रोखठोक – पंतप्रधानांचा ‘इंडिया’वर हल्ला! अशी होती ईस्ट इंडिया

राजकीय विरोधकांच्या ‘इंडिया’वर पंतप्रधान मोदी यांनी अखेर हल्ला केलाच. ‘इंडिया’ ही ईस्ट इंडिया कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले. ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करायला आली व राज्यकर्ती बनली. आजचे राज्यकर्ते व्यापारच करत आहेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विरोधकांत अतिरेकी दहशतवादी दिसू लागले आहेत. हे त्यांच्या नैराश्येचे लक्षण आहे. देश लोकसभा निवडणुकांच्या दिशेने निघाला असताना पंतप्रधान मोदी चुकांवर चुका करू लागले. सर्व प्रमुख राजकीय पक्ष पाटणा, बंगळुरात एकत्र आले व त्यांनी ‘इंडिया’ ही आघाडी स्थापन केली. भाजपला हा धक्काच आहे. पंतप्रधान मोदींचा तर ‘इंडिया’ प्रकरणी संयमच तुटला. ‘इंडिया’ नावावर त्यांनी कठोर व घाणेरडी टीका केली. ‘इंडिया’ची तुलना पंतप्रधान मोदी यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘इंडियन मुजाहिदीन’ यांच्याशी केली. मोदी यांच्या टीकेवर श्री. राहुल गांधी यांनी अत्यंत संयमाने प्रतिहल्ला चढवला. श्री. गांधी म्हणाले, “Call Us whatever you want Mr.Modi, we are India” तुम्ही आम्हाला कोणत्याही नावाने बोला. पण आम्ही ‘इंडिया’ आहोत, भारत आहोत. आम्ही मणिपूरचे अश्रू पुसण्याचे आव्हान स्वीकारू. मणिपूरच्या प्रत्येक मुलींना व महिलांना मदत करू. तेथील जनतेला प्रेम व शांततेचा संदेश पोहोचवू. मणिपूरच्या जनतेच्या मनात आम्ही ‘इंडिया’ची पुनर्स्थापना करू. We will rebuild idea of Indian in Manipur” असे ते म्हणाले.

महाबळेश्वरचा ‘माल्कम’

श्री. मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीस ईस्ट इंडिया कंपनीची उपमा दिली. ईस्ट इंडिया ही ब्रिटिशांची व्यापारी कंपनी होती आणि ते व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले. ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे गुजरातचे दिल्लीतील राज्यकर्तेही व्यापारीच आहेत. आपण व्यापारीच आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मान्य केले आहे. व्यापारी असणे यात चुकीचे नाही. पण व्यापार देशाच्या व जनतेच्या हिताचा असावा. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या माध्यमातून देशावरच मालकी मिळवली. पण ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार व ते करणारे लोक आजच्या राजकीय व्यापाऱ्यांइतके क्रूर नसावेत हे आता वाटू लागले आहे. आजही आपल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे एक बाजारपेठ आहे व ती ‘माल्कम बाजारपेठ’ म्हणून ओळखली जाते. तिचे नाव आता बदलले, पण ‘माल्कम’ नावानेच त्या बाजारपेठेची ओळख आजही आहे. एक ब्रिटिश गव्हर्नर सर जान माल्कम याने ही बाजारपेठ वसवली. या बाजारपेठेमुळे स्थानिक लोकांना उपजीविकेचे साधन मिळाले. याचे स्मरण आजही तेथील लोकांना आहे. मला कोणी तरी कळवले, आजही दर रविवारी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी हे सर्व स्थानिक लोक बाजारपेठेतील माल्कमच्या स्तंभावर येऊन फुले व नारळ वाहतात. हा माल्कम कोण होता? तर मोदी ज्या ईस्ट इंडिया कंपनीची आठवण काढतात त्या कंपनीचा प्रतिनिधी होता. माल्कम वयाच्या तेराव्या वर्षीच ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीत आला. तो अत्यंत हौशी, आनंदी व विलासी वृत्तीचा होता. इंग्लंडमधील अनेक उमरावांचा त्याने विश्वास संपादन केला व त्याला ईस्ट इंडिया कंपनीत मोठय़ा कर्तबगारीच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. गव्हर्नर जनरलचा प्रतिनिधी म्हणून त्याने शिंदे सरदार वगैरेंशी वाटाघाटी केल्या. पेशव्यांशीदेखील वाटाघाटी केल्या. त्याच प्रमाणे लढायाही केल्या. पर्शियन, हिंदुस्थानी भाषा त्याने आत्मसात केल्या. तो बोलघेवडा होता व जनतेशी अदबीने वागे. माल्कम हा हजरजबाबी होता. त्याच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्से आहेत. एकदा एक भिल्ल त्याला आपले गाऱहाणे बराच वेळ सांगत होता आणि ‘ताबडतोब निर्णय घ्या’ असा लकडा त्याने लावला. तेव्हा माल्कम त्याला म्हणाला, ‘अरे, मला परमेश्वराने दोन कान कशासाठी दिले आहेत? एका कानानं तुझं ऐकलं. आता दुसऱ्या कानानं दुसऱ्या पक्षाचं ऐकलं पाहिजे.’ भिल्लाला ते पटलं. माल्कम हा पुढे मुंबईचा गव्हर्नर झाला. प्रजेची गाऱहाणी स्वत: ऐकून तो सोडवीत असे. शेती वगैरे प्रकरणात त्याची भूमिका न्यायाची होती. तो अहंकारी किंवा दुष्ट स्वभावाचा नव्हता. माल्कम एका पत्रात आपल्या लंडन येथील पत्नीला लिहितो, ‘येथील गरीब लोक माझ्याकडे येतात व त्यांची सुख-दु:खे कथन करतात. मी माझ्याकडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करतो तेव्हा ते मला दुवा देतात. या आनंदात वाटेकरी होण्यासाठी तू येथे असायला हवी होतीस. या लोकांनी समृद्धी, सुख, आनंद पाहिला नाही त्यांच्या जीवनात आनंद, सुख पाहण्याचे भाग्य मला मिळाले, याचा मला सगळय़ात जास्त आनंद होत आहे.’ माल्कम हा ईस्ट कंपनीचाच राज्यकर्ता होता. पण जनतेला तो आपला संरक्षणकर्ता, हितकर्ता आहे असे तेव्हा वाटत होते. त्या ईस्ट इंडिया कंपनीचे हे असे गुणदेखील आजच्या राज्यकर्त्यांनी पाहिले असते तर विरोधकांवर राळ उडवली गेली नसती!

