नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आचार संहितेची पायमल्ली, भाजपा महायुतीविरोधात हजारो तक्रारी – हर्षवर्धन सपकाळ

नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

पुणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले. भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व नियम पायदळी तुडवले. सत्ताधारी महायुतीने गाव तिथं बारा भानगडी, करून ठेवल्या आहेत. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करण्यात आली.