँग्रेस सोडून भाजपवासी झाले. काँग्रेसच्या राजकारणातला एक सुसंस्कृत चेहरा म्हणून ते ओळखले गेले, पण ‘ईडी’ कारवाईच्या भयाने त्यांना काँग्रेस सोडून भाजपात जावे लागले. कारगिलमधील शहिदांच्या कुटुंबांसाठी राखीव असलेल्या मुंबईतील कफ परेड भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने एक 32 माळय़ांचा आलिशान टावर उभा राहिला. मूळ परवानगी पाच माळय़ांची होती, पण त्यावर भ्रष्टाचाराचा एक एक माळा चढवत गेले. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी या सगळय़ांनी त्या इमारतीत फ्लाटस् घेतले. स्वत: अशोक चव्हाण व त्यांच्या कुटुंबाचे चार ते पाच फ्लाटस् त्या इमारतीत होते. कारगिलच्या शहिदांसाठी राखीव असलेली ही ‘आदर्श’ इमारत म्हणजे भ्रष्टाचार व शहिदांचा अपमान असल्याची बोंब तेव्हा भाजपने मारली. या प्रकरणी अनेकांना तुरंगात जावे लागले. चौकशी समित्या नेमल्या. सीबीआय घुसली. संसदेत अमित शहा यांनी ‘आदर्श’ घोटाळय़ावर गुळण्या टाकल्या. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: नांदेडला येऊन ‘आदर्श’मधील घोटाळय़ाने कारगिलमधील शहिदांचा कसा अपमान झाला यावर प्रवचन झोडले. शहिदांचा हा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस या ‘आदर्श’ भ्रष्टाचारावर तापलेल्या तव्यावरील वाटाण्यासारखे ताडताड उडताना महाराष्ट्राने पाहिले. हा वाटाणा आता शांत झाला. देवेंद्र फडणवीस यांनीच अशोक चव्हाण यांचा प्रवेश भाजपात करून घेतला. इतके ढोंग, इतका खोटारडेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्यात भाजपने गेल्या काही काळात घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत!

महाविकास आघाडीत…

अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या बैठकांत या काळात उपस्थित राहिले. लोकसभेच्या जागावाटपांच्या चर्चांत ते सहभागी झाले. काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी ते बैठकांत भांडत होते. “आम्हाला आमचा पक्ष टिकवू द्या,” अशी त्यांची भूमिका होती. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे अन्य दोन नेते श्री. चव्हाण यांच्या कलानेच वागताना मी पाहिले. अनेक जागांवर चव्हाण काँग्रेससाठी हट्ट धरत, तेव्हा थोरात-पटोले त्यांना पाठिंबा देत. वंचित बहुजन आघाडीमुळे 2019 च्या निवडणुकीत आपला पराभव झाला. त्यामुळे या वेळी वंचितला सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी बैठकीत वारंवार सांगितले व महाविकास आघाडीत वंचितने सामील व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत राहिले. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहिले तेव्हा चव्हाण हे सर्वाधिक आनंदी झाले, पण त्यांच्या मनात वेगळेच काही चालले होते. त्या राजकीय व्यभिचाराची कल्पना त्यांनी कुणालाच येऊ दिली नाही. अशोक चव्हाण यांना  फोडल्याने काँग्रेसचे किती नुकसान झाले ते सांगता येत नाही, पण भाजपची उरलीसुरली इज्जतही मातीमोल झाली. ‘अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत,’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी घातला होता. आज त्याच ‘डीलर’शी फडणवीस यांना डील करावे लागले. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला अनैतिकतेचे सुतक लागले व ते त्यांच्या चेहऱयावर स्पष्ट दिसते. मुंबईतील भाजपचे नेते आशीष शेलार यांना पत्रकारांनी चव्हाण यांच्या आदर्श घोटाळय़ाविषयी प्रश्न विचारताच ते त्या प्रश्नकर्त्यावरच भडकले व मी तुम्हाला उत्तर देणार नाही, असे सांगून पळून गेले. महाराष्ट्रातील भाजपचा राजकीय कुंटणखाना बंद होण्याची ही सुरुवात आहे. 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ज्या ज्या मोठय़ा घोटाळय़ांवर भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घेरले व बदनाम केले ते घोटाळय़ांचे सर्व सूत्रधार आज भाजपच्या तंबूत आहेत.

ह छगन भुजबळ – महाराष्ट्र सदन घोटाळा

ह अजित पवार – सिंचन, शिखर बँक घोटाळा

ह अशोक चव्हाण – आदर्श घोटाळा

या तिन्ही नेत्यांना तुरंगात टाकण्याची भाषा फडणवीस व किरीट सोमय्यासारखे लोक करीत होते. त्यांचा खोटेपणा उघडा पडला. एक तर हे लोक भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच करीत होते किंवा भाजपात येताच हा भ्रष्टाचार स्वच्छ झाला. छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आता ‘ईडी’ला सापडत नाही, असे ईडीने न्यायालयात सांगितले. अजित पवार यांना त्यांच्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ मिळाली. मग आता आरोप करणाऱया फडणवीस व सोमय्या यांना कोणत्या चौकात चाबकाने मारायचे?

