
चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 80 हजार वर्ग फूट जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.
पीडीपीच्या अध्यक्षा व आझाद कश्मीरच्या समर्थक मेहबुबा मुफ्ती यांनी सरळ भारतीय सार्वभौमत्वालाच आव्हान दिले. श्रीमती मुफ्तींकडून त्यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर कश्मीरचा ध्वज फडकवला. तिरंग्याच्या बाजूला कश्मीरचा ध्वज, असे हे चित्र आहे. कश्मीरातून 370 कलम रद्द केले, तसा हा त्यांचा स्वतंत्र ध्वजही रद्द केला. मोदी व अमित शहा प्रभृतींनी कश्मीर आता शंभर टक्के हिंदुस्थानचे अविभाज्य अंग झाल्याचे जाहीर करून आनंदोत्सवही साजरे केले, पण कश्मिरी पंडितांचे हाल असोत की फुटीरतावाद्यांचे दळभद्री खेळ, काहीच बदलल्याचे दिसत नाही. फुटीरतावादी संघटनांचे विषारी नाग फूत्कार सोडीतच आहेत. गंमत अशी की, पंतप्रधान मोदींनी रविवारीच ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले होते की, ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने लोकचळवळीचे रूप धारण केले आहे.’ यावेळी त्यांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्टदरम्यान त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर तिरंग्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी जे सांगितले त्याच्याविरुद्ध वर्तन मेहबुबा यांनी केले व हिंदुस्थान सरकारने बंदी घातलेला कश्मीरचा ध्वज फडकवून दाखवला. मेहबुबा यांचे म्हणणे आहे की, त्यांचा ध्वज जम्मू-कश्मीरमधून हटविण्यात आला असेल, परंतु कश्मीरवासीयांच्या मनांतून व सामूहिक जाणिवेतून हा कश्मिरी ध्वज हटवला जाऊ शकत नाही. मेहबुबा यांचे हे म्हणणे मोदी व त्यांच्या लोकांसाठी आव्हान आहे. हे आव्हान मोदी व त्यांचे सरकार कसे स्वीकारणार? याच मेहबुबांशी कधीकाळी भाजपचा गोडगुलाबी मधुचंद्र सुरू होता व त्या काळात प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद वगैरे वस्त्र त्यांनी अंतपुरातील खुंटीस टांगून ठेवली होती. ही वस्त्र दाराबाहेर फेकून मेहबुबा यांनी त्यांच्या मूळ भूमिकेचा नगारा वाजविण्याचे काम आता सुरू केले आहे. प्रश्न इतकाच आहे की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार
कश्मीरचा झेंडा फडकविणाऱ्या
त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांवर काय कारवाई करणार? एका बाजूला मोदी सरकार सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत अशा आपल्या राजकीय विरोधकांवर खोटय़ा-बनावट कारवाया करून कर्तव्यदक्षतेचा आव आणीत आहे. आता तर स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान दिलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’लाच सीलबंद करून ‘ईडी’वाल्यांनी त्यांचा झेंडा तेथे फडकवला. या सीलबंद कारवाईनंतर सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवला, पण कश्मीरचा ध्वज फडकवून देशालाच आव्हान देणाऱ्या श्रीमती मेहबुबांबाबत केंद्र सरकारचे शेपूटघाले धोरण का? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सध्या जे राजकीय उत्सवी स्वरूप चालवले जात आहे ते त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो, पण मोदींच्या राज्यात एक महिला पुढारी फुटीरतेचा ध्वज फडकवूनही मोदी-शहा गप्प कसे? की कायद्याचे बडगे फक्त तुमच्या राजकीय विरोधकांची नरडी बंद करण्यासाठीच आहेत, हे एकदा स्पष्ट सांगा. एक देश, एक संविधान, एक निशाण हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मंत्र असायला हवा. त्याला छेद देण्याचे काम कश्मीरात घडले आहे. भारतीय जनता पक्षाला मेहबुबा आजही चालतात, पण हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी शिवसेना संपून जावी असा त्यांचा उद्योग आहे. कश्मीरातही ते फुटिरांनाच बळ देत आहेत व महाराष्ट्रातही ते फुटिरांनाच महाबळ देत आहेत, तेसुद्धा हिंदुत्वाच्या नावाने. यासारखे ढोंग ते कोणते? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही भाजपची वैयक्तिक चळवळ झाली आहे. वास्तविक अमृत महोत्सवात देशातील अन्न-वस्त्र्ा-निवाऱ्याचे प्रश्न कायम आहेत. मुख्य म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा गळा रोज घोटला जात आहे. ‘नॅशनल हेराल्ड’चे कार्यालय सील करणे हा तर स्वातंत्र्य लढय़ाच्या महान पर्वाचा खून करण्याचाच प्रकार आहे. कश्मीरात पंडितांचे पलायन आणि हत्या सुरू आहेत. फुटीरतावादी समाजमाध्यमांवर त्यांचे झेंडे फडकवीत आहेत आणि दिल्लीत
स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या
‘यंग इंडिया’, ‘नॅशनल हेराल्ड’लाच टाळे ठोकले जात आहे. मुंबईत संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अडकवून ‘सामना’चा आवाज व लढा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘हेराल्ड’ व ‘सामना’ ही दोन्ही माध्यमे प्रखर राष्ट्रवादी आहेत हे महत्त्वाचे, पण कधीकाळी भाजपच्या गळय़ात गळा घालून राजकारण करणाऱ्या, फुटीरतावादाचे विष आजही पेरणाऱ्या आणि आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर ‘कश्मीर’चा ध्वज फडकविणाऱ्या मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रातील सरकारमध्ये नाही. हिमतीचेच म्हणायचे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाकने गिळलेल्या आमच्या कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे होते. सोबत महाराष्ट्रातील नवमर्द शिंदे, केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे होते. भाजपच्या नादास लागून शिवसेनेत फूट पाडल्यापासून या ‘नवमर्द’ गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या सुरसुरी फुटीर गटासह पाकव्याप्त कश्मीरात पाऊल ठेवून देशासमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. हे आम्ही का सांगतोय? की चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.