मणिपूर तसेच कश्मीरातील हिंसाचार व निरपराध्यांचे बळी मोदी गांभीर्याने घेत नसतील तर त्या हत्यांचे खापर यापुढे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमारांवर फुटेल. कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ते या दोघांमुळेच. त्यांचा हा निर्णय देशहिताचा नाही हेच कश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याने दाखवून दिले आहे. मोदी इकडे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते आणि तिकडे कश्मीरमध्ये अतिरेकी निरपराध भाविकांच्या रक्ताचे ‘लाल’ गालिचे ‘मोदी-3’ साठी अंथरत होते. ‘मोदी-1’ आणि ‘मोदी-2’ मध्ये न थांबलेला कश्मीरमधील रक्तपात ‘मोदी-3’ मध्येही सुरूच राहील, हे दाखवून देत होते. मोदी–शहा आणि चंद्राबाबू–नितीशबाबू चौकडीला या रक्तपाताची जबाबदारी टाळता येणार नाही.
राष्ट्रपती भवनात ‘रालोआ’ सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू-कश्मीरात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली खरी, पण देशाच्या कुंडलीतले ग्रहयोग काही बरे दिसत नाहीत असेच या भयंकर हल्ल्यावरून दिसते. वैष्णवदेवी दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात 10 हिंदू भाविक ठार झाले व 33 जण जखमी झाले. 370 कलम कश्मीरातून हटवल्यावर तेथे सर्वकाही ठीकठाक असल्याचा निर्वाळा आधीचे गृहमंत्री अमित शहा देत असत. प्रत्यक्षात कश्मीरमधील हालत अधिक नाजूक होताना दिसत आहे. यापूर्वी दहशतवादी घटना कश्मीर खोऱ्यात होत असत. पण 370 कलम हटवल्यानंतर अतिरेकी हल्ले जम्मू क्षेत्रात होऊ लागले ही चिंतेची बाब आहे. अमरनाथ यात्रा, वैष्णवदेवी दर्शन यासाठी हिंदू भाविक मोठय़ा संख्येत जात असतात. त्या भाविकांवरच हल्ले सुरू झाले आहेत आणि पंतप्रधान मोदी व त्यांचे रालोआ सरकार हे उत्सवात मग्न आहेत. कालच्या कश्मीरमधील हल्ल्यात लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्या मृतदेहांची चित्रे पाहून मन अस्वस्थ होते व सरकारी निर्ढावलेपणाची लाज वाटते. मोदी, शहा व आता त्यांच्या जोडीला चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार आहेत. त्यामुळे या रक्तपाताची जबाबदारी ‘चौकडी’वरच जाईल. कश्मीरचा प्रश्न 370 कलम हटवल्यावरही जेथच्या तेथेच आहे. 2014 च्या निवडणुकीत कश्मिरी पंडितांची घरवापसी करण्याचे वचन मोदी-शहांनी दिले होते, पण कश्मिरी पंडितांची अवहेलना संपलेली नाही. मोदी यांनी
पंतप्रधानकीच्या शपथा
वारंवार घेतल्या, पण कश्मीरातील पंडितांना काही न्याय मिळाला नाही. पंडित समुदाय आजही निर्वासित छावण्यांत राहत आहे किंवा जम्मूच्या रस्त्यांवर आंदोलने करीत आहे. मोदी-शहांच्या फसवणुकीचे हे उदाहरण आहे. हिंदुत्ववादी असल्याचा फुगा फुगवून या निवडणुकीतदेखील मोदी यांनी मते मागितली, पण कश्मीरातील पंडितांच्या हलाखीचा त्यांनी साधा उल्लेख केला नाही. कश्मीरात हिंदूंच्या हत्या रोजच होत आहेत, सैनिक, पोलीस, सुरक्षा दलाचेही बलिदान सुरू आहे ते वेगळेच. कश्मीरच्या बाबतीत जी आश्वासने देण्यात आली ती पूर्ण झाली नाहीत व तेथील जनता आजही अस्वस्थ आहे. मोदी यांचा पराभव देशात झाला आहे व या पराभवाचे खापर ते मुस्लिम समुदायावर फोडतात. मोदी यांचे लोक सांगतात की, मुसलमान व बांगलादेशींनी इंडिया आघाडीस मतदान केले म्हणून ते जिंकले. हे असे बोलणे असेल तर मग मोदींच्या शपथविधीसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना खास आमंत्रित का करण्यात आले? मागच्या दहा वर्षांत बांगलादेशींना परत पाठवण्यासाठी मोदी यांनी काय पावले उचलली? मुळात मोदी यांचा पराभव हिंदू-मुसलमान, ख्रिश्चन, शीख अशा सगळ्यांनीच केला. संविधान वाचविण्यासाठी दलितांची शक्तीही त्यात एकवटली. मोदी यांना फक्त मिरवण्यात व मौजेत रस आहे. आश्वासनांचे फुगे फोडण्यात त्यांची दहा वर्षे गेली. तसे नसते तर कश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी हयगय केली नसती. 370 कलम हटवले, पण जम्मू-कश्मीरमधील
भूमिपुत्रांचे प्रश्न
सुटले काय? अतिरेक्यांचा बीमोड झाला काय? कश्मिरी पंडित त्यांच्या हक्काच्या घरी परतले काय? बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या काय? कश्मीरकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्या पाकडय़ांचे डोळे खोबणीतून बाहेर काढले गेले काय? उलट मोदींनी कश्मीरच्या नावाने मतांचा बाजार मांडला. त्यात पुलवामासारख्या जवानांच्या हत्याकांडामुळे मोदींचे खरे रूप जगाला कळले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत मोदी हे किती ढिले व कामचुकार आहेत हे पुलवामाने दाखवून दिलेच होते. आता रविवारी कश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी केलेला भयंकर हल्लाही मोदींचे अपयशच दाखवतो. तिकडे मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या सुरक्षा ताफ्यावरही सोमवारी अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात एक जवान जखमी झाला. मणिपूर तसेच कश्मीरातील हिंसाचार व निरपराध्यांचे बळी मोदी गांभीर्याने घेत नसतील तर त्या हत्यांचे खापर यापुढे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमारांवर फुटेल. कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ते या दोघांमुळेच. त्यांचा हा निर्णय देशहिताचा नाही हेच कश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याने दाखवून दिले आहे. मोदी इकडे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते आणि तिकडे कश्मीरमध्ये अतिरेकी निरपराध भाविकांच्या रक्ताचे ‘लाल’ गालिचे ‘मोदी-3’ साठी अंथरत होते. ‘मोदी-1’ आणि ‘मोदी-2’ मध्ये न थांबलेला कश्मीरमधील रक्तपात ‘मोदी-3’ मध्येही सुरूच राहील, हे दाखवून देत होते. मोदी-शहा आणि चंद्राबाबू-नितीशबाबू चौकडीला या रक्तपाताची जबाबदारी टाळता येणार नाही.