रोखठोक : मुंबईचा संतप्त तरुण – Angry young man

rokhthokजॉर्ज हे ज्वलज्जहाल नेता होते. मुंबईचे रस्ते हेच त्यांचे मैदान. ते त्यांनी लढवले. संप घडवून त्यांनी मुंबईकरांना अनेकदा वेठीस धरले. तरीही ते लोकांना आवडत असत. ते सच्चे नेते होते.

जगात सर्वगुणसंपन्न असा कोण मनुष्य झाला? सर्वगुणसंपन्नता ही एका परमेश्वरापाशीच संभवते हे तत्त्व मान्य केले तरी परमेश्वरामध्येही दोष होते. जॉर्ज फर्नांडिस हे काही परमेश्वर नव्हते. गुणदोष त्यांच्यातही होते. जॉर्जचा एक काळ होता. त्या काळाच्या अश्वमेधावर ते एखाद्या योद्ध्यासारखे स्वार झाले व वावरले. कीर्ती व प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच जॉर्ज हे तुरुंगात होते. आणीबाणीनंतर त्यांच्या बेड्या जनतेने तोडल्या व त्याच योद्ध्याच्या थाटात ते केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. यावर त्यांनी लगेच भाष्य केले, ‘‘मी एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात आलो आहे!’’ आंदोलने करण्यात त्यांचा जन्म गेला. त्यानंतर मोरारजी मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. हे सर्व त्यांच्यासाठी नवे होते. सत्तेच्या पहिल्या फेरीत ते रमले नाहीत. कारण त्यांच्या जिभेचा दांडपट्टा सतत फिरत असे व तीच त्यांची ताकद होती. जॉर्ज हे मंगलोरचे. तरुणपणी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मोपदेशक व्हावे असे वाटत होते, पण ते ख्यातनाम झाले ते ज्वलज्जहाल राजकारणी व कामगार नेते म्हणून. मुंबईच्या रस्त्यावर ते वाढले व पुढे रस्ता हेच त्यांचे मैदान झाले.

सभा उधळली
मुंबईतील म्युनिसिपल कर्मचारी व सफाई कामगारांचे ते नेते बनले आणि तेव्हाच्या नगरपित्यांना ‘हैराण’ करू लागले. हेच जॉर्ज पुढे मुंबईत नगरपिता झाले. नगरपिता झालेले जॉर्ज आता कसे वागतील याबद्दल मुंबईकरांना फार कुतूहल होते. यासाठी त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. नव्या महापालिकेची पहिलीच बैठक त्यांनी उधळून लावली. लोकांनी नवनिर्वाचित महापौर वरळीकरांना घालण्यासाठी आणलेले हार तिथेच पडले. मिरवणुकीची तयारी फुकट गेली. कोळी समाजाचे पुढारी, महापौर वरळीकरांचा जयजयकार करण्यासाठी ट्रक्समध्ये आलेल्या सागरकन्या जॉर्जना लाखोली वाहत परत गेल्या, पण जॉर्ज मात्र तेव्हा विजयी वीराच्या भूमिकेत महापालिकेत वावरत होते. हाच जॉर्जचा मूळ स्वभाव होता.

संतप्त तरुण
जॉर्जची घडण कशी झाली, जॉर्ज असे का झाले ते समजून घेतले पाहिजे. दोन महायुद्धांमुळे युरोपात संतप्त तरुणांचा (Angry Young Man) एक नवा वर्ग पन्नासच्या दशकात तयार झाला होता. जगातले सारे काही चुकत आहे, ते ताबडतोब बदलले पाहिजे अशी या तरुणांची भावना असे. जॉर्ज फर्नांडिस ही या वर्गाची हिंदुस्थानातील अस्सल अवलाद असे तेव्हा गमतीने म्हटले जात असे. जिकडे तिकडे जॉर्ज यांना अन्याय, चुकाच दिसत होत्या व ते बदलण्याची त्यांना घाई लागली होती. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईची घोषणा केली त्यावर जॉर्ज संतापले. ‘‘हा तर मुंबईतून गरीबांना साफ करण्याचा कट आहे. मी हे होऊ देणार नाही!’’ अशी भूमिका त्यांनी घेतली. या घाईमुळेच भरपावसाळ्यात संप घडवून त्यांनी मुंबईकरांना अनेक दिवस स्वतः झाडू मारायला लावले. ‘बेस्ट’चा संप घडवून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशी पायपीट करायला लावली. भाई डांगे यांनी कामगार क्षेत्रात पदार्पण केले तो काळ वगळला तर मुंबईचे कामगार क्षेत्र जॉर्जइतके कोणी हलविले नसेल. डांगे यांचे कार्यक्षेत्र कापड गिरण्यांपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे त्यांचा संप फक्त परळ, लालबागसारख्या भागातच जाणवे. बाकी मुंबई सुरळीत असे, पण जॉर्ज महाशयांनी हॉस्पिटल, नागरी सुविधा, स्वच्छता आणि बेस्ट अशी मोक्याची ठिकाणे पकडल्याने जॉर्जचा ‘संप’ किंवा ‘बंद’ म्हटल्यावर सगळ्या मुंबईलाच धडकी भरत असे. गोदी कामगारांचे नेते पी. डिमेलो विश्रांतीसाठी मंगलोरला आपल्या गावी गेले असता त्यांनी तरुण जॉर्जला मुंबईत आणले. त्यादृष्टीने डिमेलो जॉर्जचे गुरू, पण चेल्याने अल्पावधीतच गुरूवर मात केली. डिमेलोंची दोन वैशिष्ट्ये होती –
1) ते गोदी कामगारांच्या पलीकडे कधी गेले नाहीत.
2) संपाची वेळ त्यांनी कधी येऊ दिली नाही.
या दोन्ही गोष्टी जॉर्जना मान्य नव्हत्या. मुंबईतल्या अनेक कामगार संघटना त्यांनी भराभर आपल्या खिशात टाकल्या आणि संप हे अखेरचे हत्यार नसून लढाईची सुरुवातच संपापासून करायची असा त्यांचा बाणा होता. हा बाणा त्यांनी शेवटपर्यंत जपला, पण जसजसे ते राजकारणात ‘पडू’ लागले तसतसा त्यांचा हा बाणा लवचिक झाला. ‘सेक्युलरवाद’ हा त्यांचा कणा होता, पण अखेरच्या काळात जॉर्ज भाजप आणि संघ परिवाराचे जणू मुख्य प्रवक्ते झाल्यासारखे वागू लागले होते.

