धक्कादायक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली

मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपची पूर्वतयारी असलेल्या वन डे मालिकेतील पाचव्या लढतीतही ऑस्ट्रेलियाला हरविण्याचा पराक्रम केला आणि 3-2 अशा धक्कादायक मालिका विजयाची नोंद केली.

एडन मार्करम (93) आणि डेव्हिड मिलर (63) यांच्या झंझावाती खेळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 315 अशी जोरदार धावसंख्या उभारली आणि मार्को यानसन आणि केशव महाराज यांच्या अचूक माऱयापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव 193 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना 111 धावांनी तर चौथा सामना 164 धावांनी जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली होती.

आजही 122 धावांनी विजय मिळविताना शंभर नंबरी विजयाची अनोखी हॅटट्रिक साजरी केली. 23 चेंडूंत 47 धावा ठोकण्यासह 39 धावांच 5 विकेट टिपणारा यानसन ‘सामनावीर’ ठरला तर 225 धावा करणारा मार्करम ‘मालिकावीर’ ठरला. वर्ल्ड कपनंतर निवृत्त होत असलेला क्विंटन डिकॉक आज मायदेशातला अखेरचा सामना खेळला.