सामना प्रभाव – देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा तातडीने सुरू

375
प्रातिनिधिक फोटो

इंटरनेट सुविधा बंद पडल्याने देवरुख बस स्थानकातील आरक्षण सुविधा गेले पाच दिवस बंद होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत सामना ऑनलाईनने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच अवघ्या काही तासात देवरुख बस स्थानकातील इंटरनेट सेवा पूर्ववत करुन आरक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रवासीवर्गाने सामना ऑनलाईनला याबाबत धन्यवाद दिले आहेत.

गणेशोत्सव आटोपून परत जाणाऱ्या भक्तगणांना आरक्षण करता यावे यासाठी गेले पाच दिवस असंख्य प्रवासी दूरदूरहून देवरुख येथे येत होते. मात्र प्रवाशांना दररोज इंटरनेट बंद असल्याने बसचे आरक्षण देता येत नाही. असे उत्तर ऐकावे लागत होते. अखेरीस प्रवाशांनी आपली कैफियत ऑनलाईन सामना जवळ मांडली. याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक मधुकर परब यांनी सामनाच्या वृत्ताची दखल घेतली.

मधुकर परब यांनी रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्या जवळ संपर्क साधला आणि तातडीने देवरुख बस स्थानकातील इंटरनेट सुविधे मधील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. आज दुपारी रत्नागिरी येथून अंतर्गत सेवा देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी सचिन देसाई आपल्या सहकाऱ्यांसह देवरुख येथे आले आणि त्यांनी तांत्रिक अडचणी दूर करुन इंटरनेट सुविधा सुरू करुन दिली. कोविडमुळे गेले चार महिने आरक्षण सुविधा बंद असल्याने अंतर्गत अडचणी निर्माण झाल्या होत्या. देवरुख येथे आता एकाच वेळी दोन कंपन्यांची इंटरनेट सेवा आज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच बरोबर संगमेश्वर, साखरपा बस स्थानकातील इंटरनेट सुविधा देखील पूर्ववत करुन देण्यात आल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या