सामना अग्रलेख – जगा आणि जगू द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉक डाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका!

कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व अॅम्युझमेंट पार्कसुद्धा उघडली जात आहेत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत. देवळेही बंधमुक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क पर्ह्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या प्रिय पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ असा दिव्य संदेश दिलाच होता. पण थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही व कोरोनामुळे जशा जागोजाग चिता पेटल्या तशी गंगेच्या प्रवाहातही शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे

थाळ्या आणि घंटा यापेक्षा

विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते. महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉक डाऊनचे टाळे उघडता आले. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱया लाटेचा धोका कायम आहे, असा इशारा कालच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. नागरिकांनी अजिबात बेसावध राहू नये, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले ते योग्यच आहे. निर्बंध हे साखळदंडासारखेच असतात. विशेषतः कामधंद्यासाठी बाहेर पडावेच लागते, अशा मोठय़ा समाजवर्गास घरातच जखडून ठेवणे हे म्हणजे त्यांच्या रोजीवरच संकट ठरते. लॉक डाऊन काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय बंद पडले ही चिंतेचीच बाब आहे. मनोरंजनाचा मोठा व्यवसाय कोसळला आहे. मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर लाखो लोक अवलंबून आहेत. चित्रपटाची मायानगरी हे मुंबईचे वैभव आहे. ते वैभवच मधल्या काळात झाकोळून गेले. पडद्यामागच्या अनेक कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या चुली विझल्या. सिनेमागृहे, नाटय़गृहे ओस पडली. त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेकार झाले. मराठी नाटय़सृष्टीलाही धक्काच बसला. आता या सगळ्यातून

उभे राहायचे असले तरी

ते सोपे नाही. लोकांना सिनेमा आणि नाटय़गृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे, हे मोठेच आव्हान आहे. मराठी नाटक हे आपल्या संस्कृतीचे गौरवस्थान आहे. मराठी रंगभूमीचे एक म्युझियम सरकार मुंबईत उभे करीत आहे. मराठी भाषा भवनही उभारणार आहेत. ते चांगलेच आहे. पण मराठी सिनेमा, मराठी नाटक हा जो मराठी संस्कृतीचा कणा आहे तोच मोडून पडला आहे. त्यांना विशेष आधाराची गरज आहे. जे नाटक सिनेमांचे तेच हॉटेल्स, रेस्टॉरंटवाल्यांचे. मुंबई चोवीस तास जागी आहे असे म्हणतात ते याच खाद्य संस्कृतीमुळे, पण लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील हा जिताजागता व्यवसायही बंद पडला. रेस्टॉरंट, जागोजागचे गजबजते ढाबे बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता हा व्यवसाय नव्याने सुरू होत असला तरी पोलीस व स्थानिक प्रशासनाने या व्यावसायिकांचे फालतूचे शोषण करू नये हीच अपेक्षा. कायद्याचे बडगे दाखवणे वगैरे ठीक, पण कायद्याचे बडगे दाखवून गरीबांचे रोजगार बंद पडत असतील तर ते माणुसकीला धरून नाही. देवळांचेही एक अर्थकारण असते. अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे. पोलीस, प्रशासन यांचेही काम त्यातून भागत असते हे आडपडदा ठेवून सांगायची गरज नाही. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका!