अग्रलेख : पाकिस्तानचे प्रधान सेवक

देशाला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले व काटकसरीचे प्रयोग त्यांनी सुरू केले. पाक सरकारचा सगळय़ात जास्त खर्च हा दहशतवादी फॅक्टऱ्याव लष्करावर होतो. हे सर्व नसते उद्योग थांबवले तरी पाकिस्तानची भरभराट सुरू होईल; पण इम्रान खान यांनी दहशतवादी उद्योगांवर एक शब्दही काढलेला नाही. प्रधान सेवकाचा मुखवटा लावून इम्रान खान जे करू पाहात आहेत ते सर्व ढोंग आहे हे पाक जनतेला कळायला वेळ लागणार नाही. इम्रान यांनी हिंदुस्थानच्या विद्यमान राजकारणाचा अभ्यास करावा. नाही तर नवज्योत सिध्दूची शिकवणी लावावी.

पंतप्रधान मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून इम्रान खान यांनी काम करायचे ठरवले आहे. मोदी यांच्याप्रमाणेच इम्रान मियां हे स्वतःला प्रधान सेवक मानू लागले आहेत. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तसे दिसत आहे. पाकिस्तानी जनता गरिबीत दिवस कंठत असताना आपल्याला जनतेच्या पैशावर मजा मारण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती विदारक आहे, असेही ते म्हणाले. ते खरेच आहे, पण पाकिस्तान फक्त आर्थिक संकटात सापडले आहे हा शब्द तोकडा आहे. पाकिस्तान दिवाळखोर आणि भिकारी बनले आहे ही वस्तुस्थिती आहे. कारण पाकिस्तानवर 950 अब्ज इतके परकीय कर्ज असून त्याचे व्याज फेडण्यासाठी नवे कर्ज घ्यावे लागत असल्याची माहिती खुद्द नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतःच आता दिली. पाकिस्तानच्या जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. देशाला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले व काटकसरीचे प्रयोग त्यांनी सुरू केले. खान यांचे हे प्रयोग म्हणजे दात कोरून पैसे जमवण्याचे प्रकार आहेत. इम्रान खान यांनी असे फर्मान काढले आहे की, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सरकारातील वरिष्ठ लोकांनी ‘फर्स्ट क्लास’ विमान प्रवास करू नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरही हीच बंधने लादली आहेत. इम्रान यांनी

सरकारी कामकाजाच्या वेळाही

बदलल्या आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांना जो नोकरचाकरांचा ‘फौजफाटा’ मिळतो त्यासही कात्री लावून फक्त चार-पाच नोकर स्वतःसाठी ठेवले. ते पंतप्रधानांसाठी असलेल्या मोठय़ा निवासस्थानात राहणार नाहीत. पंतप्रधानांच्या ताफ्यात 50-55 गाडय़ा आहेत. त्यातल्या फक्त दोन गाडय़ाच आपण वापरू असे पाक पंतप्रधानांनी जाहीर केले. हे सर्व काटकसरीचे प्रयोग करून 950 अब्ज डॉलर्सचे कर्ज कसे फिटणार व पाकिस्तान आर्थिक संकटातून कसे बाहेर पडणार? हे कुणीच सांगू शकणार नाही. हिंदुस्थानात मोदी यांनी असे प्रयोग केले आहेत, पण त्या प्रयोगांतून त्यांनी स्वतःला वगळले आहे. दिल्लीत आजही बादशाही थाटाचे वातावरण आहे व लोकांवर आर्थिक बंधने लादून ‘सरकार’ म्हणवून घेणारे सर्व थरांतील सेवक उधळपट्टी करीत आहेत. प्रधान सेवक मोदी यांनी मंत्र्यांच्या गाडय़ांवरील लाल दिवे काढले, पण त्यामुळे गाडय़ांचे ताफे व उधळपट्टय़ा कमी झालेल्या नाहीत. पंतप्रधानांसह मंत्र्यांचे परदेश दौरे थाटामाटात सुरू आहेत. नोटाबंदीमुळे जनता रांगेत मेली तरी ‘सरकार’ हवेत उडत राहिले. प्रधान सेवकांच्या थाटामाटात कोणतीही कमतरता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान काटकसरीचा हिंदुस्थानी मार्ग स्वीकारणार असतील तर त्यांचे काही खरे नाही. पाकिस्तानात आजही सरंजामदार, जमीनदार व लष्करशहांचाच वचक आहे. हिंदुस्थानातही असे

नवे वतनदार

निर्माण होत असतात व सरकारला गंडा घालून परदेशात पळून जातात. पंडित नेहरू यांनी स्वातंत्र्य लढय़ासाठी स्वकमाईची संपत्ती देशाला अर्पण केली. घरातील चांदीची भांडीही विकावी लागली. असे आता कोणी करताना दिसत नाही. भ्रष्टाचार थांबविण्याचे प्रयोग सपशेल फसले आहेत. भ्रष्टाचारविरोधी ज्या यंत्रणा निर्माण केल्या गेल्या त्यांचा वापर राजकीय विरोधकांना नमविण्यासाठी केला जात असेल तर कसे व्हायचे? इम्रान खान यांनीही निवडणुकीपूर्वी पाकिस्तानी जनतेला भव्य स्वप्ने विकली आहेत. आपण सत्तेवर येताच पाकिस्तानचे ‘अच्छे दिन’ सुरू होतील असा त्यांचा दावा होता, पण शपथ घेताच त्यांच्या लक्षात आले की, निवडणूक भाषणात जी जुमलेबाजी केली ती प्रत्यक्ष अमलात आणणे कठीण आहे. पाकिस्तानातील मुख्य उद्योग ‘दहशतवादी फॅक्टऱ्या’ हाच आहे. बाकी तिकडे कसले उत्पादन होत असेल असे वाटत नाही. पाक सरकारचा सगळय़ात जास्त खर्च हा ‘दहशतवादी फॅक्टऱ्या’ व लष्करावर होतो. कश्मीर तसेच हिंदुस्थानातील घुसखोर वाढविण्यावर त्यांचे पैसे खर्च होतात व हा ‘सण’देखील ते कर्ज काढून करतात. हे सर्व नसते उद्योग थांबवले तरी पाकिस्तानची भरभराट सुरू होईल. जनतेला दोन वेळची रोटी मिळेल; पण इम्रान खान यांनी दहशतवादी ‘उद्योगां’वर एक शब्दही काढलेला नाही. प्रधान सेवकाचा मुखवटा लावून इम्रान खान जे करू पाहात आहेत ते सर्व ढोंग आहे हे पाक जनतेला कळायला वेळ लागणार नाही. इम्रान यांनी हिंदुस्थानच्या विद्यमान राजकारणाचा अभ्यास करावा. नाही तर नवज्योत सिध्दूची शिकवणी लावावी.