संपादकीय : देशाचा निष्ठावान वकील!

अरुण जेटली यांची दूरदृष्टी भविष्यकालीन परिस्थितीचा अचूक वेध घेत असे. मोदी यांच्यासाठी दिल्लीचा रस्ता तयार करण्यामागे त्यांची हीच दूरदृष्टी होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक पक्षांना त्यांचा आधार वाटत असे. शिवसेनेचे तर ते मित्रच होते. जेटली यांच्या जाण्याने देशाने बरेच काही गमावले आहे. राष्ट्रहित व हिंदुत्वाची बाजू मांडणारा एक निष्ठावान वकील काळाच्या पडद्याआड गेला. त्या अर्थाने ते देशाचीच वकिली करीत होते. आमच्या लाखो शिवसैनिकांतर्फे अरुण जेटली यांना श्रद्धासुमने अर्पण करीत आहोत.

हिंदुस्थानच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व अरुण जेटली काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेले वर्षभर ते आजारी होते. आठ दिवसांपासून ते ‘एम्स’ रुग्णालयात दाखल होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. पण अखेर जेटली आपल्या सगळ्यांना सोडून गेले आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या धक्क्यातून देश अद्यापि सावरलेला नाही. स्वराज यांच्या श्रद्धांजलीच्या बातम्यांची शाई अद्याप सुकली नाही तोच काळाने अरुण जेटली यांना आपल्यातून खेचून नेले आहे. मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये जेटली अर्थमंत्री होते, दुसऱ्या सरकारमध्ये ते कोणीच नव्हते. त्यांनी स्वतःच सरकारमध्ये कोणतेही पद स्वीकारण्यास असमर्थता दाखवली व दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केला. त्यांची प्रकृती ढासळत होती व जागा अडवून ठेवणे त्यांच्या स्वभावात नव्हते. जेटली यांनी राजकारणात जी नीतिमूल्ये पाळली त्यांचा पुरस्कार शेवटपर्यंत केला. जेटली विद्यमान सरकारमध्ये कोणीही नव्हते तरीही त्यांच्या जाण्याने सरकारची व देशाची मोठी हानी झाली आहे. संकटकाळी चक्रव्यूह भेदून विजय प्राप्त करून देणारा एक योद्धा निघून गेला. जेटलींचे मोठेपण त्यांनी भूषवलेल्या पदांवर अवलंबून नव्हते. त्यांचा व्यासंग, कायदा, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, न्यायदान व राजकीय व्यवस्थापनावर त्यांची जी पकड होती त्यामुळे देशाच्या राजकारणात जेटली हे मोठे प्रस्थ बनले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा संघर्ष जीवनाच्या अंतापर्यंत राहिला. आणीबाणीत त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयात बंडाची ठिणगी टाकली. त्यांना तुरुंगात जावे लागले. दिल्लीतील विद्यार्थी चळवळीचे ते नेते होते. अरुण जेटली यांचा पिंड लढवय्या होता. मग ते राजकारण असो, संसद असो नाहीतर न्यायालय. हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेतील ते सर्वोच्च वकील होते. हाच वकिली बाणा त्यांना राजकारणातही उपयोगी ठरला. विरोधी पक्षात असताना त्यांनी सत्ताधाऱयांची भंबेरी उडवली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ‘मनमोहन’ सरकारला फक्त आरोपीच्या पिंजऱयात उभे केले नाही, तर भ्रष्टाचार व राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर जेटली यांच्या उलटतपासणीस तोंड देताना सरकार हतबल झाले होते. लोकसभेत सुषमा स्वराज व राज्यसभेत जेटली यांनी काँग्रेस आघाडी सरकारची पाठ भिंतीलाच लावली होती. हा तो काळ होता जेव्हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला नव्हता. अमित शहा यांना गुजरातमध्ये येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. एका प्रकरणात शहा यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठी केंद्रातील तत्कालीन सरकार रोज नवा पेच टाकत होते. मोदी व शहा हे खूंखार गुन्हेगार आहेत व त्यांना कायदेशीर मदत मिळविण्याचा हक्क नाही. गुजरातमधील गोध्राकांडाचे खरे गुन्हेगार मोदी व शहाच आहेत असे चित्र विरोधक व स्वयंसेवी संस्थांनी जागतिक पातळीवर रंगवले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांना अमेरिकेने व्हिजा नाकारण्यापर्यंत मजल गेली. या संकटसमयी अरुण जेटली यांनी मोदी व शहा यांच्यासाठी कायदेशीर लढा दिला. त्याच वेळी मरगळलेल्या भाजपला व राष्ट्रीय लोकशाही आघाडीस उभारी द्यायची असेल तर नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या मंचावर यावे या विचाराची ठिणगी त्यांनी टाकली. भाजपच्या मंचावरून त्यांनी हा विचार मांडला. आज भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील जे यश आहे त्यास आकार देण्यात जेटली यांचे योगदान होते हे कुणालाच नाकारता येणार नाही. जेटली यांचे तर्क बिनतोड होते. सहसा ते कुणाच्या वाटेला जात नव्हते, पण कुणी अंगावर आलेच तर समोरच्याचे पुरते वस्त्रहरण केल्याशिवाय राहत नव्हते. काँग्रेससारख्या पक्षांना तर अरुण जेटली स्वप्नात दिसत व ते दचकून जागे होत. 2014 च्या निवडणुकीआधी नरेंद्र मोदींच्या पत्नीचा उल्लेख उमेदवारी अर्जात मिळताच काँग्रेस नाचू लागली व बदनामी सुरू केली. जणू एक हत्यारच त्यांच्या हाती मिळाले. संपूर्ण ‘भाजप’ तोंडावर बोट ठेवून बसली असतानाच

अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या 

कंबरड्यात अशी लाथ घातली की विचारता सोय नाही. जेटली कडाडले, ‘‘असलेल्या बायकोचा उल्लेख मोदी यांनी केला यावर इतका गोंधळ? आपलेच एक माजी पंतप्रधान ‘असलेली’ बायको सोडून ‘नसलेली’ ती देखील ‘दुसऱ्याची’ जन्मभर मिरवत होते त्याचा स्फोट करू काय?’’ असा घाव घालण्यात जेटली माहीर होते. सगळ्यांच्या कुंडल्या घेऊन आणि कुंडल्यांचा अभ्यास करून जेटली उभे राहत! मोदी यांचे राजकारणातील वकील म्हणून ते बेडरपणे वावरले. सुरुवातीची पाच वर्षे मोदी यांना दिल्ली नवीन होती. तेव्हा मोदी यांचे खंदे समर्थक व संकटमोचक म्हणून जेटली उभे राहिले. संसदेतील मोदीविरोधी वादळाचे तडाखे त्यांनी झेलले व सरकारला तडा जाऊ दिला नाही. जेटली हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळातही होते. आडवाणी गटातले म्हणून त्यांच्यावर शिक्का बसला, पण तो त्यांच्यावर अन्याय होता. त्यांचे चातुर्य आणि वक्तृत्व, सर्व थरांतील संपर्क यामुळे ते प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपमधील सर्वात प्रभावी नेते ठरले. मोदी मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण आणि अर्थ ही दोन महत्त्वाची खाती सांभाळली. संसदेत ते एखाद्या अजिंक्य पहाडासारखे उभे राहत. त्यांनी एखाद्या विषयावर व्यक्त केलेले मत गांभीर्याने घेतले जात असे. न्यायालये मर्यादा ओलांडत आहेत व नको त्या क्षेत्रात लुडबूड करीत आहेत असे मत त्यांनी मांडले तेव्हा खळबळ उडाली. कारण जेटली हे उच्च दर्जाचे कायदेपंडित हाते. अर्थमंत्री म्हणून परदेशातील काळा पैसा हिंदुस्थानात आणण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला त्यांनीच सुरुवात केली. त्यासाठी ‘मनी लॉण्डरिंग’सारखे अर्थविषयक कायदे अधिक कठोर केले. ‘जीएसटी’ हे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे पाऊल होते. ‘जीएसटी’ म्हणजे सर्व देशाला एकच करप्रणाली. या कायद्याची निर्मिती व अंमलबजावणीत जेटली यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अनेक राज्यांचा विरोध असतानाही

फक्त जेटली यांच्यामुळेच 

विरोध करणाऱ्यांची मने शांत झाली. मुंबईसारख्या शहराचे ‘जीएसटी’मुळे नुकसान होत आहे हे शिवसेनेने त्यांना पटवून देताच जेटली यांनी ‘‘मुंबई महानगरपालिकेचे नुकसान होणार नाही, भरपाई मिळेल’’ हा दिलेला शब्द खरा केला. जेटली यांची भूमिका समन्वयाची असे. करदात्यांच्या खिशात जास्त पैसा पडायला हवा, हे त्यांचे सांगणे होते. करदात्यांच्या खिशात जास्त पैसा गेल्याने तो अधिक खर्चही करू शकेल. त्यामुळे अप्रत्यक्ष कर जास्त प्रमाणात जमा होईल असे जेटली यांचे ठाम मत होते. जेटली हे व्यवसायाने कायदेपंडित, पण सुरुवातीला त्यांना चार्टर्ड अकाउंटंट बनायचे होते. ते ‘सीए’ झाले नाहीत, पण अर्थमंत्री म्हणून देशाचे चार्टर्ड अकाउंटट मात्र झाले. त्यांच्याइतके सोपे अर्थकारण याआधी कुणीच समजावून सांगितले नव्हते. ते माहिती व प्रसारण मंत्री होते. कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्री होते. देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. वकील म्हणून त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यामुळे ते टीकेचेही धनी झाले. कायदा क्षेत्रातील त्यांचे स्थान मोठे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी पोहोचू शकले असते, पण सार्वजनिक जीवनात उतरले. नैतिकता व सामाजिक मूल्यांची बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत जपली. वृत्तपत्रांत त्यांचे संबंध स्नेहाचे होते. त्यांच्याभोवती दिवसा पत्रकारांचा घोळका, तर संध्याकाळी मीडिया मालकांचा गराडा असे. ते स्वभावाने प्रेमळ व उदार होते, पण अनेकदा कठोरही होत. अरुण जेटली यांची दूरदृष्टी भविष्यकालीन परिस्थितीचा अचूक वेध घेत असे. मोदी यांच्यासाठी दिल्लीचा रस्ता तयार करण्यामागे त्यांची हीच दूरदृष्टी होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक पक्षांना त्यांचा आधार वाटत असे. शिवसेनेचे तर ते मित्रच होते. जेटली आता आपल्यात नाहीत; परंतु त्यांच्या चैतन्याचा आपल्याला सतत प्रत्यय येईल. राज्यघटनेची प्रतिष्ठा जपण्याबाबत जेटली यांनी सदैव दाखविलेली जागरूकता ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हटली पाहिजे. जेटली यांच्या जाण्याने देशाने बरेच काही गमावले आहे. राष्ट्रहित व हिंदुत्वाची बाजू मांडणारा एक निष्ठावान वकील काळाच्या पडद्याआड गेला. त्या अर्थाने ते देशाचीच वकिली करीत होते. आमच्या लाखो शिवसैनिकांतर्फे अरुण जेटली यांना श्रद्धासुमने अर्पण करीत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या