सामना अग्रलेख – छातीत खरंच राम आहे ना? मग बडवता कशाला!

5386

प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. ते म्हणाले, ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे व केंद्रात मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते अयोध्येस गेले. तिथे सरकारी मानवंदना स्वीकारली. म्हणजे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व हजारो शिवसैनिकांसह रामलल्लांचे दर्शन घेतले. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळय़ा असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळय़ांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले.

तोच राजधर्म महाराष्ट्रात

चालवला जात आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. ही सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे. त्याच भावनेतून मुख्यमंत्री ठाकरे हे अयोध्येत जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक झाले. मुख्यमंत्री तिथे गेले व दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशात हात घातला व राममंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण कार्य सुरू होईल व पहिला धनादेश ‘ठाकरे सरकार’ने दिला याची इतिहासात नोंद राहील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यात राज्यातील विरोधकांच्या पोटात कळा याव्यात असे काय आहे? हे ऐकून त्यांनी खूश व्हायला हवे होते. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. ते म्हणाले, ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत

हिंदुत्वाच्या बाबतीत

किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत! ‘‘शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.’’ या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे ‘रामायण’ समजले असे होत नाही. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल.

आपली प्रतिक्रिया द्या