सामना अग्रलेख – अमेठी, रायबरेली, वाराणसी! जनता काय करेल?

मोदी यांची जुमलेबाजी आता चालणार नाही. विष्णूच्या तेराव्या अवताराचा पराभव काशीनगरीत करण्याचा विडा गांधी व अखिलेश यांनी उचलायला हवा. कारण हा तेरावा अवतार खरा नाही. हिंदू देवता भगवान विष्णूचे दहा प्राथमिक अवतार आहेत. आता भाजपने मोदींना तेरावे अवतार घोषित केले. मोदी हे मनुष्य नसून अवतार आहेत असे सांगणारे हिंदुत्वाचाच अपमान करतात. त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. अमेठी, रायबरेली आणि वाराणसीकडे देशाचे लक्ष आहे, हे काँग्रेसने विसरू नये.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने निर्देश दिल्यास आपण अमेठीतूनही लढू, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या निरागसतेचे हे लक्षण आहे. 2019 मध्ये अमेठीतून गांधी यांचा पराभव झाला. तेव्हापासून गांधी घराण्याच्या या परंपरागत मतदारसंघावरून गांधींचे मन उडालेले दिसते. या वेळी रायबरेली व अमेठी या गांधीछाप मतदारसंघांत गांधी घराण्यातील कुणीच लढणार नाहीत. राहुल गांधी हे केरळातील वायनाड येथून उमेदवार आहेत व तब्येतीच्या कारणामुळे सोनिया गांधी लोकसभा लढणार नाहीत. श्रीमती गांधी राज्यसभेत निवडून आल्या आहेत, पण गांधींशिवाय रायबरेली व अमेठी हे उत्तरेतील लोकसभा मतदारसंघ लोकांना मान्य नाहीत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा दिल्लीतील सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरतात. उत्तरेत अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची हातमिळवणी झाली आहे, पण मायावती म्हणजे ‘बसपा’चा हत्ती भयग्रस्त असल्याने त्याने वेगळा मार्ग निवडला आहे. उत्तरेतील गणित जमल्याशिवाय दिल्लीची बेरीज होत नाही, असे सांगितले जाते. आता यादव-गांधी युती झाली तरी स्वतः राहुल अमेठीत लढणार नाहीत. त्यामुळे यादव-गांधी हातमिळवणीचा घोडा पुढे जाणार नाही. राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली हे नक्कीच. ‘भारत जोडो’ यात्रेचे उत्तर प्रदेशात मोठे स्वागत झाले, पण काँग्रेसची संघटना विस्कळीत आहे. गांधी मैदानात असतील तरच त्यास गती येईल. काँग्रेसने या वेळी उत्तर प्रदेशात आठ-नऊ जागांची मजल मारली तर मोदी यांचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल. उत्तर प्रदेशात भाजपचा आकडा मोठाच राहील. तो किमान 20-25 ने कमी करता आला तरी मोदींच्या हुकूमशाहीची कबर खणलीच म्हणून समजा. अयोध्येतील श्रीराम भाजपला उत्तरेत मदत करतील असे चिन्ह नाही. मोदींची हवा नाही तशी श्रीराम

