
>> दिव्या नेरुरकर
Identity Crisis ही अवस्था वयाच्या कुठल्याही वर्षांत होऊ शकते. मात्र त्याची पाळंमुळं ही लहानपणापासूनची असतात. ही एक मानसिक स्वास्थ्याची पायरी म्हणता येईल, ज्यामध्ये समोरच्या परिस्थितीशी सामना करताना आपल्याला स्वतःच्या गुणदोषांची कल्पना येते आणि त्याप्रमाणे आपण स्वतःत बदल घडवू शकतो. पण जर का आपल्याला हे जमलं नाही तर मात्र ‘मी कोण? मला काय आवडतं? मला काय पाहिजे?’ असे गोंधळाचे विचार येऊ शकतात.
रिमा (नाव बदलले आहे) ही एक प्रथितयश वकील. वय साधारण तिशीच्या आतलेच. रिमा एका नामांकित कंपनीत ‘लिगल ऍडव्हायझर’ म्हणून काम करत होती. नुकताच सहा महिन्यांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. पण हे काही तिच्या समुपदेशनाचे कारण नव्हते. अत्यंत विचारपूर्वक तिने हा निर्णय घेतला होता. ‘मला आणि माझ्या नवऱयाला खरंतर लग्नानंतर कळलं की आम्ही एकत्र नाही राहू शकत. तो आणि त्याचे आईवडील पारंपरिक विचारांचे होते. मला त्या वातावरणात राहायला जमत नव्हतं. म्हणून शेवटी आम्ही वेगळे झालो. आता आमच्यात चांगली मैत्री आहे.’
‘मग इथे समुपदेशन घेण्याचे कारण काय?’ असं विचारल्यावर रिमा केविलवाणी हसली. मग बळेबळेच म्हणाली, ‘मी आता पूर्ण गोंधळून गेले आहे आणि टेन्शनमध्येही आहे. माझ्या आईवडिलांना मी अजूनही सांगितलं नाही. आज सहा महिने होतील या गोष्टीला.’
तिच्या बोलण्यातून हळूहळू तिच्या समस्येचा उलगडा होत होता.
रिमाला आईवडिलांना तिच्या घटस्फोटाविषयी न सांगितल्याबद्दल अपराधी वाटत होतं. पण ही गोष्ट न सांगण्याचीही तिच्याकडे कारणं होती. सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे तिचं आणि तिच्या आईचं लहानपणापासूनच पटत नव्हतं. आईला रिमा ही अती बिनधास्त, स्वतःच्या मस्तीत राहणारी आणि चाकोरीत न अडकणारी मुलगी वाटायची. त्यामुळे तीने रिमाला ओरडणं आणि टोमणे यापलीकडे काही बोलणं ठेवलं नाही. पण याउलट तिच्या वडिलांकडून तिला भावनिक आधार मिळाला. तोही कधीकधी. या कारणांमुळे रिमा ही घरी रमलीच नाही. नोकरी लागल्यावर ती स्वतंत्र राहू लागली.
या काळातच तिची आणि रमेश (नाव बदलले आहे) ची भेट झाली. त्या एका भेटीतच दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं. पुढे ही भेट मैत्रीत बदलली. यथावकाश ही मैत्री प्रेमात बदलून लग्नामध्ये परावर्तित झाली. रिमाला लग्नानंतरही बिनधास्त राहायचं होतं. पण, रमेश हासुद्धा पारंपरिक विचारांचा असल्याने काही दिवसांनी दोघांचे खटके उडाले आणि दोघेही वेगळे झाले.
नंतर मात्र ते दोघेही पुन्हा वरचेवर भेटायला लागले. एकत्र सिनेमा, हॉटेलिंग करायला लागले. हे सर्व रिमाला सुरू करायचं नव्हतं. पण ‘मी एकटी आहे. मला कोणीतरी समजून घेणारं हवंय. मग रमेशला भेटायला काय हरकत आहे?’ हे असं काहीसं मनाला समजावून ती त्याला भेटत होती. पण या भेटींनंतर तिचं मन तिला खायचं. कुठेतरी तिला अपराधी वाटायचं. तरीही ती स्वतःला त्या भेटींपासून थांबवत नव्हती.
‘मला रमेश बिलकूल आवडत नाही. तो माझ्या टाईपचा नवरा नाही. पण मी काय करू? मला कोणीतरी हवं आहे जो मला समजू शकेल. मी तशीही कुणाशी बोलत नाही कारण; मी लहानपणापासून बघितलंय की आजूबाजूचे फक्त सल्ले देतात. कशाला हवीत अशी नाती? पण मला कोणीतरी हवंय.’ तिचं बोलणं जरी गोंधळवून टाकणारं होतं तरी त्यात एक आगतिकता होती. तिला काय हवं होतं ते तिला नेमकेपणाने मांडता येत नव्हतं. आणि मनात असलेल्या टोकाच्या गोंधळामुळे रिमाला स्वतःचा मनातला आवाजही ओळखता येत नव्हता.
