सामना अग्रलेख – मान्सूनची नांदी

5211
monsoon-in-maharashtra

मान्सूनच्या वेळेत आगमनाची नांदी ही निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. तथापि, मान्सूनचा आली लहर, केला कहरहा स्वभाव आणि काही भागांवर कृपा तर काही भागांवर अवकृपा करण्याचा पूर्वानुभव विचारात घ्यावा लागेल. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे कृषीचक्रदेखील थांबले आहे. ते गतिमान होण्यासाठी आणि बळीराजाच्या पदरात भरभरून दान पडावे यासाठी चांगल्या पावसाचा अंदाज खरा ठरो. मान्सूनच्या नांदीने त्याचे शुभसंकेत दिलेच आहेत.

मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या देशवासीयांना अखेर मान्सूनच्या आगमनाने दिलासा दिला आहे. यावर्षी मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त झाला होता. पण त्याच्या एक दिवसआधीच त्याने केरळमध्ये धडक दिली आहे. महाराष्ट्रात 8 जूनच्या आसपास मान्सून प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे त्यावेळी राज्यात पावसाळ्याला रीतसर सुरुवात होईल असे दिसत आहे. तशीही मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागांत हजेरी लावलीच आहे. त्यात आता ‘निसर्ग’ चक्रीवादळाची भर पडल्याने पुढील चार-पाच दिवस मुंबई आणि कोकणसह राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ आणि त्यामुळे कोसळणारा मुसळधार पाऊस ही चांगली बातमी नसली तरी यावर्षी मान्सून अगदी वेळेत हिंदुस्थानात दाखल झाला ही निश्चितच ‘चांगली बातमी’ आहे. मागील दोन-अडीच महिन्यांपासून कोरोना, त्याचा वाढता प्रादुर्भाव, त्याने घेतलेले बळी, लॉक डाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था, बंद पडलेले उद्योग-व्यवसाय, हातावर पोट असणार्‍यांचे हाल, मजुरांची स्थलांतरावेळी झालेली ससेहोलपट, त्यात गेलेले बळी अशा सगळ्या नकारात्मक बातम्यांचाच भडीमार होत होता. या पाश्र्वभूमीवर लॉक डाऊन-5 मध्ये जाहीर झालेली काही प्रमाणातील शिथिलता आणि त्यापाठोपाठ

मान्सूनचे वेळेत आगमन

या बातम्या नक्कीच दिलासा देणार्‍या म्हणाव्या लागतील. गेल्यावर्षी मान्सून लांबला होता. शिवाय नंतर महिन्याची सरासरी दोन-तीन दिवसांच्या अतिवृष्टीने भरून काढणे, प. महाराष्ट्रात उडविलेला हाहाकार, पावसाळ्यानंतरही अवकाळी आणि गारपिटीचे दिलेले तडाखे यामुळे राज्यात पिकांचे, पर्यायाने बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले. आपल्याकडील मान्सून हा तसा लहरीच आहे आणि हवामान खात्याचे अंदाजही त्यापेक्षा वेगळे नसतात. यंदा मात्र हवामान खात्याच्या ‘हुकूमावरून’ मान्सून वेळेत आला आहे. याहीवर्षी हिंदुस्थानात सुमारे 102 टक्के पाऊस कोसळेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यात चार-पाच टक्के कमी-जास्त गृहीत धरले तरी एकंदर ‘पाऊस वर्तमान’ समाधानकारक आहे. गेल्यावर्षीप्रमाणे सर्वाधिक पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्येच होण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात सुमारे 103 टक्के तर ऑगस्टमध्ये 97 टक्के पाऊस होईल असे सांगण्यात येत आहे. थोडक्यात, जुलै हाच सर्वाधिक पावसाचा महिना ही आता आपल्याकडे ‘मान्सूनची वहिवाट’ बनत आहे. त्यानुसार कृषी नियोजनात बदल करणे ही गरज बनणार आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर सात दशकांनंतरही 80 टक्के शेती मान्सूनच्या लहरीवरच अवलंबून आहे. तांदूळ, मका, ऊस, कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांसाठी मान्सून हाच ‘वरदान’ किंवा ‘शाप’ ठरत असतो. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही आधी खरीप हंगामाची आणि नंतर

अवकाळीच्या तडाख्यांनी

रब्बी हंगामाची वासलात लावली होती. त्यात अडीच महिन्यांपासून कोरोना संकटाची भर पडली आणि त्याचा फटका शेती व शेतकर्‍यालाही बसला. लॉक डाऊनमुळे तोंडावर आलेल्या खरीप हंगामाचे कसे व्हायचे या विवंचनेत शेतकरी होता. मात्र पाचव्या लॉक डाऊनमध्ये मिळालेली थोडी शिथिलता आणि मान्सूनचे ‘शुभ वर्तमान’ यामुळे शेतकरीवर्गाला नक्कीच दिलासा मिळाला आहे. अर्थात, मान्सूनच्या लहरीपणाचा पूर्वानुभव पाहता सरकार आणि स्थानिक प्रशासनाला योग्य खबरदारी घ्यावीच लागणार आहे. गेल्यावर्षी प. महाराष्ट्राला महापुराचा भयंकर तडाखा बसला होता. त्याला अतिवृष्टी आणि ‘ओव्हरफ्लो’ धरणे ही मुख्य कारणे होती. आताही तेथील धरणांमधील पाणीसाठा 40 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्टमधील ‘सरासरीपेक्षा जास्त’ पावसाचा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला तर तेथील परिस्थिती गंभीर होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी योग्य खबरदारी आणि पूर्वनियोजन प्रशासनाला करावे लागेल. मान्सूनच्या वेळेत आगमनाची नांदी ही निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. तथापि, मान्सूनचा ‘आली लहर, केला कहर’ हा स्वभाव आणि काही भागांवर कृपा तर काही भागांवर अवकृपा करण्याचा पूर्वानुभव विचारात घ्यावा लागेल. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे कृषीचक्रदेखील थांबले आहे. ते गतिमान होण्यासाठी आणि बळीराजाच्या पदरात भरभरून दान पडावे यासाठी ‘चांगल्या पावसा’चा अंदाज खरा ठरो! मान्सूनच्या नांदीने त्याचे शुभसंकेतच दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या