रोखठोक – श्रीमान मोदी व श्रीमान योगी!

भाजपच्या संत-महंतांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. हा अतिरेकच आहे. शिवाजीराजांनी स्वराज्य व लोकशाहीची सांगड घातली. त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी झुंज दिली. औरंगजेबासारखा शत्रू अंगावर घेतला. शिवाजी महाराजांनंतरही मावळे पंचवीस वर्षे झुंजत राहिले. हेच शिवचरित्र!

रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभे राहिले व मोदीभक्त भलतेच भावुक झाले. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. या भावुकपणातही शेवटी ढोंगच दिसले. मंदिर उद्घाटन सोहळय़ात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपतींच्याच घोडय़ावर चढवले. पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे श्रीमान योगी आहेत. भाजप नेत्यांचे व भाजपपुरस्कृत संत-महंतांचे म्हणणे असे की, मोदी हे शिवाजीराजेच आहेत व ते नसते तर अयोध्येत राममंदिर उभेच राहिले नसते. थोडक्यात, भाजपच्या संतांनी आता मोदी यांना ‘शिवाजी’ केले. मोदी कधी श्रीराम, कधी विष्णूचे तेरावे अवतार, तर कधी छत्रपती शिवराय असतात. ते फक्त देशाचे कर्तव्यतत्पर, धाडसी पंतप्रधान नसतात. मोदींची तुलना जे छत्रपती शिवरायांशी करतात ते एक प्रकारे शिवरायांचाच अपमान करत आहेत. शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोगली आक्रमणाशी सामना केला. त्यांच्या हातात राज्य आयते पडले नाही. ‘ईव्हीएम’ व श्रीमंत सावकारांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही. ‘ईव्हीएम’ हे भाजपचे सुदर्शन चक्र आहे. ते नसेल तर मोदी व त्यांच्या पक्षाचे काय होईल? याचा खुलासा मोदींना घोडय़ावर बसवणाऱयांनी करायला हवा.

राष्ट्रासाठी होम!

भारतीय जनता पक्षाला शिवचरित्राचे वावडे आहे. कारण शिवचरित्र हा चारित्र्याचा आदर्श आहे. शिवचरित्र म्हणजे राष्ट्र आणि प्रजा कल्याणासाठी आयुष्याचा केलेला होम आहे. शिवचरित्राची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. शिवाजीराजे म्हणजे शिवाजीराजे. दुसरे नाव उच्चारायला जीभ तयारच होत नाही. पण भाजपच्या संतांनी मोदींना शिवाजीराजे, श्रीमान योगी करून टाकले. शिवाजीराजांशी तुलना व्हावी असे कोणते अचाट काम पंतप्रधान मोदी यांनी केले? हे भाजपचे संत-महंत सांगू शकणार नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केले असते?

ह स्वराज्यात मणिपूरसारखे एखादे राज्य हिंसेच्या आगीत होरपळत असताना शिवाजीराजे स्वस्थ बसले नसते. आपल्या राज्यातील प्रजेत दोन गट पडून ते एकमेकांच्या रक्ताचे प्यासे बनले आहेत हे पाहून त्यांनी मणिपुरात कूच करून शांतता प्रस्थापित केली असती. निर्वासितांच्या छावण्यांत ते फिरलेच असते व शांतता पूर्ण प्रस्थापित होईपर्यंत त्यांनी मणिपुरातच राहुटय़ा ठोकल्या असत्या. मणिपुरात अशांतता प्रस्थापित करणाऱया परक्या शक्तींचा बीमोड केला असता.

ह हिंदू आणि मुसलमान असा राजकीय स्वार्थाचा भेदाभेद त्यांनी केला नसता. बलात्कारी, गुन्हेगार हिंदू आहे की मुसलमान हे पाहून त्यांनी न्याय केला नसता व न्यायाच्या नावाखाली गरीब मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना बेघर केले नसते. न्याय करतानाच त्यांनी तटस्थतेचे दर्शन घडवले असते.

स्वराज्याची सर्व मालमत्ता आपल्या सावकार मित्राच्या हवाली करून ‘गरिबी हटाव’च्या पोकळ वल्गना शिवरायांनी कधीच केल्या नसत्या.

शिवशाहीत त्यांनी विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले नसते. त्यांच्याशी चर्चा करून मान राखला असता. दरबारात जनतेला न्याय मिळेल असे पाहिले असते.

शेतकरी, कष्टकऱयांची फसवणूक करणाऱयांचा त्यांनी कडेलोट केला असता. देशाच्या दुश्मनांना पळून जाऊ दिले नसते व राज्याचा खजिना लुटून श्रीमंती मिरवणाऱयांना स्वराज्याच्या सत्ता मंडळात कदापि स्थान दिले नसते.