तेव्हा संघ कोठे होता?

ईस्ट इंडिया कंपनीशी लढण्यात आजचा संघ परिवार कोठेच नव्हता. स्वातंत्र्यासाठी रक्ताचा थेंब न सांडता स्वातंत्र्याची सर्व फळे आज ही मंडळी चाखत आहे. फाळणीच्या वेळी प. बंगाल, नौखालीत हिंसाचाराचा वणवा पेटला असताना महात्मा गांधी निर्भयपणे त्या वणव्यात शिरले होते. आज मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी तेथे जात नाहीत की बोलायला तयार नाहीत. भाजपने ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण कोठे अनुभवले? आजच्या ‘इंडिया’ बनवण्याच्या योजनेत ते तर कोठेच नव्हते.

‘भारत छोडो’, ‘चले जाव’ आंदोलनाच्या बाबतीत पं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका वेगळी होती. या आंदोलनास त्यांचा पाठिंबा नव्हता व त्यांनी तसे पत्र ब्रिटिशांना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीस लिहिले होते असे जाणकार सांगतात. त्यामुळे आपल्या विरोधकांवर ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा आरोप करणे म्हणजे स्वत:वरच आरोप करण्यासारखे आहे. ‘इंडिया’ म्हणजे अतिरेकी, असे श्री. मोदी म्हणतात, पण त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील किमान पाच पक्षांत ‘इंडिया’ आहे. आाल इंडिया अण्णा द्रमुक, रिपब्लिकन पार्टी आाफ इंडिया (आठवले). मग हे ‘इंडिया’वाले आता काय करणार!

सत्ता भोगी

ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी वृत्तीचे राज्यकर्ते होते व त्याचेच प्रतिबिंब देशाच्या आजच्या राज्य कारभारावर पडलेले दिसते. आजचे राज्यकर्ते सत्तेचा वापर व गैरवापर पुरेपूर करीत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी नोकरशहा इंडियात येऊन सर्व भोग घेत व मुखवटा मानवता, समाजसेवेचा व सुधारणांचा लावत. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांचे पगार फार नव्हते. त्यामुळे ते व्यापारी, जमीनदार व इतर धनिकांना हाताशी धरून आपल्या गरजा भागवत. आपण सत्तेचे मालक आहोत त्यामुळे कसेही वागण्याचा आपल्याला परवाना आहे असेच ते मानत. हेन्री व्हान्सिटार्ट हा ईस्ट इंडिया कंपनीत 1761 मध्ये बंगालचा गव्हर्नर होता. लाच, नजराणे वगैरे घेण्याबद्दल त्याला कसलाच कमीपणा वाटत नव्हता. तो गुलहौशी होता. इंग्लंडमधील एका मित्राला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “मित्रा, आम्ही सत्तेवरील लोक आहोत व आम्ही फायदा घेतो असे तू म्हणतोस. पण मित्रा, असा फायदा घ्यायचा नाही तर अधिकारावर राहावयाचे कशासाठी?” सध्याच्या भाजपची मानसिकता याच ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे आहे. अर्थात त्या ईस्ट इंडिया कंपनीत माल्कमसारखे लोक होते तसेच व्हान्सिटार्टसारखे सत्ताभोगी आणि लुटारूदेखील होते. स्वतंत्र हिंदुस्थानातही माल्कम आहेत तसे व्हान्सिटार्टदेखील आहेत. यापैकी आपण कोणाचे वारसदार हे भाजपने ठरवायचे आहे. विरोधकांना ईस्ट इंडिया कंपनी म्हणत असाल तर स्वत:चे चरित्रही तपासायची हिंमत ठेवा!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]