सामना अग्रलेख – टक्का का घसरला?

जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का घसरला तेव्हा तेव्हा देशात परिवर्तन झाले. आताही मतदानाची घसरलेली टक्केवारी मोदी-शहांना घरी पाठवेल असेच संकेत देत आहे. भाजप ‘चारशेपार’चा नारा देऊन फसली आहे, पण लोक त्यांना दोनशेच्या आतच रोखतील हे मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच नक्की झाले. हे सरकारचे व पक्षपाती निवडणूक आयोगाचे अपयश आहे. मतदानाचा टक्का घसरला, 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदार देशाचे सरकार निवडणार आहेत, हे गांभीर्याने घेणे कुणास जमत नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी लोकांमध्ये खोटेपणाची हवा भरली. ती हवा 2024 सालात निघाली आहे. मतदानाचा पडलेला टक्का हा भाजपसाठी इशारा आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही. हवाबाज नरेंद्र मोदी यांनी मतदारांत हवा भरण्याचा प्रयत्न केला, पण मोदी यांच्या सभाही पडल्या. त्याचेच प्रतिबिंब मतदानाच्या पहिल्या टप्प्यात जाणवले. मतदारांत कमालीची निराशा दिसली. हे चित्र भारतीय जनता पक्षाच्या ‘चारशेपार’ रथासाठी चांगले नाही व पहिल्याच टप्प्यात भाजप रथाचे घोडे अडले आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 102 लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडले. त्यात महाराष्ट्राच्या विदर्भातील पाच मतदारसंघ आहेत, पण देशात सरासरी 62.37 टक्केच मतदान पार पडले, महाराष्ट्राचा आकडा 55 टक्क्यांच्या खाली घसरला. याचा अर्थ असा की, लोकांत मोदी वगैरे नेत्यांविषयी उत्साह नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी व त्यांच्या लोकांनी देशाला तसेच जनतेला फसवल्याचा हा परिणाम आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत 50 टक्के लोक मतदान करत नाहीत हे लक्षण बरे नाही. लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग मोठी प्रचार यंत्रणा राबवते, पण सध्याच्या लोकशाहीचा सर्वात मोठा गुन्हेगार हा देशाचा निवडणूक आयोगच आहे. निवडणूक आयोगाचे काम हे तटस्थ राहून निष्पक्ष निवडणुका घेणे हे आहे, पण गेल्या दहा वर्षांत निवडणूक आयोगाने भाजपचे अंगवस्त्र बनूनच काम केले. पक्षांतरे, पक्षफुटी, आयाराम-गयाराम प्रवृत्तींना प्राधान्य देऊन भारतीय जनता पक्षाच्या

लोकशाहीविरोधी कृतीचे

समर्थन केले. पक्ष चोरण्यास व फोडण्यास हातभार लावणाऱ्या निवडणूक आयोगावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ईव्हीएमवर मतदारांचा विश्वास नाही. भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून निवडून येतो हा लोकांचा संशय आहे. कोणतेही बटण दाबले तरी मत कमळालाच जाणार. मग त्यापेक्षा बटण न दाबलेलेच बरे या उद्रेकानेही लोक मतदानास बाहेर पडायला तयार नाहीत. लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब आहे. लोकांना मतपत्रिकेवरच निवडणुका हव्यात व भाजपपुरस्कृत निवडणूक आयोग ईव्हीएमचा हट्ट सोडायला तयार नाही. निवडणूक आयोग व भाजपची हातमिळवणी लोकांना मान्य नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला आहे. अजित पवारांसारखे लोक मतदारांना धमक्या देतात, आमिषे दाखवतात. हे गुन्हे निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. अशा भयग्रस्त स्थितीत मतदार बाहेर पडतील अशी अपेक्षा करणे चूकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षांतील कारभारामुळे लोकांत निरुत्साह आहे. लोकांच्या मनाची उभारी संपली आहे. सत्तेवर मोदी आले काय पिंवा गेले काय? आता आमच्या बँक खात्यात काही पंधरा लाख रुपये येत नाहीत, ही लोकांची मानसिकता आहे. राज्यकर्त्यांची थापेबाजी हाच लोकशाही व निवडणुकांचा अडथळा आहे. भाजपला चारशेपार आकडा करायचा आहे, पण लोक मोदींवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. नागालॅण्ड या भाजपशासित राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये

शून्य मतदान

झाले. सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. एका संघटनेने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले व लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. पूर्वेकडील राज्यांसाठी केंद्र सरकारने विकासासाठी दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून मतदान न करण्याचा निर्णय लोकांनी घेतला. मणिपूरमध्ये ऐन मतदानाच्या दिवशी पुन्हा हिंसाचार उसळला व ईव्हीएम जाळले. उत्तरेत कमी मतदान झाले, पण दक्षिणेत प्रचंड मतदान झाले. जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का घसरला तेव्हा तेव्हा देशात परिवर्तन झाले. भाजपविरोधात माहौल आहे. भाजप समर्थक मतदारांना घराबाहेर पडावे असे वाटले नाही. आताही मतदानाची घसरलेली टक्केवारी मोदी-शहांना घरी पाठवेल असेच संकेत देत आहे. भाजप ‘चारशेपार’चा नारा देऊन फसली आहे, पण लोक त्यांना दोनशेच्या आतच रोखतील हे मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच नक्की झाले. हे सरकारचे व पक्षपाती निवडणूक आयोगाचे अपयश आहे. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराची पाठशाळा चालवीत आहेत असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्या पाठशाळेची एक शाखा निवडणूक आयोग आहे. मतदानाचा टक्का घसरला, 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदार देशाचे सरकार निवडणार आहेत, हे गांभीर्याने घेणे कुणास जमत नाही. लोकांना गृहीत धरणाऱ्या निवडणुका देशाला मारक ठरतील. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी लोकांमध्ये खोटेपणाची हवा भरली. ती हवा 2024 सालात निघाली आहे. मतदानाचा पडलेला टक्का हा भाजपसाठी इशारा आहे.