सामना अग्रलेख – यांच्या बायकोला मत! म्हणजे झुंडशाहीला मत!!

निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात ‘वडस’ वाढल्याचे हे लक्षण आहे. बारामतीचा हा करामती पुतण्या 4 जूननंतर राजकारणातून नेस्तनाबूत झालेला दिसेल. त्यांचा व मिंधे गटाचा एकही खासदार निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत अजित पवारांची बायको दारुणपणे पराभूत होत आहे. अजित पवार व एकनाथ मिंधे यांचे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवीत आहेत. 4 जूननंतर हे पक्ष नागपुरात झाडलोट करताना दिसतील. तूर्त अजित पवारांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी निर्भयपणे पुढे जायला हवे. महाराष्ट्राचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकतर नैराश्याने ग्रासले आहे किंवा दारुण पराभवाच्या भीतीने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा नवा डावही त्यांच्यावरच उलटला आहे व त्यामुळे अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले आहेत. पवारांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे पतिदेव अजित पवार यांनी हैदोस घातल्याचे चित्र दिसते. बायकोला मते दिली नाहीत तर इंदापूरला पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. बारामतीतील उद्योजक, लहान व्यापारी यांना अजित पवारांनी धमकावले की, ‘‘जास्त उड्या माराल तर याद राखा. नाक दाबून तोंड कसे उघडायचे ते आपल्याला चांगले समजते.’’ पवार हे उघडपणे या धमक्या देत असताना राज्याचा व देशाचा निवडणूक आयोग भाजपची धुणीभांडी करीत बसला आहे काय? पुन्हा अजित पवार हे एवढय़ावरच कसे थांबतील! त्यांचे कार्य गगनाला गवसणी घालणारे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील स्टोन क्रशर, वाळू, रेती व्यापारी, छोटे बिल्डर यांना बोलावून या महाशयांनी दम भरला, ‘‘तुमच्या गावात माझ्या बायकोला मताधिक्य मिळाले नाही तर याद राखा. तुमचे उद्योगधंदे बंद करीन.’’ पवार यांनी शासकीय यंत्रणा हाताशी धरून यापैकी अनेक उद्योजकांना नोटिसा मारून कोटय़वधींचा दंड आकारला. त्यामुळे हे उद्योग बंद पडले. ‘‘दंड कमी करून घ्यायचा असेल तर माझ्या बायकोचे काम करा. नाहीतर तुम्ही भिका मागा,’’ असे निर्लज्ज वर्तन अजित पवार करीत आहेत ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच. मते द्या, नाहीतर घरातील चुली विझविण्यापर्यंत अजित पवारांचे वैफल्य शिगेला पोहोचले आहे. बारामतीकरांनी आता निर्भय बनून ही झुंडशाही मोडून काढायला हवी. महाराष्ट्रात ऍड. असिम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी व पत्रकार निखिल वागळे हे ‘निर्भय बनो’ आंदोलनाचा

एल्गार करीत

आहेत. बारामतीकरांना धीर देण्याचे काम या तिघांनी प्रत्यक्ष बारामतीत जाऊन केले पाहिजे. मोदी हे देशात हुकूमशाहीचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहेत व अजित पवारांसारखे लोक या कामी त्यांच्या हाती लागले आहेत. अजित पवारांनी जनाची नाही, निदान मनाची लाज बाळगायला हवी. ज्या पित्यासमान काकांनी त्यांना राजकारणात इतके मोठे केले व ‘मोदी मोदी’ करण्यालायक बनवले त्या काकांच्या संदर्भात त्यांची वक्तव्ये म्हणजे डोके फिरल्याचे लक्षण आहे. अजित पवार यांचे राजकारणातील स्वकर्तृत्व शून्य आहे हे त्यांना 4 जूनच्या निकालानंतर कळेल. आपणच महाराष्ट्राचे विकास पुरुष आहोत. बारामतीसह सर्व राज्याचा विकास फक्त ‘मी’ म्हणजे ‘मीच’ केला. शरद पवार वगैरे सर्व झूठ असल्याचे ते बोलत आहेत; पण जरंडेश्वर कारखाना, शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा व त्यांच्या बरोबरच्या डरपोक सहकाऱ्यांचे कोटय़वधींचे घोटाळे म्हणजेच विकास काय? हा प्रश्न जनतेने त्यांना विचारायला हवा. अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट व घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी फडणवीस, मोदी वगैरे जाणकारांनी फोडली होती. त्यामुळे तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार हे मोदी-फडणवीस भजन मंडळात सामील झाले हे सत्य आहे. यापुढे अजित पवारांना कोणी ‘दादा’ वगैरे शब्दांच्या उपाध्या लावू नयेत. ते दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत. डरपोक लोकच धमक्या देऊन मस्तवालपणा दाखवतात. अजित पवार तेच करीत आहेत. सत्ता व सरकारी संरक्षण नसेल तर अजित पवारांसारख्या लोकांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱया माशासारखी होईल. विरोधी पक्षनेता असलेला माणूस पलटी मारतो व

सरकारात घुसतो

हे लोकशाहीसाठी भयंकर कृत्य आहे. अजित पवार म्हणतात, ‘‘कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे विकासासाठी भरपूर निधी हवा असेल तर माझ्याच बायकोला मते द्या. मी वाढपी आहे. कुणाला किती वाढायचे ते माझ्या हातात आहे, म्हणून सगळ्यांनी वाढप्याच्या पक्षात यावे.’’ अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून या धमक्या देत असतील तर निवडणूक आयोगाने त्यांच्या हकालपट्टीच्या सूचना द्यायला हव्यात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जाब विचारायला हवा. उपमुख्यमंत्रीपदावरील माणूस एका गुंडासारखे वर्तन करतोय व फडणवीस नावाचा गृहमंत्री त्या गुंडाच्या पाळण्यास झोके देत अंगाई गीत म्हणतोय. महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही अवस्था आहे. भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवून अजित पवारांसारखे शंभर लोक भाजपच्या आश्रयाला गेले आहेत आणि भाजपचे नेते मोदी हे ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’च्या घोषणा करीत आहेत, हे ढोंग आहे. निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात ‘वडस’ वाढल्याचे हे लक्षण आहे. बारामतीचा हा करामती पुतण्या 4 जूननंतर राजकारणातून नेस्तनाबूत झालेला दिसेल. त्यांचा व मिंधे गटाचा एकही खासदार निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत अजित पवारांची बायको दारुणपणे पराभूत होत आहे. अजित पवार व एकनाथ मिंधे यांचे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवीत आहेत. 4 जूननंतर हे पक्ष नागपुरात झाडलोट करताना दिसतील. तूर्त अजित पवारांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी निर्भयपणे पुढे जायला हवे. महाराष्ट्राचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे!