Russia Ukraine War Breaking News – रशियाने पुकारले युक्रेनविरुद्ध युद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सैनिकी कारवाईला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. आपला युक्रेनवर कब्जा करण्याचा कोणताही मानस नसल्याचा दावाही पुतीन यांनी केला आहे. शस्त्र टाका आणि घरी जा, ऐकलं नाही तर युद्ध अटळ आहे अशी उघड धमकी रशियाने युक्रेनच्या सैन्याला दिली आहे. हिंदी वृत्तवाहिन्यांनी AFPच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रशियाने युद्धाच्या बुधवारी दिशेने आणखी एक पाऊल टाकताना युक्रेनच्या सीमेवर आपल्या सैनिकांसाठी 550 वर तंबू ठोकले होते आणि तात्पुरते हॉस्पिटल, हेलिपॅड उभारले होते. त्याचबरोबर राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी एक व्हिडीओ जारी करीत आम्ही चर्चेस तयार आहोत पण देशहितासाठी तडजोड करणार नाही अशी भूमिकाही काल जाहीर केली होती.

तंबू, हेलिपॅड, रणगाडे

अमेरिकेच्या मेकसेर या कंपनीने युक्रेन सीमेवरील दोन सॅटेलाईट इमेज जारी केल्या आहेत. 4 फेब्रुवारीच्या छायाचित्रात युक्रेन सीमेनजीक रशियन लष्कराचे केवळ दोन तंबू दिसत आहेत.

मंगळवारी जारी केलेल्या छायाचित्रानुसार युक्रेन सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. अंतरावर रशियन लष्कराने 550 तंबू उभारल्याचे स्पष्ट होत आहे. युक्रेनच्या पूर्वभागातील डॉनेत्सक आणि लुहान्सक या दोन प्रांतात रशियन सैनिक मोठय़ा प्रमाणावर तैनात असून, रणगाडे रस्त्यावर फिरत आहेत.

या दोन प्रांतातूनच रशिया युक्रेनवर हल्ला करेल असे वृत्त आहे. येथील बंडखोरांच्या पाठिंब्याने हे युद्ध लढले जाईल. सध्या बंडखोरांकडून युक्रेन सैन्यावर हल्ले सुरू आहेत.