लोकांसाठी राज्य

शिवाजीराजांनी मूठभर भांडवलदारांसाठी नाही, तर लोकांसाठी राज्य चालवले. लोकांना उपद्रव कराल तर ‘मोगल परवडले’ असे लोक म्हणतील, असा सज्जड इशारा त्यांनी एका पत्रात दिला आहे. लोक सुखी झाले पाहिजेत असे बजावणारा व लोकांसाठीच राज्य चालविणारा सरंजामशाहीतील एकमेव राजा म्हणजे आपला शिवाजीराजा! शिवाजीराजांचे वैशिष्टय़ त्यांच्या लोकशाही विचारांत होते. खऱया लोकशाहीत गुणांवर नेमणुका झाल्या पाहिजेत. तशा नेमणुका शिवरायांनी केल्या. यामुळे शिवरायांच्या दरबारात व सैन्यात हिंदू होते तसे मुसलमानही होते. दौलत खान हा तर त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते. त्या काळात शिवाजीराजांनी 300 वर्षांनंतरच्या लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. दूरदृष्टीचा हा जागतिक विक्रम आहे. निर्दोष चारित्र्य जेव्हा राष्ट्र आणि प्रजेचा विचार करते तेव्हा बुद्धीला काळाच्या मर्यादा पडत नाहीत. यामुळेच शिवाजी महाराजांना लोकशाहीची भीती वाटली नाही. मोदींची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना आपल्या देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे थैमान दिसू नये याचे आश्चर्य वाटते. 1663 साली शाहिस्तेखानाचा पराभव केल्यानंतर दक्षिणेतील एका मोगल सरदाराला शिवाजीराजांनी लिहिलेले पत्र सर यदुनाथ सरकार यांनी ‘माडर्न रिव्हय़ू’मध्ये इंग्रजीत भाषांतर करून छापले. शिवाजीराजांनी या पत्रात म्हटले आहे की, “आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि आम्ही आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही. आज तीन वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार व सरदार आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. त्यांचे काय झाले हे तुम्हाला माहीतच आहे. तरीही तुम्ही चाल करून येणार आहात. आमच्या या दुर्गम प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडासुद्धा नाचवणे कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? कल्याण व बिदरचे किल्ले उघडय़ा, सपाट मैदानावर होते. ते तुम्ही काबीज केले, पण आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. तिथे तुम्ही काय करणार? बिचारा अफझल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मेला. गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहोचविणाऱया खोऱयांत तीन वर्षे तो सतत खपत होता. त्याचा परिणाम त्याला भोवला.”

शत्रूला ठार केले

शिवरायांनी अफझल खानाला सरळ ठार केले आणि शाहिस्तेखानाच्या महालात शिरून त्याच्या हाताची बोटेच कापली. औरंगजेबाच्या पदरी राहिलेल्या निकोलाय मनुची याने लिहिलेल्या ‘स्टोरिया दी मोगल’ या ग्रंथात म्हटले आहे की, “मोगल बादशहा म्हणजे केवढा बलिष्ठ! पण शिवाजीने त्यालाही क्षणाची विश्रांती लाभू दिली नाही. औरंगजेबाने कित्येक राज्ये जिंकली, कित्येक राजे कैद केले. पण हे शिवाजीचे राज्य औरंगजेबाला जबरदस्त ठरले. या राज्याच्या पायी औरंगजेबाला आपली राजधानी सोडावी लागली. गेली 19 वर्षे त्याला छावणीत दिवस काढावे लागत आहेत. आज मे महिन्याची 21 तारीख आहे. 1699 साल आहे. (म्हणजे शिवरायांच्या मृत्यूनंतर 19 वर्षे उलटली होती.) माझे हेर मला सांगत आहेत की, मराठय़ांनी छावणीला वेढा घातला आहे. बादशहासाठी उत्तरेकडून येणारा खजिना व रसद लुटून नेत आहेत. त्यांनी रस्ते रोखले आहेत.” एकदा तर औरंगजेब कपाळावर हात मारत ‘तोबा…तोबा’ करीत म्हणाला की, “शिवाजी संपला व संभाजीला मारीला, तरी हे मावळे लढतात कसे? कितीही मावळे कापले तरी पुन्हा अवचित उगवतात कसे? कशासाठी आणि कुणासाठी?”

शिवरायांच्या मृत्यूनंतरही मावळे औरंगजेबाशी पंचवीस वर्षे लढत राहिले व त्याला याच मातीत गाडले. हेच शिवचरित्र आहे!

भवानीचा प्रसाद

लडाखमध्ये चीन घुसला आहे. कश्मीरात ‘पंडित’ हिंदूंना त्यांच्या घरी जाता येत नाही. मणिपूर अशांत आहे. कारण पंतप्रधान पेशव्यांप्रमाणे पूजा, व्रतवैकल्ये, अनुष्ठानांत गुंतले आहेत. शिवाजी महाराज हिंदू रक्षक होतेच, पण ते सदैव ‘धर्म’, ‘देव देव’ करीत पूजेला बसले असते तर ते आग्य्राच्या कैदेतून सुटले असते काय व मोगलांना पळवून लावले असते काय? शिवरायांचे स्वराज्य हे पैशांतून, खोटेपणातून, ‘ईव्हीएम’च्या घोटाळय़ांतून निर्माण झाले नव्हते. त्यांना भवानी मातेचा प्रसाद लाभला. तो प्रसाद त्यांनी शौर्य म्हणून देश व प्रजेसाठी वापरला.

शिवाजी महाराज गेले तरी मावळे लढत राहिले. जेव्हा राजा इमानदार असतो तेव्हा सैन्यास पराभवाची चिंता नसते. शिवचरित्राचे हेच सार आहे. मोदींची शिवचरित्राशी तुलना करणाऱया भाजपच्या संत-महंतांनी शिवचरित्र समजून घेतले पाहिजे, पण त्यांना ते समजणे अवघड आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]