ट्रेनमध्ये ‘योग’, ‘हील-स्टेशन’च्या संस्थापक रुचिता शाह यांचा अनोखा उपक्रम

धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांचे रोजचे दोन-तीन तास प्रवासात जातात. या प्रवासाच्या वेळेचे रूपांतर योग क्लासमध्ये करण्याचे काम ‘हील-स्टेशन’च्या संस्थापक रुचिता शाह यांनी केले. होय, रुचिता शाह आणि त्यांची टीम ट्रेनमध्ये प्रवाशांना योग शिकवतात.

लोक अनेकदा विचारतात…योग आणि तेही गर्दीच्या ट्रेनमध्ये? ते कसे शक्य आहे? हेच तर आम्हाला त्यांना दाखवायचे आहे, केवळ शब्दाने नव्हे तर कृतीतून, असे रुचिता शाह यांनी सांगितले. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सुरू झालेला लहानसा उपक्रम एका कल्याणकारी चळवळीत रूपांतरीत झाला आहे. या उपक्रमात तब्बल 100 हून स्वयंसेवी योग प्रशिक्षक जोडले गेले आहेत. ट्रेनच्या प्रवासात कठीण योगासने शिकवली जात नाहीत. हस्तमुद्रा, सौम्य ताण, श्वसन, ध्यान यावर भर दिला जातो.

100 दिवसांचा ट्रव्हेल योग उपक्रम

आम्ही 13 मार्च रोजी मुंबई लोकलमध्येच हे काउंटडाउन सुरू केले,’ असे हील-स्टेशनच्या 100 दिवसांच्या ट्रॅव्हल योगा उपक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ योग शिक्षिका आणि मोहीम समन्वयक वर्षा आहुजा म्हणाल्या.
दररोज, दोन शिक्षक त्यांच्या जवळच्या स्थानकावरून गर्दी नसलेल्या वेळेत ट्रेनमध्ये चढतात आणि सोप्या पद्धतीने योगाचे मार्गदर्शन करतात.

पनवेल ते सीएसटी, विरार ते चर्चगेट, मुलुंड, घाटकोपर, दादर आणि वांद्रे, … आम्ही शहरातील प्रत्येक कोच, प्रत्येक स्टेशनवर योगाभ्यास केला आहे,’ असे आहुजा यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या 100 दिवसांच्या काऊंटडाऊनचा भाग म्हणून दररोज दोन प्रशिक्षित प्रशिक्षक शहरातील वेगवेगळ्या उपनगरीय गाड्यांमध्ये चढतात व प्रवाशांना 15 मिनिटांच्या दिनचर्येत मार्गदर्शन करतात. ज्यामध्ये स्ट्रेचिंग, श्वासोच्छवासाचे तंत्र आणि पोश्चर सुधारणा यांचा समावेश आहे. हे व्यायाम ट्रेनच्या वातावरणाला अनुकूल करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केले आहेत. ज्यामध्ये प्रवाशांना सामान्यतः जितकी जागा लागते त्यापेक्षा जास्त जागा लागत नाही. घरातली कामं, लांबचा प्रवास, ऑफिसमधली कामं यामध्ये रमणाऱ्या महिलांसाठी हा रिचार्ज क्षण असतात, असे रुचिता म्हणाल्या. आम्ही हे दाखवून दिले आहे की, योगासाठी योगा मॅटची गरज नाही तर इच्छाशक्तीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.