
यंदाच्या आयपीएल मोसमातील दोन फॉर्ममध्ये असलेले संघ आज दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भिडणार आहेत. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना करणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन विजय संपादन करीत सहा गुणांची कमाई केलीय. त्यामुळे साहजिकच आता उद्या विजयाचा चौकार ठोकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. बघूया उद्या कोणता संघ बाजी मारतोय ते…
रबाडा वि. कोहली, डिव्हिलीयर्स
दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणाऱया लढतीत अव्वल गोलंदाज आणि दिग्गज फलंदाज यांच्यामध्ये रोमहर्षक झुंज पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या आतापर्यंतच्या यशात वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच विराट कोहलीने शनिवारी जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. ए बी डिव्हिलीयर्सही चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे उद्या कॅगिसो रबाडा वि. विराट कोहली व ए बी डिव्हिलीयर्स यांच्यामधील रंगत तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
पृथ्वी, श्रेयस या मुंबईकरांची फटकेबाजी
दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार श्रेयस अय्यर व युवा पृथ्वी शॉ या दोघांनी चमकदार कामगिरी केलीय. हे दोन्ही खेळाडू मुंबईकर आहेत हे विशेष. पृथ्वी शॉने दोन अर्धशतकांसह 137 धावा फटकावल्या असून श्रेयस अय्यरने एक अर्धशतकासह 170 धावा तडकावल्या आहेत. दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावरच दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला शनिवारी हरवले. या दोघांसह शिखर धवन, रिषभ पंत, शिमरोन हेथमायर हे फलंदाजही दिमतीला आहेत. मार्क्स स्टोयनीसच्या अष्टपैलू खेळीवरही या संघाचे भवितव्य अवलंबून असेल.
सैनी, चहल ठरताहेत प्रभावी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मागील दोन लढतींत मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्सला पराभूत केले आहे. यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. विराट कोहलीच्या संघाच्या मागील दोन लढतींतील यशामध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहल व वेगवान गोलंदाज नवदीप सैनी या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केलीय. वॉशिंग्टन सुंदर, ऍडम झाम्पा, इसिरू उडाना व शिवम दुबे यांनी युजवेंद्र चहल व नवदीप सैनीला उत्तम साथ दिल्यास उद्याच्या लढतीतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयाची आस बाळगता येईल.
आजची लढत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
रात्री 7.30 वाजता.
























































