सामना अग्रलेख – खरे नमक हराम कोण?

संरक्षण खात्यातील गुपिते पाकिस्तान म्हणजे शत्रू राष्ट्राला पुरवणारे लोक संरक्षण खात्यात कार्यरत होते. त्यांना अटक झाली व त्यांचा संघाशी संबंध उघड झाला. या सगळ्याचे समर्थन गिरीराजसारखे लोक करतात व अशा नमक हरामांच्या पाठीशी उभे राहतात याचे आश्चर्य वाटते. मुसलमानांना नमक हराम म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद आहे, पण ज्यांच्याविरोधात दहशतवादी म्हणून हंबरडा फोडला त्या अफगाण- तालिबान्यांसाठी दिल्लीत पायघड्या घालण्याचे काम काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केले. तालिबान्यांना बळ देणारे भारतातील मुसलमानांना नमक हराम म्हणतात. छान, दुसरे काय!

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नेहमीप्रमाणेच मुस्लिम समुदायावर घाणेरड्या पद्धतीने वक्तव्य केले आहे. गिरीराज सिंह यांची वक्तव्ये हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करणारी असतात. त्यासाठीच त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारात गिरीराज सिंह यांनी सांगितले की, ‘आम्हाला नमक हरामांची मते नकोत.’ हे आम्ही कोण? तर भाजप. मते का नकोत? तर मुस्लिम नागरिक सरकारच्या सर्व योजनांचे लाभ घेतात, पण आम्हाला मतदान करीत नाहीत. ही नमक हरामी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गिरीराज सिंह यांचे हे विधान भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. सरकारच्या योजना या देशातील सर्व जनतेसाठी, नागरिकांसाठी असतात. एखाद्या विशिष्ट जात-धर्माच्या समुदायासाठी नसतात, हे केंद्रात मंत्री असलेल्या गिरीराज सिंह यांना समजायला हवे. मोदी अनेकांची शाळा घेतात, पण गिरीराज सिंह यांच्यासारख्यांची शाळा ते घेऊ शकत नाहीत. कारण मोदी यांनाच ही अशी धर्मांध आणि बेताल वक्तव्ये केलेली हवी आहेत. गोध्रा कांडातून ज्यांची राजकारणाची दौड सुरू झाली त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने देशातील 20 कोटी मुस्लिम नागरिकांना नमक हराम म्हटले, हे पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे काय? भाजपचे राजकारण हिंदू-मुसलमानांतील तेढ आणि वैर यावर अवलंबून आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे या लोकांना वावडे आहे. देशात 20-22 कोटी मुसलमान आहेत व ते या

देशाचे अधिकृत नागरिक

आहेत. या मुसलमानांचे करायचे काय याविषयीची काही ठोस योजना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे आहे काय? त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व मुसलमान नमक हराम आहेत, कारण ते भाजपला मतदान करीत नाहीत. पण मग सर्व हिंदू भाजपला मतदान करतात या भ्रमात गिरीराज सिंह आहेत काय? प. बंगाल, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांतील हिंदू लोकांनी भाजपला मतदान केले नाही. राजस्थानातील निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले. पण त्यांचे आमदार मोठय़ा संख्येने निवडून आले. काँग्रेसला मतदान करणारे हिंदूच आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य हिंदूंनी भाजपविरोधात मतदान केले. पुढे विधानसभेत मतचोरी करून भाजपने सत्ता मिळवली, पण भाजपच्या विरोधात महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे हिंदू आहेच. म्हणजे मुसलमानांप्रमाणे हे सर्व हिंदू एक नंबरचे नमक हराम म्हणावे लागतील, असे उद्या भाजपचे गिरीराज छाती पिटून सांगतील. कारण केंद्र सरकारकडून सर्व योजनांचा लाभ ते घेतात व भाजपला मते देत नाहीत. त्यामुळे या सर्व हिंदूंना गिरीराज सिंह फासावर लटकवणार आहेत काय? केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा भाजपच्या तिजोरीतला पैसा नाही. तो जनतेच्या करातून आलेला पैसा आहे. गिरीराज यांचे धोतर झाडून हे पैसे पडत नाहीत. त्यामुळे देशाच्या तिजोरीचे मालक असल्याप्रमाणे भाजपच्या मंत्र्यांनी वागू नये. मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरला. अनेक मुसलमान क्रांतिकारक फासावर गेले. गिरीराज सिंह यांचे बापजादे स्वातंत्र्यासाठी कधी

लढले असतील तर

त्यांनी तसे सांगावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर स्वातंत्र्यलढय़ातून पळ काढला. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे नेते तर स्वातंत्र्यलढ्यात ‘चले जाव’सारख्या चळवळी ब्रिटिशांनी पोलिसी बळाचा वापर करून चिरडून टाकाव्यात अशा मताचे होते. पाकधार्जिण्या सुहरावर्दीच्या नेतृत्वाखालील बंगालच्या मंत्रिमंडळात मुखर्जी होते. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यासाठी कोणताच लढा दिला नाही. अखंड भारत टिकवण्याची लढाई देण्यापूर्वीच या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्य करून टाकला. पहलगाम येथे पाक दहशतवाद्यांनी 26 हिंदूंचे हत्याकांड केले. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, पण बदला पूर्ण होण्याआधीच पाकिस्तानविरुद्धचे युद्ध थांबवले. प्रे. ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी दिल्यामुळे मोदी यांनी युद्धातून माघार घेतली. यास कोणत्या प्रकारची नमक हरामी म्हणायची ते गिरीराज सिंह यांनी स्पष्ट केले पाहिजे. संरक्षण खात्यातील गुपिते पाकिस्तान म्हणजे शत्रू राष्ट्राला पुरवणारे लोक संरक्षण खात्यात कार्यरत होते. त्यांना अटक झाली व त्यांचा संघाशी संबंध उघड झाला. या सगळ्याचे समर्थन गिरीराजसारखे लोक करतात व अशा नमक हरामांच्या पाठीशी उभे राहतात याचे आश्चर्य वाटते. मुसलमानांना नमक हराम म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद आहे, पण ज्यांच्याविरोधात दहशतवादी म्हणून हंबरडा फोडला त्या अफगाण- तालिबान्यांसाठी दिल्लीत पायघड्या घालण्याचे काम काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केले. तालिबान्यांना बळ देणारे भारतातील मुसलमानांना नमक हराम म्हणतात. छान, दुसरे काय!