सचिन गुंजाळ नवी मुंबई गुन्हे शाखेचे नवे उपायुक्त

नवी मुंबई पोलीस आयुक्ताल यांतर्गत नव्याने तिसरे (बेलापूर) परिमंडळ स्थापन करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. नव्याने स्थापन केलेल्या बेलापूर २ परिमंडळाचे उपायुक्त म्हणून गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गृहविभागाने सचिन गुंजाळ यांना पाठवले आहे. त्यामुळे नवी मुंबईत गुन्हे शाखेचे उपायुक्त कोण? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नवी मुंबईत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या परिमंडळ २ मध्ये उपायुक्त म्हणून अमित काळे यांना पाठवले असले तरी परिमंडळ १ आणि ३ च्या उपायुक्तांना त्याच जागेवर कायम ठेवण्यात आले आहेत. काळे यांची गुन्हे शाखेतून बदली झाल्यानंतर या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पोलीस मुख्यालयातील एका पोलीस उपायुक्ताचे नावही पुढे येत होते. मात्र गृहविभागाने अमित काळे यांच्या जागेवर सचिन गुंजाळ यांना पाठवले असून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुंजाळ यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार सोपवला आहे.