जॅक!!

67

अदिती सारंगधर,[email protected]

सुप्रिया सचिन पिळगावकरांचा जॅक… जाणीवपूर्वक फॉस्टर केलेला… सचिनजींचा लाडका लेक

‘अगं आलीस तू? बरं झालं लवकर आलीस. मला एक अपॉइंटमेंट आहे ४ वाजता… कशी आहेस गं? खूपच दिवसांनी ना…?’ असं बोलेस्तोवर धावत धावत तो आला. अंगावर उडय़ा मारल्या… खरं तर ज्या वेगात आला मला अत्यंत भीती वाटत होती… पण मग मनसोक्त वेलकम करून झाल्यावर तिकडे कोपऱयात असणारी त्याची बास्केट उपडी झाली आणि एक एक खेळणं माझ्याकडे यायला लागलं… ते टाकायचं आणि हा आपल्याला आणून देणार. असं करत करत मी आणि तो सोफ्यावर जाऊन बसलो… बसलो फायनली… वा वा मज्जा…

इतकं सगळं वर बोललेय… फोटोंमधून ज्या तुम्हाला भेटल्यात. आज त्यांना काही गरजच नाही इंट्रॉडक्शनची… सुप्रिया सचिन पिळगावकर. ज्यांच्या असण्यात आणि हसण्यात असणारी एनर्जी पॉझिटिव्हीटी आजूबाजूचा अख्खा माहोल बदलून टाकते. ‘काय घेशील गं?’ ‘कॉफी’ मी म्हटलं… आणि सोफ्याच्या एका मोठ्ठय़ा भागात आमच्याकडे बघत बसलेला जॅक आणि दुसऱया भागात मी अन् सुप्रियाताई… असा गप्पांचा प्रवास झाला सुरू…

अगं हे (सचिनजी) आणि श्रीया (मुलगी) असते तर आणखी मज्जा आली असती, पण श्रीया बाहेर शूटिंग करतेय आणि हे डबिंगमध्ये आहेत.’ इतक्यात टंपरभर कॉफी आली… गरमागरम…

‘तुमच्याकडे याआधीसुद्धा कुत्रा होता ना…’ मी विचारलं.

‘हो अगं… होबो होता ना… जर्मन शेपर्ड… धडधाकट, धिप्पाड, प्युअर ब्रिड… ते बघ फोटो…’ असं म्हणून एका भिंतीवर लावलेला आठवणींचा सुंदर कोलाज बघितला…

‘होबो माझा पहिला डॉग. मी मोठी झाले तेव्हा आजूबाजूला फॅमिलीमध्ये कधीच डॉग नव्हता. पण कॉलेजमध्ये फ्रेंड्सकडे मात्र होता. ते इतकं बोलायचे की इट युज्ड टू फॅसिनेट मी. कसं काय इतकं डॉगबरोबर नातं असू शकतं? लग्नानंतर यांना मी एकदा फक्त म्हटलं की घेऊया. ते राहून गेलं… मग श्रीया १०-१२ वर्षांची असताना एका फ्रेंडकडे गेल्यावर त्यांच्या डॉगशी खेळल्यावर परत वाटलं हवा बाबा घरी एखादा… पण परत राहून गेलं. पुण्यात असताना एका फ्रेंडनी मला लॅब्राडॉरचं पिल्लू गिफ्ट दिलं. फिमेल लॅब… २ महिन्यांची… अचानक घरी घेऊन आले. पण घरात सगळे घाबरले कुत्रा बघून… काही केल्या घर एकत्र येईना. मग ते पिल्लू उगाच सफर होऊ नये म्हणून परत देऊन टाकलं… आणि तेव्हाच ठरवलं आपला असा एक कुत्रा घरी आणायचाच… कधीतरी.

