सामना अग्रलेख – महाराष्ट्राची नवी लढाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची रक्षणकर्ती म्हणून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईवरील शिवसेनेची पकड तोडायची. मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल व लगेच मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र आहे. गृहमंत्री अमित शहा जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊल ठेवतात, त्या प्रत्येक वेळी मुंबईकरांच्या काळजात ‘चर्र’ होते. ते मुंबई तोडण्यासाठीच आले आहेत किंवा येत आहेत या भयाने तो व्याकूळ होतो, पण त्यातूनच त्याच्यातला मर्द मावळा उसळतो. आजच्या महाराष्ट्र दिनी तमाम मराठी बांधवांनी मुंबईसाठी लढण्याचा निर्धार अधिक पक्का केला पाहिजे! महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी लढावे लागेल. 105 हुतात्मे झाले. उद्या त्यात भर पडली तरी चालेल, पण शिवरायांचा महाराष्ट्र मुंबईसह एक राहावा, यासाठी नवी लढाई लढावीच लागेल!

आपले महाराष्ट्र राज्य अनेक प्रश्नांच्या गुंत्यात अडकून गुदमरले असताना आज महाराष्ट्राचा स्थापना दिवस साजरा होत आहे. ज्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे व जे मुख्यमंत्री म्हणून एक घटनाबाह्य सरकार चालवीत आहेत असे मिंधे मुख्यमंत्री आजच्या महाराष्ट्र दिनी पोलिसांची मानवंदना घेतील. महाराष्ट्राचा एक प्रमुख भाग कोकण. त्याच कोकणात छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड आहे. कुठे सिंधुदुर्ग तर कुठे विजयदुर्गसारखे आरमारी किल्ले आहेत. त्या कोकणातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस पोलिसांनी बेदम चोप दिला. अतिरेक्यांप्रमाणे अटक केली व तुरुंगात पाठवलं. ज्या शिवप्रभूंच्या कृपेने महाराष्ट्र राज्य जन्माला येऊन 63 वर्षे झाली, त्या महाराष्ट्राची अवस्था आज काय झाली आहे? दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे अशी अवस्था आज महाराष्ट्राची झाली आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे. कर्नाटकाने घास घेतलेला बेळगाव, कारवारसह 20 लाख मराठी भाषिकांचा भाग त्यांच्या जबडय़ात आहे. तेथे आजही महाराष्ट्र एकीकरण समिती अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात घुसून कानडी सत्ताधाऱ्यांशी लढत आहे. मात्र हा चक्रव्यूह तोडून मराठी जनांना न्याय द्यावा असे कोणाला वाटत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करीत असतील तर सर्व बंधने तोडून त्यांनी बेळगावसह सीमा भागात एकीकरण समितीच्या प्रचारात सहभागी व्हायला हवे, पण तसे घडणार नाही. कारण ते भाजपचे मिंधे आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे मराठी सीमा भागाशी भावनिक नाते नाही. महाराष्ट्र अस्मितेच्या, मराठी न्याय्य हक्कांच्या कोणत्याही लढय़ात भाजप कधीच दिसला नाही. त्यामुळे मुंबई तोडली काय आणि बेळगावातील मराठी जनांवर

अन्यायाचा वरवंटा

फिरवला काय, त्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढय़ातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र आहे. 1960 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले म्हणजे काय झाले? ते आकाशातून पडले की या देशाच्या भूमीतून एकदम वर आले? असा प्रश्न पडला असेल. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहिला, ज्यांनी त्या काळात पोलिसांनी केलेला बेछूट गोळीबार अनुभवला, मोरारजी देसाईंपासून अनेकांनी मुंबई-महाराष्ट्राला मिळू नये म्हणून केलेली सर्व तऱ्हेची दडपशाही पाहिली, त्यांनी नव्या पिढीला महाराष्ट्र जन्माची कथा सांगितली पाहिजे. शिवरायांचा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांवर तेव्हा महाराष्ट्राची जनता कशी वाघासारखी तुटून पडली हे त्यांना दाखवायला हवे. तरच आजच्या महाराष्ट्राचे अखंडपण टिकेल व भविष्यात मुंबई महाराष्ट्रात राहील. आज पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे व महाराष्ट्राला कंगाल करण्याचे कारस्थान सुरू झाले आहे. मुंबईतील सर्व संपत्ती व साधने आधीच गुजरातमध्ये वळवून महाराष्ट्राच्या राजधानीचे महत्त्व कमी केले आहे. मुंबईतील कार्यालये, महाराष्ट्रातील उद्योगांवर दरोडे टाकून ते गुजरातेत नेले गेले व यावर विद्यमान मुख्यमंत्री डोळय़ांवर दाढी ओढून बसले आहेत. भाजपचे दिल्लीतले नेते येतात व महाराष्ट्रावर वार करून सहीसलामत निघून जातात. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या बदनामीची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. जणू महाराष्ट्र राज्य व मराठी अस्मितेची माती करूनच सोडायची अशा हेकेखोरपणातून भाजपचे कार्य सुरू आहे. भाषावार प्रांतरचना भारतीय घटनेनुसार झाली. मग भाषेच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय का? मुळात

भाषावार प्रांतरचनेची मागणी

फक्त महाराष्ट्राने केलेली नव्हती, पण महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले ते अर्धेमुर्धे मराठी राज्य. मुंबईसाठी तर मराठी माणसाला बलिदानच द्यावे लागले व बेळगाव, निपाणी, खानापूरसारख्या सीमा भागासाठी आजही लढा सुरूच आहे. पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सोडवतात, पण त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या तिढय़ातून बेळगाव सोडवता आले नाही. बेळगावसाठी 70 वर्षे आपला कंठशोष सुरू आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, पण 20 लाख मराठी बांधवांच्या आक्रोशाला न्यायालयातही किंमत नाही. ‘‘सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी कधीच मनापासून प्रयत्न केले नाहीत व केंद्र सरकारनेही सतत ‘ठंडा करके खाओ’ हेच धोरण अवलंबिले,’’ असे एकदा जयंतराव टिळक म्हणाले होते ते खरेच आहे. बेळगाव सीमेबाहेर आहेच, पण आज मुंबई तरी महाराष्ट्रात राहील काय? असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कसलीच खात्री वाटत नाही. मुंबईची रक्षणकर्ती म्हणून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईवरील शिवसेनेची पकड तोडायची. मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल व लगेच मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र आहे. गृहमंत्री अमित शहा जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊल ठेवतात, त्या प्रत्येक वेळी मुंबईकरांच्या काळजात ‘चर्र’ होते. ते मुंबई तोडण्यासाठीच आले आहेत किंवा येत आहेत या भयाने तो व्याकूळ होतो, पण त्यातूनच त्याच्यातला मर्द मावळा उसळतो. आजच्या महाराष्ट्र दिनी तमाम मराठी बांधवांनी मुंबईसाठी लढण्याचा निर्धार अधिक पक्का केला पाहिजे! महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी लढावे लागेल. 105 हुतात्मे झाले. उद्या त्यात भर पडली तरी चालेल, पण शिवरायांचा महाराष्ट्र मुंबईसह एक राहावा, यासाठी नवी लढाई लढावीच लागेल!