पुस्तक खरेदी करण्यासाठी विमानाने प्रवास

सोशल मीडियाच्या युगात पुस्तके वाचणाऱयांची संख्या कमी झाली आहे, परंतु अजूनही काही लोकांना सोशल मीडियाऐवजी पुस्तके वाचणे पसंत आहे. अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी 1925 साली लिहिलेले ‘द लॉ ऑफ सक्सेस’ या पुस्तकाची मागणी 100 वर्षांनंतरही कमी झाली नाही. अमेरिकेतील इडाहो येथील रहिवासी असलेल्या रसेल ब्रन्सन यांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती विकत घेतली आहे. हे पुस्तक आणण्यासाठी त्यांनी थेट खासगी विमानाने प्रवास केला आहे.

‘द लॉ ऑफ सक्सेस’ या पुस्तकावर नेपोलियनची सही होती. जेव्हा हे पुस्तक ऑनलाईन विकले जात असल्याचे समजले तेव्हा त्यांनी ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते विकत घेणे सोपे नव्हते. विक्रेत्याशी जवळपास एक महिना चर्चा केल्यानंतर अखेर ते पुस्तक विकत घेतले. रसेल हे व्यावसायिक असून त्यांनी नेपोलियन हिल यांची अनेक पुस्तके खरेदी केली आहेत. यासाठी त्यांनी 18 कोटी रुपये खर्च केले. ही पुस्तके आणण्यासाठी रसेल यांनी खासगी विमानाचा वापर केला. कारण त्यांना महागडी पुस्तके खराब होऊ द्यायची नव्हती.