सामना अग्रलेख – चीन-पाकडय़ांचा हैदोस! हिंदुस्थान काय करणार?

चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या फेऱ्यामोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची अलोकशाहीराजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.

हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे. उलट अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे व त्यामुळेच कश्मीर खोऱ्यांतील हिंसाचार वाढला आहे. मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. एकाच वेळी

पाच जवानांना कंठस्नान

घातले जाते. निरपराध हिंदू पंडितांना, कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जाते. त्याचा बदला घेतला नाही तर आपल्या भूमीवर सांडलेले रक्त आणि अश्रू वायाच गेले असे होऊ नये. इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत. पाकिस्तानातून घुसखोरी सुरूच आहे व कश्मीर खोऱ्यातील स्थिती तप्त पाण्यासारखी खदखदत आहे. कश्मीर खोऱ्यातील 370 कलम हटवले खरे, पण सैन्य हटविण्यासारखी स्थिती अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. देशात किसानही सुरक्षित नाही व जवानही बलिदानच देत आहेत. जे कश्मीरात तेच चीनच्या सीमेवर. पूर्व लडाखमध्ये घुसविलेले सैन्य माघारी घ्यायला चीन तयार नाही. दोन देशांतील चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत, पण तोडगा निघायला तयार नाही. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने तळ ठोकून आहे. उत्तराखंडमधील बाराहोती क्षेत्रात, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. यांगत्झे भागात दोन देशांचे जवान मागच्याच आठवडय़ात समोरासमोर आले व गलवान व्हॅलीप्रमाणे रक्तपाताची पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. हे प्रकार वाढले आहेत व चीन कोणताही करारमदार पाळायला तयार नाही. चीनचे अधिकारी चर्चेला बसतात, चर्चा लांबवतात, पण शेवटी

त्यांना हवे तेच

करतात. कोणत्याही रचनात्मक सुधारणा मान्य करायला चीन तयार नाही. पूर्व लडाखवर चीन त्याचा हक्क सांगतो व चीनने मुजोरपणाने एकतर्फी घुसखोरी केली आहे. चीन हा एक नंबरचा साम्राज्यवादी आहे. साम्राज्यवादी असायला हरकत नाही, पण सभ्यता, सुसंस्कृतपणाशी चीनचा उभा दावा असल्याने त्याच्या साम्राज्यवादी विचारांना गल्ली गुंडगिरीचा माज आहे. चीन त्याच्या विस्तारासाठी शेजारच्या राष्ट्रांतील दहशतवादास पाठिंबा देतो. चीन अमली पदार्थांच्या व्यापारास पाठिंबा देतो. चीन शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत झगडय़ात नाक खुपसून माओवाद विस्तारायच्या नावाखाली शस्त्र्ा व अर्थपुरवठा करतो. चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या ‘फेऱ्या’ मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या