सामना अग्रलेख – सरकार पक्षाचे इमले… शेतकऱ्यांचे दिवाळे!

चार महिन्यांतील भयंकर अतिवृष्टीने आधी खरिपाची 70 लाख एकरांवरील संपूर्ण पिके बरबाद झाली आणि आता परतीच्या पावसानेही जाता जाता काही लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी केली. कोकणपासून मराठवाड्यापर्यंत आणि पश्चिम व उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना संपूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय यंदा निरोप घ्यायचाच नाही, असे ठरवून आल्यागत यंदाचा पाऊस कोसळतो आहे. शेतकऱ्यांच्या घरांवरील कौले अश्रू ढाळत आहेत आणि मायबाप सरकार आपल्या पक्षाचे इमले वाढवण्यात मश्गूल आहे. दिवाळीत पडणारा पाऊस शेतकऱ्यांचे दिवाळे काढतो असे म्हणतात. यंदा तेच घडते आहे. पक्षाची मालमत्ता वाढविण्यात सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे भान आहे काय?

यंदाचा पावसाळा कुठले टॉनिक घेऊन आला आहे कुणास ठाऊक! पावसाळा संपला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. शेती आणि शेतमालाचे नुकसान करत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसही पावसाचा धसमुसळेपणा अव्याहत सुरूच आहे. परतीच्या पावसाने खरे तर सप्टेंबरअखेरीस आपला मुक्काम हलवायला हवा. मात्र संपूर्ण पावसाळ्यात भयंकर अतिवृष्टीचे थैमान घालून व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करूनही पावसाचे समाधान झालेले दिसत नाही. शेतातील उभी पिके सप्टेंबरपर्यंत नष्ट केल्यानंतर जी काही थोडीफार पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार होती, ती हातातोंडाशी आलेली पिकेही परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत परतीच्या पावसाचा धिंगाणा सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत तर संपूर्ण दिवाळी पावसातच गेली. खास करून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील शेतीचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केले. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, शहापूर या तालुक्यांत तर शंभर टक्के भातशेती वाया गेली आहे. मागील महिन्यापर्यंत सुरू असलेल्या पावसाने राज्यभरात लाखो एकरवरील पिकांची संपूर्ण नासाडी केली होती. सप्टेंबरपर्यंत झालेल्या या विध्वंसक पावसानंतर थोडीशी उघडीप मिळाली. अतिवृष्टीच्या तडाख्यातून जे काही थोडेफार पीक वाचले होते, त्या पिकांच्या काढणीला वेग आलेला असतानाच परतीचा पाऊसही पुन्हा काळ बनून आला. भात पिके लोंब्या काढत असतानाच व काही ठिकाणी भाताचे पीक काढणीला आलेले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवले. विदर्भातील गडचिरोली व आसपासच्या भागांतील भातशेती व

कोकणातील संपूर्ण भातशेतीचे

परतीच्या पावसाने अपरिमित नुकसान केले. एकतर सतत पाऊस सुरू आहे आणि ऊनही पडत नाही. त्यामुळे भाताची पिके पुजण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातही परतीच्या पावसाने सोंगून ठेवलेले सोयाबीनचे पीक भिजून गेले. कापणीपूर्वी आधीच ओल्या असलेल्या शेंगा पुन्हा भिजल्याने सोयाबीनची गुणवत्ता घसरली. मराठवाडा-विदर्भातील सोयाबीन आधी अतिवृष्टीत निम्मे सडून गेले आणि जे काही उरले त्याला परतीच्या पावसाने प्रतवारीच्या फेऱ्यात अडकवले. शिवाय मका व कापसालाही परतीच्या पावसाचा जबर फटका बसला. नाशिक जिल्ह्यातही काढणीला आलेला कांदा, उन्हाळी कांद्यांची रोपे, भाजीपाला व द्राक्षांच्या बागांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांचा फवारणीवरील खर्च यंदा दुपटीने वाढला आहे. शिवाय ऊनच नसल्याने 50 टक्के द्राक्षवेलींवर घडच न फुटल्याने द्राक्ष बागायतदार संकटात सापडले आहेत. डाळिंब, पेरू व अंजिराच्या बागांवरही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. सरकारी शब्दकोशात ‘ओला दुष्काळ’ ही शब्दावली नाही, असे मायबाप सरकार सांगते, पण ‘ओला दुष्काळ’ हे शब्दही थिटे पडावेत, असा राक्षसी पाऊस यंदा महाराष्ट्राने पाहिला. कोकणात तर गतवर्षीच्या दुप्पट म्हणजे चार हजार मि.मी. इतका पाऊस झाला. तब्बल सहा महिन्यांपासून राज्यातील शेतकरी अस्मानी संकटांशी झुंजत असतानाही सरकारने ना ओला दुष्काळ जाहीर केला, ना केंद्राची पथके महाराष्ट्रातील शेतीच्या नुकसानीची पाहणीसाठी पाठवली गेली. जी काही तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली, तीदेखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. दिल्लीचे राज्यकर्ते

निवडणुकांच्या राजकारणात

व्यस्त आहेत. पक्ष कार्यालयांसाठी झटपट जमिनी मिळवून त्यांची उद्घाटने करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांची दखल घेण्यास व त्यांना झटपट मदत पोहोचविण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. वास्तविक जून ते सप्टेंबर हे चारच महिने पावसाचे असतात. शालेय शिक्षणात व आपल्या पूर्वजांनीही पावसाळ्याचे हेच चार महिने सांगितले आहेत. तथापि, यंदाचा पावसाळा तब्बल महिनाभर आधी म्हणजे 4 मे रोजी सुरू झाला आणि आता ऑक्टोबर महिन्याचा अंतिम आठवडा सुरू असतानाही पावसाचे धूमशान सुरूच आहे. मेपासून ते ऑक्टोबरपर्यंत सलग सहा महिने पाऊस पडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि निर्माण झालेले चक्रीवादळ यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे आणखी तीन-चार दिवस शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नासाडी हतबलपणे पाहावी लागेल. चार महिन्यांतील भयंकर अतिवृष्टीने आधी खरिपाची 70 लाख एकरांवरील संपूर्ण पिके बरबाद झाली आणि आता परतीच्या पावसानेही जाता जाता काही लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी केली. कोकणपासून मराठवाड्यापर्यंत आणि पश्चिम व उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय यंदा निरोप घ्यायचाच नाही, असे ठरवून आल्यागत यंदाचा पाऊस कोसळतो आहे. शेतकऱ्यांच्या घरांवरील कौले अश्रू ढाळत आहेत आणि मायबाप सरकार आपल्या पक्षाचे इमले वाढविण्यात मश्गूल आहे. दिवाळीत पडणारा पाऊस शेतकऱयांचे दिवाळे काढतो असे म्हणतात. यंदा तेच घडते आहे. पक्षाची मालमत्ता वाढविण्यात सर्व शक्ती पणाला लावणाऱया सरकारला शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे भान आहे काय?