सामना अग्रलेख – स्फोट आणि आग, दुर्घटनांची टांगती तलवार

1993

मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि डोंबिवली येथील औद्योगिक वसाहती स्फोटांच्या कडय़ावर आहेत; तर बहुमजली इमारती, तारांकित हॉटेल्स आणि इस्पितळांना आगीचा धोका आहे. मुंबईमध्ये तर मागील फक्त तीन वर्षांत 47 हजारांवर आगीच्या दुर्घटना घडल्या. पुन्हा अग्निसुरक्षेबाबतची सावधानता, जागरूकता आणि उपाययोजना याबाबत सर्वत्र आनंदीआनंदच आहे. आपत्कालीन नियंत्रण व्यवस्थापन असो की इमारतींचे फायर ऑडिट, अग्निसुरक्षेच्या अद्ययावत यंत्रणा असोत किंवा इतर गोष्टी, एखाद्या दुर्घटनेनंतर त्यावर फक्त चर्चा होते. स्फोट आणि आग ही मुंबईपासून पालघर. डोंबिवलीपर्यंत दुर्घटनांची टांगती तलवार बनली आहे. ती दूर करायला हवी.

माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी भीषण आग लागली. त्यापाठोपाठ मंगळवारी डोंबिवली येथील औद्योगिक वसाहत रासायनिक स्फोटांनी हादरली. माझगावच्या आगीचे कारण अद्यापि नेमके कळू शकलेले नाही. चौकशीनंतर ते समजेलच, पण डोंबिवली आणि केमिकल स्फोट हे समीकरण मात्र मंगळवारच्या दुर्घटनेने पुन्हा एकदा समोर आले. डोंबिवली एमआयडीसी ‘फेज 2’मधील मेट्रो पोलिटीन या रासायनिक कंपनीच्या गोदामाला दुपारी अचानक आग लागली. आतील रासायनिक पदार्थ असलेल्या ड्रम्सचे भीषण स्फोट झाले. या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी त्यामुळे या घटनेच्या परिणामांचे गांभीर्य कमी होत नाही. डोंबिवली एमआयडीसी आणि भयंकर दुर्घटना हे मागील काही वर्षांतील एक समीकरणच बनले आहे. कधी आगीच्या दुर्घटना, कधी बॉयलरचे तर कधी रासायनिक पदार्थांचे स्फोट, कधी रासायनिक प्रदूषणाचा उद्रेक असेच प्रकार डोंबिवली परिसरात घडत असतात. त्यात कधी जीवितहानी होते, कधी होत नाही, परंतु परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका कायमच राहतो.

कधी कुठल्या ‘ज्वालामुखी’चा उद्रेक होईल आणि कोणाच्या जिवावर बेतेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. पुन्हा फक्त दुर्घटनांचा धोका आहे असे नाही, तर रासायनिक प्रदूषणाचा फासदेखील आहेच. त्यातून कधी डोंबिवली एमआयडीसीत हिरवा पाऊस पडतो, कधी तेथील रस्ते गुलाबी होतात. कधी धूर तर कधी प्रदूषित हवा या समस्या पाचवीलाच पुजल्या आहेत. मंगळवारी मेट्रो पोलिटीन कंपनीच्या गोदामात झालेली दुर्घटना चार वर्षांनी झालेली पहिलीच दुर्घटना आहे हा काही बचाव होऊ शकणार नाही. मुळात हे स्फोटांचे भूत डोंबिवलीकरांच्या मानेवरून कधी उतरणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अपघात आणि दुर्घटना कधी होतील हे सांगता येत नाही किंवा त्या 100 टक्के रोखता येत नाहीत हे मान्य; पण त्या घडण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे.

औद्योगिक वसाहती या जनतेच्या ‘पोटाचे साधन’ आहेत. त्या ‘स्फोटा’चे साधन होऊ लागल्या तर कसे व्हायचे? तारापूर औद्योगिक वसाहत काय किंवा डोंबिवली औद्योगिक वसाहत काय, रोजगारनिर्मितीपेक्षा आग, स्फोट, विषारी वायुगळती अशा दुर्घटनांमुळे बदनाम झाल्या आहेत. कधी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र नसलेले उत्पादन अपघाताला निमित्त ठरते तर कधी मानवी गफलत एखाद्या भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरते. पुन्हा या कारखान्यांच्या वायू आणि जलप्रदूषणामुळे येथील भूगर्भ किंवा विहिरीदेखील ‘गॅस चेंबर’ बनल्या आहेत. त्यातून सफाई कामगारांचे हकनाक बळी जात असतात. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि डोंबिवली येथील औद्योगिक वसाहती स्फोटांच्या कडय़ावर आहेत; तर बहुमजली इमारती, तारांकित हॉटेल्स आणि इस्पितळे आगीच्या भीतीखाली आहेत. मुंबईमध्ये तर मागील फक्त तीन वर्षांत 47 हजारांवर आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यात 600 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. पुन्हा एवढय़ा दुर्घटना घडत असूनही अग्निसुरक्षेबाबतची सावधानता, जागरूकता आणि उपाययोजना याबाबत सर्वत्र आनंदीआनंदच आहे. आपत्कालीन नियंत्रण व्यवस्थापन असो की इमारतींचे फायर ऑडिट, अग्निसुरक्षेच्या अद्ययावत यंत्रणा असोत किंवा इतर गोष्टी, एखाद्या दुर्घटनेनंतर त्यावर फक्त चर्चा होते. स्फोट आणि आग ही मुंबईपासून पालघर. डोंबिवलीपर्यंत दुर्घटनांची टांगती तलवार बनली आहे. ती दूर करायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या