सामना अग्रलेख – संशयाचा धूर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ह्युस्टनमधील दूतावास बंद करून अमेरिकेने चीनला पहिला धक्का दिला आहे. या आदेशानंतर दूतावासात झालेली कागदपत्रांची जाळपोळ आणि इमारतीबाहेर पडलेले धुराचे लोट बरेच काही सांगून जातात. अमेरिकेच्या संशयाचा धूर खरा असल्याशिवाय ही आग लागलेली नाही. दूतावास रिकामा करण्यासाठी चीनकडे आता केवळ 24 तास उरले आहेत. त्यानंतर चीन कसा पलटवार करतो आणि हा संघर्ष किती टोकाला पोहचतो याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. 

अमेरिका आणि चीनमधील संबंध दिवसेंदिवस विकोपाला जात आहेत. उभय देशांत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वाक्‍युद्ध पेटले असतानाच बुधवारी त्यात आणखी ठिणगी पडली. अमेरिकेने ह्युस्टन येथील चिनी दूतावास 72 तासांच्या आत बंद करण्याचा आदेश बजावला. अमेरिका आणि चीन यांच्यातील वितुष्ट आधीच टोकाला गेलेले असताना या ताज्या निर्णयाने दोन्ही देशांत संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तडकाफडकी निघालेल्या या फर्मानामुळे चिनी अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली. कारण ह्युस्टन येथील दूतावास हे काही साधेसुधे पासपोर्टच्या मंजुरीपुरते असलेले कार्यालय अथवा कचेरी नव्हे. महावाणिज्य दूतावास अशी ख्याती असलेले हे ठिकाण आहे. शिवाय चीनचा अमेरिकेतील पहिला दूतावास ही त्याची दुसरी ओळख. मात्र अमेरिकेने एका फटक्यात या दूतावासाला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. चीन आणि अमेरिकेमध्ये जो अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो, वाणिज्य व व्यापारविषयक दस्तऐवजांची जुळवणी, छाननी आणि त्याविषयीचे महत्त्वाचे निर्णय ज्या दूतावासामध्ये होत तोच तातडीने बंद करण्याचे आदेश अमेरिकेने बजावल्यामुळे गोंधळ उडणे साहजिक आहे. तथापि प्रे. ट्रम्प यांची आजवरची एकूण कार्यपद्धती पाहता यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. धक्कातंत्राचा अवलंब आणि चकित करणारे निर्णय हीच ट्रम्प यांची कार्यशैली राहिली आहे. त्यानुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी

ह्युस्टनचा दूतावास

खाली करण्याचे आदेश जारी केले. ‘अमेरिकन नागरिकांची बौद्धिक संपदा आणि खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी हा दूतावास बंद करण्यात यावा,’ असे एका ओळीत चीनला कळविण्यात आले. याचा अर्थ स्पष्ट आहे कारस्थानी चीनचे एकंदर माकडचाळे पाहता हेरगिरी म्हणा किंवा इतर काही अमेरिकाविरोधी कारवायांसाठी या दूतावासाचा वापर चिन्यांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ या थाटात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठा थयथयाट करून ‘आम्हीदेखील या कारवाईचे प्रत्युत्तर देऊ’ असा दम भरला आहे. चीनच्या या नकट्या विरोधाला अमेरिकेने काडीचेही महत्त्व दिले नाही. उलट अमेरिकेतील चीनचे इतरही अतिरिक्त दूतावास बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूतोवाच करून प्रे. ट्रम्प यांनी चीनवर दुसरा बॉम्बगोळा टाकला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर सुरू असलेला हा संघर्ष नवीन नाही. मात्र 2018 च्या ‘ट्रेड वॉर’पासून ते कोरोनाच्या ताज्या संकटापर्यंत उभय देशांतील तणाव शिगेलाच पोहोचताना दिसतो आहे. कोरोनाचे वैश्विक संकट चीननेच जगावर लादले, वुहानच्या प्रयोगशाळेतून हे विषाणू पसरवण्यामागे

चीनचेच षड्यंत्र

होते, असे जाहीर आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनवर केले. चीनने या आरोपाचा इन्कार केलेला असला तरी अमेरिकाच काय, जगातील एकही देश चिनी राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवायला तयार नाही. साम्यवादी अर्थात ‘साम्राज्यवादविरोधी’ हा चीनचा जगाला दाखवायचा चेहरा वेगळा असला तरी प्रत्यक्षात मात्र ‘साम्राज्यविस्तार’ हाच चीनच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा राहिला आहे. हिंदुस्थानसह आपल्या शेजारी असलेल्या तब्बल 23 देशांशी चीनने सीमेवरून भांडण उकरून काढले आहे. आम्ही जगभरात जाऊन धंदा करू, परकीय चलन मिळवू, जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये घुसखोरी करू, पण आमच्या देशात मात्र कोणी व्यापारी लुडबूड करायची नाही! जगानेच आता चिन्यांचा हा कावा ओळखला आहे. ह्युस्टनमधील दूतावास बंद करून अमेरिकेने चीनला पहिला धक्का दिला आहे. या आदेशानंतर दूतावासात झालेली कागदपत्रांची जाळपोळ आणि इमारतीबाहेर पडलेले धुराचे लोट बरेच काही सांगून जातात. अमेरिकेच्या संशयाचा धूर खरा असल्याशिवाय ही आग लागलेली नाही. दूतावास रिकामा करण्यासाठी चीनकडे आता केवळ 24 तास उरले आहेत. त्यानंतर चीन कसा पलटवार करतो आणि हा संघर्ष किती टोकाला पोहोचतो याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे.