
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे सध्या हिंदुस्थानी क्रिकेट संघातून बाहेर असलेला क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज श्रीसंथ सध्या बिग बॉसच्या घरात आहे. या दरम्यान त्याने आपण मैदानावर परतण्याची आशा सोडलेली नाही असं म्हटलं होतं. याआधी त्याची माजी प्रेयसी आणि अभिनेत्री निकेशा पटेल हिने त्याच्यावर गंभीर आरोप लगावत पत्नीप्रमाणेच श्रीसंथने आपल्यालाही फसवल्यांचं म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा तिने श्रीसंथवर हल्लाबोल करत धक्कादायक खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीसंथची पत्नी बिगबॉसच्या घरात पोहोचली होती आणि तिने तेथे श्रीसंथवर बिग बॉसच्या घरात झालेल्या आरोपांवर त्याची बाजू मांडली. याबाबत बोलताना निकेशा म्हणाली की, “ब्रेकअपनंतर आमची कधीच भेट झाली नाही परंतु त्याला स्त्रियांचा आदर ठेवता येत नाही. बिग बॉसमध्ये ज्या वाईट पद्धतीने तो वागतोय तसाच तो खऱ्या जीवनातही आहे,” असेही निकेशा म्हणाली. तसेच “विनाकारण त्याने संबंध तोडले आणि तो सध्या स्वत:ला आपण महान असल्याचे दाखवतो, परंतु तो तसा कधीही नव्हता” असेही ती म्हणाली. यापूर्वी श्रीसंथ पत्नी भुवनेश्वरीसोबत असताना माझ्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता असा गंभीर आरोप निकेशाने केला होता.

























































