
चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून लोकसभेत आज सलग दुसऱया दिवशी गदारोळ झाला. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत बोलू पाहणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधाऱयांनी पुन्हा रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात काही सदस्यांनी सभापतींवर कागदाच्या चिटोऱया भिरकावल्याने आठ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या भाषणात सत्ताधारी पक्षाचे खासदार अडथळे आणत होते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस व डाव्या पक्षाच्या खासदारांनी कागदाच्या चिटोऱया सभापतींच्या आसनाकडे भिरकावल्या.
निलंबित खासदारांसह राहुल यांची निदर्शने
सभापतींवर कागद फेकल्याच्या आरोपावरून काँगेसचे मणिक्कम टागोर, हिबी ईडन, अमरिंदरसिंग वारिंग, गुरजित सिंग औजला, किरणकुमार रेड्डी, प्रशांत पडोळे, डीन कुरियाकोस तर माकपाच्या एस. वेंकटेश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित खासदारांना सोबत घेऊन राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्टाच्या मकर द्वारावर भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शने केली.
- राहुल गांधी यांना बोलण्यास परवानगी नाकारण्यात आली व कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरी व त्यासोबतच हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्दय़ावरून सरकारला घेरले.


























