जमीन घसरली

भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली जमीन राहिलेली नाही. ते खरे सत्य आता उघड झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ‘चारशे पार’ जागा जिंकू हा मोदींचा बुडबुडा फुटला. एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदी यांना शहिदांचा अपमान करणाऱया चव्हाणांना भाजपात घ्यावे लागले. जिंकण्याची इतकीच गारंटी असती तर भाजपने त्यांच्या राजकीय कुंटणखाण्याचा असा विस्तार केला नसता. मोदी-शहांना खात्री आहे, ते निवडणुका हरत आहेत. त्यामुळे भ्रष्ट, गुंड, झुंड यांची मोट बांधून ते निवडणुका लढणार आहेत. हरण्याची भीती व त्यातून निर्माण झालेले वैफल्य इतक्या टोकाला गेले आहे की, ते दाऊदच्या टोळय़ांनाही भाजप कार्यालयात प्रवेश देतील व मूळ भाजपवाल्यांना त्या टोळय़ांसाठी सतरंज्या अंथरायला सांगतील. देशाचे चित्र व भाजपची सध्याची अवस्था तेच सांगतेय. देशातील कोणत्याही प्रश्नांचे निराकरण मोदी यांना करता आले नाही. पंजाब- हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडका मारीत आहे. त्यांना दिल्लीत येऊन सरकारला घेराव घालायचा आहे व हुकूमशहा सरकारने शेतकऱयांना सामोरे जाण्याऐवजी दिल्लीच्या सीमेवर भिंती उभ्या केल्या. रस्त्यांवर खिळे ठोकले. आता दिल्लीत ‘खंदक’ बनवून शेतकऱयांच्या भीतीने हे खंदकात लपतील की काय असेच वाटू लागले. निवडणुका जिंकण्याचे सामर्थ्य व तेज मोदी पक्षात उरले नाही. त्यामुळे देशभरातील भ्रष्टाचारी एकत्र करून ते ‘आकडा’ वाढवीत आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची लाट उसळेल व त्या लाटेवर स्वार होऊन निवडणुका जिंकू या भ्रमाचा भोपळादेखील फुटला. श्रीरामाच्या नावाने निर्माण केलेली कृत्रिम लहर 72 तासही टिकली नाही व भाजप पुन्हा अडचणीत आला. भाजप व त्यांचे ओढून निर्माण केलेले मित्रपक्ष 200 जागा तरी जिंकतील काय? याची खात्री संघाच्या लोकांना वाटत नाही. मोदी व त्यांचा पक्ष 190 पर्यंत थांबेल असे संघाचे सर्वेक्षण सांगते. 2024 नंतर भारताच्या राजकारणात मोठे बदल होतील, हे नक्की. भ्रष्टाचाऱयांना शुद्ध करून घेणारे व भ्रष्टाचारापासून ‘तुरंग’वास टाळण्यासाठी भाजप प्रवेश करणारे एकजात सर्व त्याच गुन्हय़ांसाठी तुरंगात जातील. तेव्हा हे सर्व लोक काय करणार?

निर्लज्ज व भंपक!

एक निर्लज्ज व कोणताही विधिनिषेध न बाळगणारा पक्ष म्हणून इतिहासात भारतीय जनता पक्षाची फक्त ओळख राहील. आपल्या राजकीय फायद्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी या लोकांनी राष्ट्रपती भवन, न्यायालये, निवडणूक आयोग कसे विकत घेतले तो सर्व तमाशा लोकांनी पाहिला, पण धर्माच्या अफूने गुंग झालेले लोक अजगरासारखे निपचीत पडून राहिले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना तुरंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले, भ्रष्टाचाराचे आरोप करून ज्यांना पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडले असे सगळे लोक आज भाजपात आहेत व फडणवीस त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यालयात सतरंज्या घालीत आहेत. यापेक्षा अध:पतन ते काय असू शकते? श्री. आडवाणींपासून महाराष्ट्रात माधव भंडारींपर्यंत भाजपची जुनी माणसे अडगळीत गेली व काल आलेल्या अशोक चव्हाणांना शुद्ध करून राज्यसभेवर घेतले. ‘राम लहर’ ओसरल्याचा हा सर्वात मोठा पुरावा. भाजपच्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था कशी आहे? महाराष्ट्राच्या भाजप कार्यालयात प्रवेशासाठी काही उपरे नेते व त्यांचे कार्यकर्ते आले.

“तुम्ही कुठून आलात?” नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याने त्या ठिकाणी चेहरा पाडून उभ्या असलेल्या एकाला विचारले.

“कुठूनही नाही. आम्ही भाजपमधलेच आहोत. कुठेही गेलेलो नव्हतो. भाजपच्या स्थापनेपासून इथेच आहोत व निष्ठेने काम करीत आहोत,” असे तो कार्यकर्ता उत्तर देतो.

“मग नुसते तोंडाकडे का बघत बसला आहात? लोक येताहेत. सतरंज्या अंथरा. पाहुण्यांच्या चपला सांभाळा. चहा-पाण्याची व्यवस्था बघा. चला निघा इथून!!”

हेच भाजपचे राम नाम सत्य आहे!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]