रिमा ही स्वतःला शोधत होती. Identity Crisis (स्वतःची ओळख शोधण्यात अडथळा येणे) ही तिची अवस्था होती. त्यामुळेच तिला अतिविचार, ताण आणि आत्मविश्वासाची कमतरता या इतर समस्या निर्माण झाल्या होत्या.
Identity Crisis ही अवस्था वयाच्या कुठल्याही वर्षांत होऊ शकते. मात्र त्याची पाळंमुळं ही लहानपणापासूनची असतात. ही एक मानसिक स्वास्थ्याची पायरी म्हणता येईल ज्यामध्ये समोरच्या परिस्थितीशी सामना करताना आपल्याला स्वतःच्या गुणदोषांची कल्पना येते आणि त्याप्रमाणे आपण स्वतःत बदल घडवू शकतो. पण जर का आपल्याला हे जमलं नाही तर मात्र ‘मी कोण? मला काय आवडतं? मला काय पाहिजे?’ असे गोंधळाचे विचार येऊ शकतात.
ही मानसिक समस्या नाही. ही एक मानसिक अवस्था आहे जी आपल्या निकोप मानसिक वाढीसाठी आवश्यक आहे. मात्र जर ह्या अवस्थेला योग्य प्रकारे हाताळले नाही तर मग ताणतणाव, चिंता, राग, नैराश्य अशा मानसिक समस्या उद्भवू शकतात.
रिमाचे असेच काहीसे झाले होते. तिच्या घरच्या बुरसटलेल्या विचारांमुळे आणि त्याचबरोबर बाहेरील जगात वावरल्यामुळे, कधीतरीच तिच्या बिनधास्तपणाला वडिलांकडून मिळणाऱया पाठिंब्यामुळे ती कायम स्वतःच्या मूल्यांबाबत आणि आवडी-निवडीबाबत गोंधळून जात होती. तशात नवराही तशाच विचारांचा भेटल्यामुळे तिने बंडखोर पाऊल तर उचलले. मात्र मुळात संवेदनशील असलेल्या मनाने अजूनच तिला पेचात टाकले. रिमा अशा व्यक्तीबरोबर फिरली होती ज्याने तिची कदर केली नव्हती. हा सगळा गोंधळ आईवडिलांना कळल्यावर त्या दोघांची विशेषतः आई अधिक दुरावेल अशी चिंता तिला होती. त्यात आईने समजून घेतले नाही ही टोचणी तिला होतीच.
या समुपदेशन प्रक्रियेत रिमाला तिच्या ‘स्वत्वाची जाणीव’ करून देणं अत्यंत गरजेचं होतं. तसंच तिला स्वतःच्या मनाचा, इच्छेचा आदर करायला शिकवणं हेही महत्त्वाचं होतं. म्हणूनच सर्वप्रथम तिच्या विचारांचा आणि त्यातून उत्पन्न झालेल्या भावनांचा गुंता सोडवला गेला. तसंच तिला आलेल्या ताणाचे आणि चिंतेचेही व्यवस्थापन करण्यात आले.
या सर्वामध्ये रिमाने स्वतःला आणि आईलाही माफ करणे गरजेचे होते. भूतकाळ विसरून पुढे जाण्यासाठी काही गोष्टी करणे तिच्यासाठी आवश्यक होते.
पहिली गोष्ट म्हणजे, रमेशशी संबंध पूर्णपणे तोडणे आणि आईवडिलांना घटस्फोटाबद्दल सांगणे. यापैकी तिने पहिली गोष्ट यशस्वीरित्या केली आणि त्यानंतर ती अधिकाधिक तणावमुक्त झाली. तिच्या चेहऱयावर पुन्हा हसू फुलले. बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला. मात्र आईवडिलांना तिने समुपदेशकाच्या मदतीने घडलेली घटना सांगितली.
या सगळ्या गोष्टी अवघड होत्या खऱया. पण स्वत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने रिमाने निर्धाराने पाऊल उचलले आणि स्वतःवर काम सुरू केले.
आज रिमाचे आईवडिलांशी नाते मोकळेपणाचे झाले आहे. आईनेही आपल्या मुलीला तिच्या गुणदोषांसकट स्विकारले आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
n [email protected]






















































