
आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत ‘टॉप 100’मध्ये बंगळुरूची आयआयएससी, आयआयटी रोपर आणि आयआयटी इंदूर यांनी स्थान मिळवले आहे. हिंदुस्थानातील विद्यापीठांमध्ये आयआयएससी अव्वल ठरली आहे. दुर्दैवाने सलग दुसऱ्या वर्षीही हिंदुस्थानातील एकाही विद्यापीठाने ‘टॉप 10’मध्ये जागा मिळवलेली नाही.
‘टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2021’ ही क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये हिंदुस्थानातील विद्यापीठांमध्ये अव्वल ठरलेल्या आयआयएससीला 37 वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी रोपर 55 व्या तर आयआयटी इंदूर 78 व्या क्रमांकावर आहे. चीनच्या शिंघुआ विद्यापीठाने या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचेच पेकिंग विद्यापीठ आहे. तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावर सिंगापूरच्या विद्यापीठांनी बाजी मारली असून चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग विद्यापीठ स्थानापन्न झाले आहे.

























































