सामना अग्रलेख – एका ‘कॉम्रेड’चे जाणे!

इंदिराजींपासून सोनिया, राहुल-प्रियंका यांच्यापर्यंत सर्व पिढ्यांसोबत अहमद पटेल एक निष्ठावान ‘पाईक’ म्हणूनच राहिले. सर्व प्रकारच्या प्रसंगांत गांधी कुटुंबाची साथ त्यांनी सोडली नाही. जणू त्यांच्या जीवनाचे ध्येयच ते होते. अहमदभाईदेखील ते जाणून होते आणि त्यांनी हे ‘कर्तव्य’ शेवटपर्यंत निभावले. सोनिया गांधींना अहमदभाईंचे जाणे एका ‘कॉम्रेड’चे जाणे वाटले ते त्यामुळेच. पक्षाच्या अत्याधिक गरजेच्या क्षणी अहमदभाईंनी एक्झिट घेतली. काँगेस पक्षासाठी ही पोकळी भरून न निघणारी आहे.

काँग्रेस पक्षाला सर्वाधिक गरज असताना अहमद पटेल आपल्याला सोडून गेले आहेत. बुधवारी पहाटे त्यांच्या निधनाची बातमी आली. त्याआधी ते महिनाभर कोरोना संसर्गाने आजारी होते. त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीविषयी बातम्या येत होत्या, पण बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त करूनही अहमद पटेल हे कायम प्रसिद्धीपासून लांब राहिले. पडद्यामागचे मुख्य सूत्रधार अशी त्यांची भूमिका कायम राहिली. आपल्या आजाराबाबतही त्यांनी तीच पद्धत अवलंबली. फरिदाबादच्या छोटय़ा इस्पितळात ते आधी दाखल झाले व प्रकृती खालावली तेव्हा गुरगावला आले. आपल्या आजारावर चर्चा नको असे त्यांना वाटत असावे. हिंदुस्थानच्या राजकारणाने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व गमावले आहे. काँगेस पक्षाशी त्यांच्या अविचल निष्ठा होत्या. काँगेस व गांधी कुटुंबीयांच्या हिताचा रखवालदार म्हणून त्यांनी शेवटपर्यंत भूमिका वठविली. आधी इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी व आता सोनिया गांधी अशी गांधी घराण्याला त्यांनी इमानेइतबारे साथ केली. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून गेली कित्येक वर्षे तेच काँगेसची धुरा वाहत होते. गुजरातच्या भरूच जिल्हय़ातून निर्माण झालेला हा काँगेसचा युवा कार्यकर्ता. फक्त 26 वर्षांच्या

अतितरुण वयात

अहमद पटेल हे भरूचमधून लोकसभा निवडणूक लढले. सगळय़ात तरुण खासदार म्हणून संसदेत पोहोचले. 1977चा तो काळ. इंदिरा गांधींचे नेतृत्व दिल्लीत होते. पण जनता पक्षाच्या लाटेत धक्का बसला. भले भले काँगेजी इंदिराजींना सोडून जात होते. त्यावेळी अहमद पटेल काँगेस व गांधी कुटुंबाबरोबर भक्कमपणे उभे राहिले ते शेवटच्या श्वासापर्यंत. पटेल यांनी गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून जवळपास सलग पाच दशके काँगेस वर्तुळात आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. गांधी कुटुंबाच्या जवळ, पण प्रसिद्धीपासून दूर असलेला निष्ठावान पाईक अशीच अहमद पटेल यांची प्रतिमा होती. जेव्हा जेव्हा काँगेस पक्षांतर्गत समस्या निर्माण झाल्या त्या प्रत्येकवेळी गांधी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य मार्ग काढणारा एकमेव ‘कार्यकर्ता’ म्हणजे अहमद पटेल होते. काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘मी एक अत्यंत विश्वासू सहकारी, जवळचा मित्र गमावला आहे, असा कॉम्रेड होणे नाही’, अशा शब्दांत पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावरूनही अहमद पटेल या दोन शब्दांचे महत्त्व लक्षात येते. गुजरातमधून आठ वेळा खासदार, काँगेस कोषाध्यक्ष, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अशा

अनेक जबाबदाऱ्या

त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. तालुका पंचायतीपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास केंद्रापर्यंत पोहोचला. 2004 ते 2014 या दहा वर्षांत राष्ट्रीय राजकारण आणि काँगेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. त्यात अहमद पटेल यांची भूमिका ‘वन मॅन आर्मी’ अशीच होती. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात ते अनेक वर्षे एक शक्तिशाली व्यक्तिमत्त्व म्हणून वावरले. मात्र त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. दिवंगत पंतप्रधान इंदिराजी आणि नंतरच्या काँगेस सत्ताकाळातही अहमद पटेल यांना मंत्रीपदाच्या ऑफर दिल्या गेल्या. मात्र पक्ष संघटनेतच काम करायचे असे सांगून त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या. राजकारणात अशा व्यक्ती विरळच असतात. अहमदभाई त्यापैकी एक होते. म्हणूनच काँगेस पक्षातील त्यांचे वजन आणि गांधी पुटुंबाचा त्यांच्यावरील विश्वास शेवटपर्यंत कायम राहिला. इंदिराजींपासून सोनिया, राहुल-प्रियंका यांच्यापर्यंत सर्व पिढय़ांसोबत अहमद पटेल एक निष्ठावान ‘कॉम्रेड’ म्हणूनच राहिले. सर्व प्रकारच्या प्रसंगांत गांधी कुटुंबाची साथ त्यांनी सोडली नाही. जणू त्यांच्या जीवनाचे ध्येयच ते होते. अहमदभाईदेखील ते जाणून होते आणि त्यांनी हे ‘कर्तव्य’ शेवटपर्यंत निभावले. सोनिया गांधींना अहमदभाईंचे जाणे एका ‘कॉम्रेड’चे जाणे वाटले ते त्यामुळेच. पक्षाच्या अत्याधिक गरजेच्या क्षणी अहमदभाईंनी एक्झिट घेतली. काँगेस पक्षासाठी ही पोकळी भरून न निघणारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या