मंदिर निर्माणाचीही

हवा नाही, हे सत्य भाजपने स्वीकारले आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हे एक स्वतंत्र संस्थान आहे. या संस्थानास सुरुंग लावावा व योगी महाराजांना वसुंधराराजे, शिवराजमामा, रमणसिंह यांच्याप्रमाणे अस्थिर आणि कमकुवत करावे अशी मांडणी दिल्लीतील भाजप वर्तुळात सुरू आहे. त्या वादातून उत्तरेचे गणित भाजपचेच भास्कराचार्य बिघडवून ठेवतील. योगी यांना वाचवायचे असेल तर मोदी यांना घालवावे लागेल, अशा प्रकारचे वातावरण योगी यांना मानणाऱ्या मोठ्या जात समुदायात आहे. रजपूत, ठाकूर, यादव, दलित, ओबीसी, ब्राह्मण हे आपापले निर्णय घेऊन जातीनिहाय मतदान करतात व या वेळी हे गणित पक्के बसले तर मोदी यांना वाराणसीची निवडणूकही सोपी नसेल, ही काळ्या दगडावरची रेघ समजा. श्रीरामाला विरोध केल्यामुळेच काँग्रेसची अधोगती झाल्याचा प्रचार राजनाथसिंह यांच्यासारखे नेते उत्तरेत करतात, पण हा राम या वेळी भाजपच्या पाठीशी उभा राहताना दिसत नाही. मोदी यांचा करिश्मा व चेहऱ्यावरील चकाकी निस्तेज झाली आहे. मोदी हेदेखील गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून लढतात. या वेळी ते काय करतील? की वाराणसीत भय असल्याने वेगळा निर्णय घेतील? मोदी यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मोदी म्हणजेच भाजप हेच सत्य आहे. भाजपला फार तर 150 जागा मिळतील असे राहुल गांधी व अखिलेश यादव यांनी सांगितले. आतापर्यंत राहुल गांधी यांनी जे जे सांगितले ते खरेच ठरले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप दोनशे पार करत नाही हे एकंदरीत वातावरण पाहता स्पष्ट दिसते. भाजप हा राष्ट्रभक्तांचा पक्ष नसून भ्रष्टाचाराचे गोदाम आहे. जगातले सगळय़ात मोठे वसुली रॅकेट आहे. अशा

वसुली रॅकेटच्या सरदारांना

जनता पराभूत करेल. मोदी हे काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते, पण ‘मोदीमुक्त भाजप व भाजपमुक्त भारत’ असा नवा नारा देशात घुमू लागला आहे. मोदी घरच्याच वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. एखादी जाहीर पत्रकार परिषद घेऊन देशाशी संवाद साधावा, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असे मोदींना कधीच वाटले नाही. कारण तेवढा आत्मविश्वास या माणसाकडे नाही. मोदी यांनी एका घरच्याच महिला पत्रकारास दिलेली मुलाखत म्हणजे ‘फ्लॉप शो’ असल्याचा बांबू राहुल गांधी यांनी घातला, तरीही अमेठीचे काय? हा प्रश्न राहतोच. वरुण गांधी यांना भाजपने दूर केले आहे. अमेठी ही संजय गांधींची जागा आहे. म्हणजे गांधी परिवाराची सुरुवात अमेठीतून संजय गांधी यांनीच केली. संजय यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी अमेठीत आले. रायबरेलीत इंदिरा गांधी होत्या व नंतर सोनिया गांधी आल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला तर वाराणसी व अमेठी या मतदारसंघांचा निकाल वेगळा लागू शकेल. वाराणसीतून प्रियंका गांधी लढणार आहेत असे काँग्रेसने फक्त जाहीर केले तरी विश्वगुरूंचे पाय लटपटतील. काँग्रेसने फक्त धाडसाने पुढे जायला हवे. पक्षाने सांगितले तर ‘करू’ हे बोलणे शिस्तीच्या चौकटीतले झाले, पण गांधी म्हणजेच काँग्रेस पक्ष हेच धोरण आजही आहे व लोकांनी ते स्वीकारले आहे. मोदी यांची जुमलेबाजी आता चालणार नाही. विष्णूच्या तेराव्या अवताराचा पराभव काशीनगरीत करण्याचा विडा गांधी व अखिलेश यांनी उचलायला हवा. कारण हा तेरावा अवतार खरा नाही. हिंदू देवता भगवान विष्णूचे दहा प्राथमिक अवतार आहेत. आता भाजपने मोदींना तेरावे अवतार घोषित केले. मोदी हे मनुष्य नसून अवतार आहेत असे सांगणारे हिंदुत्वाचाच अपमान करतात. त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. अमेठी, रायबरेली आणि वाराणसीकडे देशाचे लक्ष आहे, हे काँग्रेसने विसरू नये.