सामना अग्रलेख – जागा राहील तोच जिंकेल

महाराष्ट्राची जनता जिवंत आहे व ती पुढचा दरोडा पडण्याआधीच रस्त्यावर उतरली. यापुढेही जनतेला असेच राहावे लागेल. राहायलाच हवे. यापुढे जो झोपी जाईल तो पराभूत होईल. जो जागा राहील तोच जिंकेल. जो लढायला रस्त्यावर येतो तोच विजयी होत असतो. निवडणूक आयोगाला ताळ्यावर आणणे हे आता जनतेचे काम आहे. ते सुरू झाले आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण येईल असा महामोर्चा शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर निघाला. हा मोर्चा म्हणजे लोकशाहीसाठी आराधना होती. जनशक्तीचा उद्रेक काय असतो व त्या उद्रेकास काडी लागली तर काय घडेल त्याची ही रंगीत तालीम म्हणायला हरकत नाही. दीडशे वर्षांच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर सामान्य जनतेला स्वतःचे राज्यकर्ते निवडण्याचा जो अधिकार मिळाला आहे, मतदानाचा अधिकार मिळाला आहे, तो मतदानाचा त्याचा अधिकार यावच्चंद्र त्याला मिळणार आहे की नाही, ही या विराट महामोर्चाची चिंता आहे. कालच्या मोर्चाने एक केले ते म्हणजे मतदारांत आत्मविश्वास निर्माण केला. सगळे एकत्र आलो तर मतचोरी करणाऱयांना फटकवू शकतो व त्याचीच ठिणगी आता पडली आहे. भाजप व त्याच्या बगलबच्च्यांनी मतचोरी करून विजय मिळवला. या मतचोरीला आपल्या लोकशाहीत मान्यता नाही. भाजपचे लोक स्वतःला शहाणे समजतात. पैशांच्या राशी पायाशी पडल्या की, हे असे शहाणपणाचे भ्रष्ट मार्ग सुचतात, पण हे करत असताना इतरांना मूर्ख समजणे ही ‘बेवकुफी’ आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचे बिंग फुटू लागले आहे. ईव्हीएम ते मतदार याद्यांतल्या घोटाळ्यापर्यंत या मंडळींनी उद्योग केले. त्यातही या घोटाळय़ात निवडणूक आयोगाची त्यांना साथ आहे, ही सगळय़ात गंभीर बाब आहे. अर्थात भाजपच्या मूर्खपणाचीही कमाल आहे. सत्याचा मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघाला. विरोधकांच्या शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने करायला हवे होते, पण निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांचे समर्थन करण्यासाठी मुंबईत भाजपने म्हणे एक मुका मोर्चा काढला. भाजप टोळीने आंदोलन केले याचा काय अर्थ घ्यायचा? मतचोरीच्या विरोधात असलेल्या आंदोलनाचा विरोध करणे याचा साधा सरळ अर्थ म्हणजे

लोकशाहीच्या उघड हत्येचे

आणि मतचोरीचे समर्थन करण्याचाच प्रकार आहे. अशा मतचोरांना रस्त्यावर फटकवा व लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा हाच संदेश कालच्या मोर्चाने दिला. मुंबईचे एक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कालच्या मोर्चावर सांगितले की, ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा कट रचला जात आहे.’’ मिस्टर लोढा, तुम्ही कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहात की, मराठी जनांच्या छाताडावर उभारलेले लोढा टॉवर्स हेच तुमचे जग आहे? मतचोरी होत आहे, बोगस मतदान होत आहे अशा तक्रारी भाजप आणि तुमच्या मित्रपक्षांनी जाहीरपणे केल्या आहेत. स्वतःच्या तोंडास काळ्या पट्ट्या बांधून केलेल्या फुटकळ आंदोलनाने सत्य दडपले जाणार नाही. विराट मोर्चाची ‘नौटंकी’ अशी संभावना करणे हा लोकशाहीचा आणि मराठी जनांचा अपमान आहे. मिस्टर लोढा, कालच्या मोर्चाची माणसे ही तुमच्याप्रमाणे रोजंदारीवर आणलेली नव्हती. तप्त उन्हात ती चालत होती. शेवटपर्यंत बसून होती. हे भाग्य तुमच्या पंतप्रधानांनाही मिळत नाही. तेव्हा यापुढे तोंड सांभाळून बोला इतकाच इशारा तुमच्यासाठी पुरेसा आहे. तुमच्या टॉवर्सना सुरुंग लागायला वेळ लागणार नाही? ‘लाडकी बहीण’ योजना हा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी घोटाळा होता. आता बिहारच्या निवडणुकीत मोदींनी पुन्हा तोच पत्ता फेकला आहे व निवडणूक आयोगाने त्यास ‘मम’ म्हटले आहे. बिहारमध्ये निवडणूक आचारसंहिता लागली आहे. त्याचदरम्यान महिलांना सरकारी योजनेचे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले. इतकेच नाही तर पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यावरही पैशांचा पुढचा हफ्ता ट्रान्सफर केला जाईल व या

‘मत विकत’ घेण्याच्या

प्रक्रियेस आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. म्हणजे लोकशाहीचे तळे राखणारेच प्रवाह गढूळ करीत आहेत. निवडणूक आयोग व यंत्रणा विकली गेली आहे. अशा वातावरणात स्वच्छ निवडणुका कशा होणार? निवडणूक घोटाळय़ाचे सूत्रधार दिल्लीत बसले आहेत. त्यामुळे ‘मतचोरी करणाऱ्यांना फटकवा’ हे स्वातंत्र्याचे नवे आंदोलन दिल्लीतून सुरू व्हायला हवे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नावानेच बोगस अर्ज करण्यात आला. कालच्या मोर्चात काँगेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, डावे पक्ष सहभागी होते. देशावर काँग्रेसचे राज्य प्रदीर्घ काळ होते. काँग्रेसने अनेक अपराध केले असतील. त्याचे प्रायश्चित्तही त्यांना मिळाल़े  देश स्वतंत्र, सार्वभौम ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केले. पुन्हा निवडणूक यंत्रणेत आजच्या इतका हस्तक्षेप व बोगसगिरी करण्याचे पाप त्यांच्याकडून झाले नाही. रायबरेलीतील एका क्षुल्लक प्रकरणात पंतप्रधान इंदिरा गांधींवर ठपका ठेवण्याचे धैर्य तेव्हाच्या अलाहाबाद हायकोर्टाने दाखवले. आता कोर्ट कोणतेही असो. उंबरठे झिजले व डोकी आपटून आपली डोकीही फुटली, पण लोकशाहीचे वस्त्र्ाहरण काही कोणी थांबवत नाही. म्हणूनच जनता ‘नेपाळ’प्रमाणे रस्त्यावर उतरली असेल तर स्वागत व्हायला हवे.

‘‘जिंदा कौमे पाच साल तक

इंतजार नहीं करती…’’

असे राम मनोहर लोहियांनी सांगितले. महाराष्ट्राची जनता जिवंत आहे व ती पुढचा दरोडा पडण्याआधीच रस्त्यावर उतरली. यापुढेही जनतेला असेच राहावे लागेल. राहायलाच हवे. यापुढे जो झोपी जाईल तो पराभूत होईल. जो जागा राहील तोच जिंकेल. जो लढायला रस्त्यावर येतो तोच विजयी होत असतो. निवडणूक आयोगाला ताळ्यावर आणणे हे आता जनतेचे काम आहे. ते सुरू झाले आहे.