सोफ्यावरून जॅक उठला आणि खालून भुंकणाऱया त्याच्या मित्रांना जोरात साद घातली. भू… भू… संपेचना… या खिडकीतून त्या खिडकीत… एरियाच्या बाहेरचे कुत्रे आले ना… की खालची कुत्री भुंकतात आणि हा त्यांना साथ देतो. फायनली खिडकीच्या कठडय़ावर जाऊन शांत पडून राहिला जॅक…

‘तर काही वर्षांनी आमच्या घरच्या बाजूचा एक फ्लॅट विकायचा होता. जो आमच्या घराला जॉइंट होण्यासारखा नव्हता. कोणालाही न सांगता, काही फार विचार न करता मी तो घेऊन टाकला. अशा रितीने सेपरेट असणारं, पण सेपरेट नसणारं होबोचं घर आधी आलं. खूप अभ्यास आणि विचार करून जर्मन शेपर्ड घ्यायचं ठरवलं… आणि एका ब्रीडरकडून कुलवंत, जातिवंत असं ३ महिन्यांचं छोटंसं पिल्लू घरी आणलं. पण त्याचा वावर आणि घर बाजूला असल्याने आमची डॉगबरोबरची जर्नी सुरू झाली होती. एकदम वेल ट्रेण्ड डॉग होता. वेल मेन्टेन… खूप एक्सरसाईज्ड… म्हणजे मी सायकलिंग करायचे तेव्हा तो कान्टरींग करायचा.

एकदा सायकलला त्याची लिश बांधली आणि होबोने मला बघितलं आणि धावला तिच्यामागे… मागे मी धडाम… त्यानंतर माझ्यामुळे आईला काहीतरी झालं म्हणून त्याला खूप वाईट वाटलं होतं…’ जॅकसाहेब तिथून उठून आमच्याजवळ येऊन बसले. त्यानंतर बहुतेक कळलं होतं की माझ्यासाठी येऊनही माझ्याविषयी बोललं जातच नाहीय… ‘हो गं हो… याला पण मी असंच चालत घेऊन जाते. मी सायकलवर… लिश माझ्या हातात आणि जॅक चालतो. पण आता मी स्मार्ट मम्मी झालेय. समोरहून काही येताना दिसलं की माझ्या इन्स्ट्रक्शन्स सुरू होतात. दिवसातून दोनवेळा याला खाली घेऊन जावं लागतं. पण पहिल्या बाळानंतर आई कशी सरावलेली असते नेक्स्ट बेबीच्या वेळी… तशी मी आई आहे. जॅकला सग्गळं खायला देतो. मुळातच तो काही स्पेसीफिक ब्रीड नाही. आम्ही ऍडॉप्ट केलंय याला.

तर झालं असं की होबोनंतर घरात कुत्रा नको असं ठरलं होतं… मी खूप विचित्र मानसिक अवस्थेत होते. घरात ना एक पोकळी निर्माण झाली होती. श्रीयालासुद्धा तोवर कुत्र्याची सवय झाली होती. मग आम्ही ठरवलं की डॉग्सना फॉस्टर करायचं… स्वतःचं असं बेबी नाही घ्यायचं. इन डिस्ट्रेसमध्ये असणारी अशी अनेक पिल्लं असतात. त्यांना नीट करायचं आणि ऍडॉप्शनला पाठवायचं. ही सगळी मंडळी त्या होबोच्या घरातच राहायची. पण आपला डॉग आणायला अजून मी तयार नव्हते. जबाबदारीची काळजी नव्हती, पण भावनिक गुंतून राहीन याची भीती होती मनात. श्रीयाने व्हॅगाबॉन्ड नावाचं पेज सुरू केलं होतं ऍडॉप्शनसाठी. त्यावर व्हिडीओज पोस्ट करून टाकायची… आणि एडिट करताना एकदा मी विचारलं ‘आपल्यासाठी कुणी बघितलंय का गं तू?’ त्या व्हिडीओमध्ये दोघंजणं होती. मनात हे पक्कं होतं की डॉग इन डिस्ट्रेस (काहीतरी त्रास असणाराच) ऍडॉप्ट करायचा… ‘दोन आहेत’ श्रीया म्हणाली. एकाला डोळा नाहीय आणि एकाला दोन पाय नाहीयेत… पण ते इतके क्यूट आहेत ना त्यांना कुणीतरी घेणार गं… श्रीया म्हणाली. दरम्यान, ऍडॉप्शन होऊन गेली. तरीही एक चान्स घ्यावा म्हणून तेथे फोन केला. तर तो होता, पण ऍडॉप्शन नव्हती… आणि नेक्स्ट ऍडॉप्शनला शांतपणे होबोची लिश काढली… आणि घेऊन आलो आमच्या जॅकला घरी. एक डोळा गेलेला होता तरी त्याच्याइतकं हॅण्डसम कुणीच दिसत नव्हतं… बहुतेक रस्त्यावर मारामारीत वगैरे तो गेला असावा. कारण अनेक दिवसांनी त्याला कुणीतरी फॉस्टर केलेल्यांनी त्याचा डोळा असणारा फोटो पाठवला…

