सामना अग्रलेख – ‘मोदीमुक्त भारता’च्या दिशेने… पहिले पाऊल!

10 वर्षांपासून सुरू असलेली जुमलेबाजी आता संपवायचीच या जननिर्धाराची जाणीव पहिल्या टप्प्यातील मतदानाने सत्ताधाऱ्यांना निश्चितपणे झाली असेल. मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताच्या वल्गना केल्या. मात्र त्या फोल ठरविणारे मतदान पहिल्या टप्प्यात झाले. देशातील मतदारांनी ‘मोदीमुक्त भारता’च्या दिशेने पहिले पाऊल एका खंबीरपणे टाकले आहे. पुढील सहा पाऊलेही त्याच दिशेने पडतील आणि मोदीशाहीच्या फेऱ्यातून देशाची सुटका होईल!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी पार पडले. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 102 मतदारसंघांसाठी हे मतदान झाले. उन्हाचा कडाका तीव्र असल्याने त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर जाणवला तरी पहिल्या टप्प्यातील मतदानाने ‘देश बदल रहा है’ या मानसिकतेची चाहूल दिली हे नक्की. मतदानाचे आणखी सहा टप्पे बाकी आहेत. हे टप्पे पूर्ण व्हायला जवळपास सवा महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र शुक्रवारच्या मतदानाने मतदारांच्या मानसिकतेची हवा कुठल्या दिशेने वाहते आहे, याचा ठोस अंदाज दिला आहे. 2014 पासून भारताच्या मानेवर बसलेल्या मोदी राजवटीचे जूं उतरवायचेच असा निर्धार देशातील मतदारांनी केला आहे. त्याचीच झलक पहिल्या टप्प्यातील मतदानाने दिली आहे. शुक्रवारी तामीळनाडूमधील सर्व म्हणजे 39 मतदारसंघांचे मतदान पार पडले. इतर राज्यांमध्ये मतदारसंघांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल अशी होती. महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा त्यात समावेश होता. मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम, प. बंगाल, जम्मू-कश्मीर आदी राज्यांमधील काही

लक्षणीय लढतींचा

निकाल आता ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाला आहे. मात्र ज्या मोठ्या उत्साहाचा आणि ‘फिर एक बार’ वगैरेच्या लाटेचा दावा केला जात होता, तसे चित्र 102 पैकी एकाही मतदारसंघात दिसले नाही. लाट सोडा, ‘चार सौ पार’च्या घोषणेचा साधा तरंगदेखील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात दिसून आला नाही. पहिल्या दोन तासांतील देशभरातील मतदानाचा टक्का 12-13 च्या आतच राहिला. अनेक राज्यांत तर तो 7 ते 10 टक्क्यांच्या मध्येच होता. नंतर दिवसभरात मतदानाचे प्रमाण वाढले, पण त्याला ‘लाट’ वगैरे म्हणता येणार नाही. त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाने गाठलेला 70 टक्क्यांच्या आसपासचा आकडा वगळता इतर मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी नेहमीसारखीच राहिली. मात्र मतदानाने वेगळी दिशा दाखविली, हे महत्त्वाचे. कारण ना मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती ना मतदारांमध्ये उत्साह. सत्तापक्षाने समाजमाध्यमांवर केलेल्या हवेचाही मागमूस 102 पैकी एकाही मतदारसंघात जाणवला नाही. भाजपच पुन्हा सत्तेवर येणार, मोदीच परत पंतप्रधान होणार, देशातील मतदार मोदींना मतदान करण्याची फक्त वाटच पाहत आहे

असे एक वातावरण

गेल्या काही महिन्यांत देशात तयार केले गेले. मात्र त्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदान केंद्रांवर दिसले नाही. सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या 100 दिवसांचे नियोजन आपल्याकडे तयार आहे, असे मोदी सांगत असतात. 2047 च्या विकसित भारताचे फुगेही ते हवेत सोडत असतात. मात्र शुक्रवारी अनेक मतदान केंद्रांवर दिसलेल्या शांततेने मोदी आणि त्यांच्या पक्षाची झोप उडविली असणार, हे निश्चित. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा कौल काय असेल, हे तर 4 जूनलाच समजू शकेल, परंतु हे मतदान मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या ‘चार सौ पार’च्या फुग्याला टाचणी टोचणार, असेच एकंदर चित्र आहे. 10 वर्षांपासून सुरू असलेली जुमलेबाजी आता संपवायचीच या जननिर्धाराची जाणीव पहिल्या टप्प्यातील मतदानाने सत्ताधाऱ्यांना निश्चितपणे झाली असेल. मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताच्या वल्गना केल्या. मात्र त्या फोल ठरविणारे मतदान पहिल्या टप्प्यात झाले. देशातील मतदारांनी ‘मोदीमुक्त भारता’च्या दिशेने पहिले पाऊल एका खंबीरपणे टाकले आहे. पुढील सहा पाऊलेही त्याच दिशेने पडतील आणि मोदीशाहीच्या फेऱ्यातून देशाची सुटका होईल!