आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालये रेडक्रॉस सोसायटीकडे हस्तांतरीत करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यवस्थापनात बदल केल्यास त्याचे किती चांगले परिणाम होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय. त्यामुळे महाबळेश्वर येथील अनुभव पाहता, आरोग्यसेवा पोहोचविण्यात अडचणी येणाऱ्या आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘रेडक्रॉस सोसायटी’कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय दोन आठवडय़ांत घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. अलीकडेच राज्य शासनाने येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे रेडक्रॉस सोसायटी संचालित ‘बेल एअर’कडे व्यवस्थापनासाठी दिली आहेत. ‘बेल एअर’ने या रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाची इमारत व सुविधांची पाहणी केली. रुग्णालयाची इमारत, तेथील सुविधा व स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सातारा जिह्याच्या मानांकनात महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा क्रमांक सर्वात खाली होता; परंतु रुग्णालयाच्या व्यवस्थापनात बदल करण्यात आला. नवीन व्यवस्थापनाने उत्तम कामगिरीच्या जोरावर सातारा जिह्यात वरचा क्रमांक प्राप्त केला आहे. ग्रामीण रुग्णालय व राज्य शासनात केवळ एका वर्षाचा करार केला जाते. त्यानंतर पुन्हा एका वर्षासाठी कराराचे नूतनीकरण करण्यात येते; परंतु आता हा करार पाच वर्षांचा असेल. पुढील पाच वर्षांसाठी हे रुग्णालय रेडक्रॉस सोसायटीकडेच असेल, असेही ते म्हणाले.

ग्रामीण रुग्णालय ‘बेल एअर’कडे हस्तांतरित करण्यात आले असले, तरी येथे शवविच्छेदन करण्याचा अधिकार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडेच ठेवण्यात आले होते. यामुळे शवविच्छेदनासाठी विलंब लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन यापुढे हे अधिकार ‘बेल एअर’कडे देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही मंत्री टोपे यांनी दिली.

गर्दीत लोकांनी शिस्त पाळलीच पाहिजे

बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मंदिरे सुरू झाल्याने लोक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत; परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही, असे लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे; अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते. दिल्ली, केरळ येथे रुग्ण वाढू लागले आहेत. यूके, फ्रान्समध्ये लॉकडाऊन केला आहे. उद्या आपल्यापुढे अडचणी वाढू नये, यासाठी लोकांनी शिस्त पाळली पाहिजे, असे आवाहनही मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.