
क्रिकेटच्या मैदानावर असंख्य दिग्गज क्रिकेटपटू घडवणारे, शिस्त, संस्कार आणि संघर्ष यांचे धडे गिरवणारे गुरू रमाकांत आचरेकर आयुष्याच्या मैदानातून एक्झिट घेऊन आठ वर्षे उलटली आहेत. मात्र त्यांचा आवाज, त्यांच्या डोळ्यातील स्वप्नं आणि बोट धरून मैदानावर नेणारी ती दृष्टी आजही त्यांच्या असंख्य शिष्यांच्या हृदयात अखंड सजीव आहे. गुरू गेलेत, पण त्यांची शिकवण आजही प्रत्येक बॅटच्या फटक्यात, प्रत्येक धावेत आणि प्रत्येक विजयाच्या क्षणात जिवंत आहे. गुरूंना जग विसरू शकतं, पण शिष्य नाही. आचरेकरांच्या आठवणी अमर आहेत आणि त्या काळाच्या पडद्यामागे हरवल्या नाहीत, तर नव्या पिढीच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. हेच चित्र आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दिसले.
‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकरांच्या 93 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क, गेट क्रमांक 5 येथील त्यांच्या स्मारकाजवळ लहानथोर शिष्य, क्रिकेटप्रेमी आणि भावी खेळाडू मोठय़ा श्रद्धेने एकत्र जमले. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. पण हा केवळ औपचारिक सोहळा नव्हता, तो गुरूंच्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक क्षण होता; जिथे डोळ्यांत पाणी होते आणि मनात कृतज्ञतेची शाल पांघरलेली होती. यापूर्वी गुरुपौर्णिमेनिमित्तही आचरेकरांना दिग्गज शिष्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली होती. आजच्या कार्यक्रमास आचरेकरांच्या कन्या विशाखा दळवी, रुपाली मयेकर यांच्यासह मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिव नीलेश भोसले, कोषाध्यक्ष अरमान मलिक, कार्यकारिणी सदस्य नदीम मेमन, शिवाजी पार्क जिमखान्याचे सुनील रामचंद्रन यांची उपस्थिती होती.



























