पण होबो गेल्यानंतरची पोकळी भरून काढायला आमचा जॅक आमच्या आयुष्यात आला. हे माकड नसतं ना… तर हे इतकं मोठ्ठं घर मला खायला उठलं असतं…’ म्हणत त्याचं एक खेळणं उचलून उंच फेकलं सुप्रियाताईंनी… तर वाऱयाच्या वेगानं जात हवेतच ते खेळणं पकडून धावत तो दुसरं खेळणं घेऊन आला… आता तो इतका खूश आहे ना… की बास्स… ‘तू जेवला नाहीयेस? चला चला जेऊया आता…’ करत आत गेल्या. छान चिकन-भात त्याला भरवला… आणि पोटभरीचं समाधान असणारा जॅक आणि संतुष्टीचं समाधान असणारी त्याची त्याची आई पुन्हा येऊन सोफ्यावर बसले.

खायची नाटकं नाहीयेत त्याची. पण मातीमध्ये इतकं लक्ष असतं ना… की जेवतच नाही मग. कधीकधी जबरदस्ती भरवावं लागतं. आम्ही त्याला कुठलंही काहीही शिकवायच्या, सवयी लावायच्या फंदात न पडता त्याच्या पद्धतीने जगू देतो… आणि म्हणूनच जॅक पंजा मारून मला खाजवायला सांगतो. ‘मसाज’ त्याचा अत्यंत लाडका विषय… मानेला खाजवणं थांबलं की पंजा मारून आठवण करून देत होता. त्याच्या ठरलेल्या अशा सवयी घेऊनच ८ महिन्यांचा जॅक घरात आला होता मस्तीखोर… आम्ही सांगितलेलं बिल्कुल न ऐकणारा… सोफ्यावर बसणे, बेडवर झोपणे, स्वतःच्या हाताने न खाणे, होबोला असणाऱयातरी कुठलीच सवय त्याला नव्हती. पण तरीही लाघवी आहे गं आमचं पिल्लू… सनी (निवेदिता सराफचा डॉग) इथे आला होता. प्ले डेटवर. त्याच्याशी पण इतका मस्त खेळला हा… इकडून धाव तिकडून धाव, हे खेळणं घे ते खेळणं फेक… विचारू नकोस.

या घरात एक डॉग डोअर पण मुद्दाम करून घेतलंय. की येणाऱयाला डॉगची भीती असेल तर डायरेक्ट हॉलमध्ये जाता येईल… आणि कुठलंही बंधन न घालता जॅकच्या स्वातंत्र्यावरही गदा येणार नाही. गप्पा मारता मारता ३.३० झाले होते. ‘खरं तर हा यांचा जास्त लाडका आहे… आणि हे त्याचे… कारण हे रात्री उशिरा येतात तेव्हा फक्त दोघंच जागे असतात. मग पोटभर मसाज करवून घेणे आणि मनसोक्त मसाज देणे असा हा कार्यक्रम सुरू असतो बाप-लेकाचा…

माझा हात आता थांबला होता. तर बाजूला बसलेला जॅक जवळजवळ येऊन चिकटून बसला मला. मग छानसी पप्पी घेतली जॅकची. खूप खूप खूप लाड केले… आणि बाजूला असलेलं त्याचं खेळणं जसं उचललं तसं चटकन उडी मारली आणि चार्ज-इन करायला लागला. त्याला हुलकावत ते जसं फेकलं तसं धूम… ते गेलं रूममध्ये आणि रूमचा दरवाजा झाला बंद… मी उघडायला गेले तर इतक्यात तोंडात खेळणं आणि एका पायाने दरवाजा उघडून साहेब बाहेर आले आणि पुन्हा खेळायला सज्ज…

होबो माझ्या मांडीत माझ्यासमोर मला सोडून गेला… पण आज जॅक आल्यावर असं नक्की वाटतं की एव्हरी डॉग हॅज अ परपज. (प्रत्येक कुत्रा तुमच्याकडे येण्याचं एक कारण असतो.) जॅकला त्याचं आणि आम्हाला आमचं कारण सापडलं.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या