रोखठोक: असे होते करुणानिधी!

80

rokhthokकरुणानिधी हे उमेदीच्या काळात वादग्रस्त होते. त्यांनी तामीळ अस्मितेसाठी देशाशी पंगा घेतला. त्यांना वेगळे राष्ट्रच हवे होते व ते हिंदूविरोधी होते, पण नंतर ते बदलले व तिरंग्यात लपेटलेला त्यांचा देह राष्ट्रीय सन्मानाने दफन झाला.

करुणानिधी यांचे दफन चेन्नईच्या मरिना बीचवर झाले. तेथे त्यांचे एखादे स्मारक उभे राहील. ज्यांनी देश घडवला व आपापल्या परीने समाजाचे नेतृत्व केले अशी अनेक थोर माणसे गेल्या पाच-दहा वर्षांत अस्तंगत झाली. त्यांची स्मारके उभी राहतील, पण स्मारके ही शेवटी निर्जीवच असतात. दक्षिणेच्या राजकारणात करुणानिधींचे स्थान जयललितांपेक्षा मोठे होते. जयललिता या एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर ‘नाट्यमय’ पद्धतीने राजकारणात आल्या. एम.जी.आर. यांच्या पार्थिवाशेजारी त्या उभ्या राहिल्या, पण धर्मपत्नी जानकी अम्माने त्यांना खसकन त्या ट्रकवरून खाली खेचले व त्याच अपमानाच्या आगीत जळणाऱ्या जयललितांनी राजकारणात उतरून यश संपादन केले. द्रविड आंदोलनाशी त्यांचा संबंध नव्हता. त्या ब्राह्मण होत्या. तामिळी जनतेने एम.जी.आर. यांच्या धर्मपत्नीस नाकारले व पडद्यावरच्या बायकोस स्वीकारले; पण करुणानिधींचे तसे नव्हते. त्यांची ६०-६५ वर्षांची राजकीय कारकीर्द ही संघर्षमय होती. द्रविडी आंदोलनाचे ते धैर्यधर होते. तामीळ अस्मितेसाठी त्यांनी दिल्लीशी संघर्ष केला. ते नट होते, लेखक होते, कवी होते, वक्ते होते आणि मुख्य म्हणजे तसे ते बेडर होते. सुरुवातीच्या काळात ते वादग्रस्त होते. हिंदुस्थानातून ‘फुटून’ निघण्याची भाषा करणाऱ्या, स्वतंत्र तामीळ देशाची मागणी करणाऱ्या एम. करुणानिधींना त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सन्मान मिळाला. तिरंग्यात लपेटलेला त्यांचा देह शेवटी स्वतंत्र हिंदुस्थानात विलीन झाला.

तुटलेले प्रांत!
दक्षिणेकडची राज्ये राष्ट्रापासून नाळ तुटलेली आणि अलिप्त आहेत. त्यांचे घोडे राष्ट्रीय गंगेत कधीच न्हात नाही. त्यामुळे कश्मीर आणि पंजाबइतक्याच ‘फुटीर’तेचे वणवे दक्षिणेतही भडकले आहेत. धर्मांधता केरळ, तामीळनाडूतही पराकोटीची होतीच, फक्त त्यात मुसलमानी कंगोरा नसल्यामुळे येथील हिंदुत्ववाद्यांनी दुर्लक्ष केले. केरळात ख्रिश्चनांचे राजकारण आहे. ईशान्येत ते जास्त गंभीर आहे. तामीळनाडूतसुद्धा ‘मंदिरां’चे राज्य असले तरी त्यांची धर्मसंस्कृती ही हिंदूंमधील ‘अमावास्ये’स प्रेरणा मानणारी आहे. नाव जयललिता, पण मृत्यूनंतर त्यांचे दफन झाले. नाव एम.जी. रामचंद्रन. त्यांचेही दफन झाले. नाव करुणानिधी, पण त्यांचेही दफन झाले. अर्थात हा प्रत्येकाच्या श्रद्धा व संस्कारांचा विषय आहे. मात्र त्यांची द्रविडी संस्कृती वेगळी व त्यासाठी ते देशाशी पंगा घेत राहिले. शहाबुद्दीन याने तिरंगा जाळला. हिंदुस्थानी घटना जाळली. तशी कधीकाळी करुणानिधी यांनीही ती जाळली आहे. त्यांना स्वतंत्र तामीळ राष्ट्र हवे होते व त्यासाठी देशविभाजनाचे ते पुरस्कर्ते बनले. हिंदी भाषेचे ते विरोधक होते. दूरदर्शनवरील हिंदी बातम्यांच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले. धर्मांतराचे ते पुरस्कर्ते होते. ‘रामसेतू’ या संघ विचाराची त्यांनी खिल्ली उडवली व प्रभू श्रीराम हे रामसेतू बांधणारे अभियंते होते काय, असा प्रश्न त्यांनी केला. तरीही ते कमालीचे लोकप्रिय होते. आपल्या अटी-शर्तींवर त्यांनी राजकारण केले. ते आणीबाणीत तुरुंगात गेले. पुढे जयललिता यांनीही त्यांना तुरुंगात टाकले. नंतर स्वतः सत्तेवर येताच त्यांनी जयललिता यांना तुरुंगात पाठवले. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात असे कट्टर राजकीय वैर असले तरी त्यांच्या द्रविडी नेत्यांनी काँग्रेस किंवा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांची डाळ तामीळनाडूत शिजू दिली नाही. जयललिता यांच्या अंत्यसंस्कारास पंतप्रधान मोदी हे संपूर्ण मंत्रिमंडळासह चेन्नईत हजर होते व अनेकांचे अश्रू पुसत होते. आता करुणानिधी गेले तेव्हाही ते पूर्णवेळ हजर राहिले. द्रविडी राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. त्या पोकळीत घुसण्याचा हा ‘मर्त्यप्रयोग’ किती यशस्वी होतो ते पाहायचे. दोन मोठय़ा नेत्यांच्या मृत्यूनंतर तामीळनाडूत नक्कीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. करुणानिधींसाठी केंद्राने राष्ट्रीय शोक पाळला व संसदेलाही सुट्टी देऊन टाकली. करुणानिधी मोठेच होते, पण राजकारणातला मर्त्ययोगही थोर आहे.

