
कोरोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तर महाराष्ट्रात गोवरच्या साथीने हाहाकार माजवला आहे. गोवरचे संकट आहेच, पण ज्या पद्धतीने चीनमध्ये कोरोना पसरला आहे ते पाहता महाराष्ट्राला सावधान राहायला हवे. गोवर आणि कोरोनाच्या बातम्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. मुंबईसह राज्यभरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली. त्यातले सर्वाधिक ‘गोवर’ रुग्ण मुंबई शहरात आहेत. त्याच वेळी चीनमध्ये रविवारी एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोहोचली व आकडा वाढतोच आहे. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा ‘लॉक डाऊन’सारखे कडक निर्बंध लागू केले. या लॉक डाऊनच्या विरोधात चीनमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने सुरू झाली आहेत. त्याठिकाणी गेल्या काही दिवसांत 200 ठिकाणी लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र ‘लॉक डाऊन नको. आता आम्ही जगायचे कसे,’ या उद्रेकाच्या भावनेने लोक चीन सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. ‘‘आम्हाला या सगळय़ाचा वीट आला आहे. लॉक डाऊनची भीती वाटतेय. खूप एकटेपणा वाटतोय,’’ अशा भावना तेथील लोकांनी व्यक्त केल्या व लॉक डाऊनच्या निषेधार्थ सरकारविरोधात बंडच केले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वप्रथम झाला त्या वुहान शहरासह 12 प्रमुख शहरे बंद करण्यात आली आहेत. चीनच्या रस्त्यांवर पोलीस विरुद्ध विद्यार्थी, जनता असा संघर्ष सुरू आहे व त्याची दखल भारताने घ्यायला हवी. कोरोनाचे संकट चीनमध्ये असले तरी घोर जगाला लागला आहे. हिंदुस्थानने कोरोनाच्या दोन लाटांशी मुकाबला केला. त्या काळात कोरोना मृतांची हजारो प्रेते गंगेत सोडून देण्यात आल्याचे चित्र जगाने पाहिले. आता
ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये
म्हणून हिंदुस्थान तयार आहे काय? आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील ‘संकट’ वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते. ते संकट चीनबरोबरच्या चर्चेने सुटणार नसून त्या संकटाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्यविषयक ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची उभारणी करावी लागेल. राज्याराज्यांतील सरकारे पाडून वगैरे ही लढाई पुढे जाणार नाही पिंवा ‘ईडी’वाल्यांच्या हातात शस्त्र देऊनही कोरोना घाबरून पळ काढणार नाही. पुन्हा जे कोरोनाचे तेच मुंबईसह महाराष्ट्रात पसरलेल्या गोवरच्या साथीचे म्हणावे लागेल. गोवरची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते. म्हणजे कोरोनाप्रमाणेच हा आजार संपर्क व स्पर्शातून पुढे जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालयाने कोणती पाऊले उचलली आहेत? लसीकरण वगैरे वाढविण्याचे बोलले जात आहे, पण ते सर्व कागदावरच दिसतेय. गोवरसंदर्भात दिल्लीत एक उच्च स्तरीय बैठक होऊन गोवरच्या साथीचा आढावा घेण्यात आला. गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात एक
बेजबाबदार व उठवळ
आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे. कोरोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. कोरोनाप्रमाणे गोवरसाठीही विलगीकरणाची गरज असून हे निर्बंध कठोरपणे अंमलात आणायला हवेत. गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व महापालिकांना देण्यात आले हे ठीक; पण ही विलगीकरण पेंद्रे नक्की कोठे असणार, त्याची काय तयारी सुरू आहे त्याबाबतच्या सूचना कोण देणार? कोरोना काळात राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे लोकांशी संवाद साधून माहिती देत होते. इस्पितळात व कोविड पेंद्रांना भेटी देत होते, पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत. कधी आसामचे पर्यटन तर कधी दुसरे काही, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?