
अब्जावधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर विराजमान होणार आहे. सचिनच्या सुवर्ण महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधत मुंबई क्रिकेट संघटनेने त्याला आगळीवेगळी मूर्तिमंत भेट देणार असल्याचे आज जाहीर केले.
सचिनने आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण ज्या मैदानावर साजरे केले त्याच वानखेडे स्टेडियमवर सचिनचे पहिले पाऊल पडले होते आणि त्याच स्टेडियमवर तो निवृत्त झाला. आता निवृत्तीनंतर दहा वर्षांनी एमसीए त्याचा आगळावेगळा सन्मान करणार आहे. सचिनच्या आवडत्या मुद्रेतला पुतळा सचिनच्या आवडत्या जागेवरच थाटात कायमस्वरूपी उभा केला जाणार आहे. सचिनच्या या पुतळय़ाचे अनावरण त्याच्या पन्नासाव्या जन्मदिनी म्हणजेच 24 एप्रिलला किंवा आगामी विश्वचषक स्पर्धेदरम्यान केले जाण्याची शक्यता आहे. आज खुद्द सचिन आपल्या पत्नी अंजलीसह वानखेडेवर आला आणि त्याने आपल्या पुतळय़ासाठी योग्य असलेली जागा निवडली.
एक सुखद भेट – सचिन
माझ्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मिळालेली ही एक सुखद भेट आहे. मला याबाबत कसलीच कल्पना नव्हती आणि मी पुतळय़ाबाबत ऐकून हैराण आहे. माझ्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ याच मैदानावर झाला आणि याच मैदानाने कधीही न विसरता येतील, अशा संस्मरणीय आठवणी दिल्या. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण 2011 साली मी याच मैदानावर अनुभवलेत, जेव्हा हिंदुस्थान जगज्जेता झाला. माझे गुरू रमाकांत आचरेकर सरांनी याच मैदानावर माझ्या मनात क्रिकेटविषयी आवड आणि आत्मीयता निर्माण केली. त्यामुळेच मी माझे सर्वस्व क्रिकेटसाठी वेचू शकलो.
वानखेडेवर पहिलाच पुतळा
वानखेडेवर आतापर्यंत अनेकांच्या नावांचे स्टॅण्ड आहेत. यात सचिनचेही नाव आहे, मात्र पुतळा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदुस्थानात खेळाडूंची फार पुतळे अद्याप बनविण्यात आलेले नाहीत. केवळ माजी कसोटीपटू सी. के. नायडू यांचे विदर्भ, आंध्र आणि इंदूर येथील स्टेडियमवर पुतळे लावण्यात आले आहेत. स्टेडियमवर पुतळे नसले तरी अनेक मेणाच्या संग्रहालयात अनेक क्रिकेटपटूंचे पुतळे आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच विंडीजमध्ये स्टेडियमवर क्रिकेटपटूंचे पुतळे विराजमान आहेत.




























