पाटलांचा पराभव
स. का. पाटील यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्याचा पराभव जॉर्ज यांनी मुंबईत केला. पाटील हे मुंबईचे तीन वेळा महापौर झाले, तेही बिनविरोध. ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ असा त्यांचा लौकिक असतानाही जॉर्ज या फाटक्या माणसाने पाटलांचा पराभव केला व त्यांची कीर्ती देशात गेली. ‘तुम्ही स. का. पाटलांना हरवू शकता’ हे त्यांच्या प्रचाराचे सूत्र होते. दिवस-रात्र ते प्रचार करीत. गिरगावातल्या एका वाडीच्या दादाने जॉर्जची पोस्टर्स फाडली. त्याला आवाज देण्यासाठी जॉर्ज दोन कार्यकर्त्यांसह गिरगावात गेले. त्यांना दारात पाहताच त्या दादाने लोटांगण घातले. जेवढी पोस्टर्स फाडली आहेत तेवढी परत छापून लावायची असा दम त्याला देऊन जॉर्ज परत गेले. त्यांचा हाच ‘अंदाज’ त्यांना लोकप्रिय करत होता. ते 1972च्या दुष्काळाचे दिवस होते. महाराष्ट्र होरपळत होता. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केल्याची बातमी होती. रोषणाई, मेजवानी, त्याची बातमी प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र जॉर्ज यांनी खिशातून काढून कामगारांसमोर धरले. सभेत सरकारविरोधी घोषणा व संतापाची लाट उसळली!

मोडतोड
जॉर्ज यांनी त्यांची दिल्लीतील कारकीर्द गाजवली की नाही याबाबत वाद आहेत, पण आणीबाणीत भूमिगत होऊन नंतर तुरुंगात गेलेले जॉर्ज पुढे दिल्लीत स्थिरावले. क्रांतिकारी मार्गाने त्यांना इंदिरा गांधींची राजवट उलथवायची होती. ती शेवटी जनतेनेच उलथवली, पण जे राज्य जनतेने आणले ती जनता पक्षाची राजवट जॉर्जसारख्यांनी खिळखिळी केली. राज्यकारभाराचा त्यांना अनुभव नव्हता व सत्तेची चटकही लागलेली नव्हती. सत्तेची अफू नंतर त्यांच्या रक्तात भिनली. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. पोखरण अणुस्फोटाचे श्रेय संरक्षणमंत्री म्हणून जॉर्जकडेच जाते. जॉर्ज यांच्या कार्यपद्धतीबद्दल बहुतेकांचे मतभेद असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व लोभस होते. हिंदी, इंग्रजी, मराठी, तुळू, तेलुगू अशा दहा-बारा भाषांमध्ये ते भाषण करीत असत. सर्वसामान्यांशी ते सहज एकरूप होत असत. सोशालिस्ट मधू लिमये, मधू दंडवते, नाना गोरे यांना कोणी हसताना पाहिले नव्हते, पण त्यांचा हा ज्वलज्जहाल ‘साथी’ नेहमीच दिलखुलास हसत असे. जॉर्ज नंतर दिल्ली व बिहारात स्थिरावले. तेच त्याचे कार्यक्षेत्र बनले, पण अस्सल मुंबईकर हीच त्यांची खरी ओळख राहिली. त्याचे ‘पार्थिव’ मुंबईत आणून येथील मातीत मिसळले असते तर बरे झाले असते. हा एकेकाळचा Angry young man, मुंबईचा संतप्त तरुण मुंबापुरीच्याच कुशीत विसावायला हवा होता.

Twitter- @rautsanjay61
Email- rautsanjay61@gmail.com