
ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नायजेरियन नागरिकाला उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. पुराव्यांशी छेडछाड करु नये. साक्षीदारांना धमकावू नये या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने हा जामीन मंजूर केला. आरोपीची झडती घेताना व त्याच्याकडे सापडलेले ड्रग्ज जप्त करताना नियमांचे पालन झाले नाही, असा ठपकाही न्यायालयाने पोलिसांवर ठेवला.
काय आहे प्रकरण…
संडे इस्गाउ असे या आरोपीचे नाव आहे. दिवा-शिळ फाटय़ावर संडे ड्ग्ज् विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून 29 नोव्हेंबर 2021 रोजी पोलिसांनी संडेला अटक केली. त्याच्यासोबतचे दोघेजण पळून गेले. जामिनासाठी संडेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
इस्गाउचा युक्तिवाद
पोलिसांनी घेतलेली झडती व जप्ती संशायस्पद आहे. अटक करताना पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही. पंचनामा व जप्ती यांच्या वेळेत तफावत आहे, असा युक्तिवाद संडेकडून करण्यात आला.
न्यायालयाचे निरीक्षण
ड्रग्ज प्रकरणात हेड कॉन्स्टेबलच्या वरील अधिकारी आरोपीची झडती घेऊ शकतो. राज्य शासनाने अधिसूचना काढून तसे अधिकार दिले आहेत. संडेची झडती या नियमानुसार झालेली नाही. संडेला जामीन दिला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.































