बंडखोर!
करुणानिधींनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात बंडाची भाषा केली. ते नंतर मवाळ झाले. त्यांनी राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून घेतले. मुंबईत दाक्षिणात्यांविरुद्ध ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चे आंदोलन सुरू होताच मुख्यमंत्री पदावर असलेले करुणानिधी हे मुंबईस धावले. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. ‘‘तुम्ही तामीळनाडूत भूमिपुत्रांसाठीच लढताय. तसा मी मुंबईत मराठी बांधवांसाठी लढतोय. मिशन सारखेच आहे. हा राजकीय नसून पोटाचा विषय आहे. मि. करुणानिधी समजून घ्या!’’ हे त्यांना बाळासाहेबांनी पटवून देताच ते निमूट परत गेले व शिवसेनेविरुद्ध पुन्हा कधीच ‘ब्र’ काढला नाही. तामीळ जनतेसाठी त्यांनी कायदेभंग केला. पुढे मुख्यमंत्री म्हणून तेच कायद्याचे रखवालदार झाले. त्यांचा कुटुंबकबिला मोठा. काही बायका व त्यांची मुले. या सगळय़ांची राजकारणात सोय लावता लावता ते मेटाकुटीस आले, पण पराभूत झाले नाहीत. त्यांनी स्टॅलिनला रीतसर वारसदार नेमले व आता इहलोकी गेले.

काळोख
करुणानिधींना आधी तामिळींचे स्वतंत्र राष्ट्र हवे होते व त्या राष्ट्रास समुद्रापलीकडील श्रीलंकेतील ‘जाफना’ही जोडायचे होते. श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला त्यांचे उघड समर्थन होते. मात्र पुढे वेगळय़ा राष्ट्राचा विचार हा मूर्खपणाचा आहे हे त्यांना पटले व ते मुख्य प्रवाहात आले. भिंद्रनवाले किंवा कश्मीरातील फुटीरतावाद्यांप्रमाणे त्यांनी टोकाची भाषा केली नाही. कारण ते मूळचे लेखक आणि कवी होते. करुणानिधी यांनी शेवटची पटकथा २०११ मध्ये लिहिली. कविता, नाटके, कादंबऱ्या, सिनेमा आणि आठवणींचे अनेक खंड त्यांनी लिहिले. प्रस्थापित समाज, जाती व्यवस्था, रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांची अस्वस्थता लिखाणातून उमटत असे. ते फुले, आंबेडकर, ठाकरे, शाहू यांच्या तोडीचे समाजसुधारक नव्हते, पण त्यांच्या राजकारणाचा पाया हा सामाजिक सुधारणा व कला, संस्कृतीवर उभा होता. त्यांना दिल्लीचे राजकारण मान्य नव्हते, पण दिल्लीस खेळवत ठेवण्यात मजा येत होती. गेल्या पंचवीस वर्षांतील त्रिशंकू राजकारणाने त्यांना ही संधी मिळाली. त्यांचे कुटुंब व सहकारी भ्रष्टाचारात अडकले. कुटुंबातील कलहाने ते जर्जर झाले व शेवटी वय झाले म्हणून इहलोकी निघून गेले.

‘एक माणूस, जे कधीच आराम न करता काम करीत राहिला. आता आराम करीत आहे…’

ही करुणानिधींची कविता. त्यांच्या शवपेटीवर याच ओळी कोरल्या होत्या. दक्षिणेच्या राजकारणात त्यांच्या जाण्याने काळोख पडला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारास जमलेले राजकीय मातब्बर कोणता प्रकाश पाडणार?

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या