राहुल गांधी यांना देशातून बाहेर काढलं पाहिजे, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या भोपाळ इथल्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधी यांना देशातून बाहेर काढलं पाहिजे, असं विधान साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी लंडन येथील हाऊस ऑफ पार्लमेंट परिसरात ब्रिटीश खासदारांसमोर एक भाषण केलं होतं. त्यात त्यांना दिलेला मायक्रोफोन हा खराब असल्याचं दिसून आलं होतं. त्यावेळी त्यांनी आमचे माईक खराब नाहीत, ते नीट सुरू आहेत. फक्त त्यांना सुरू करण्यात आलेलं नाही. कारण, तुम्ही ते करू शकत नाही. कारण, मी जेव्हा संसदेत बोलतो तेव्हा असं अनेकदा होतं, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

त्याला प्रत्युत्तर देताना साध्वी प्रज्ञा यांनी टीका केली. साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, संसदेत चांगलं काम होत आहे. सगळं काही चांगलं आहे. पण, काँग्रेसचे लोक सरकार चालवू देत नाहीत. त्यांचा असा प्रयत्न आहे की जर यांच्याकडून संसदेचं काम सुरू राहिलं तर जास्त कामं होतील आणि आमचं अस्तित्वच उरणार नाही. त्यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, पण त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. तुम्ही (राहुल गांधी) आपल्या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेने निवडलं आहे, तुम्ही देशाचा अपमान करत आहात, अशी टीका साध्वी प्रज्ञा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या की, तुम्ही हिंदुस्थानचे नाहीत, हे मानलं आम्ही कारण तुमची आई इटलीची आहे. हे आम्ही नाही चाणक्याने सांगितलं आहे की, परदेशी महिलेपासून जन्मलेला मुलगा कधीच देशभक्त असू शकत नाही. हे राहुल गांधी यांनी निश्चित केलं आहे. राहुल परदेशात सांगतात की आम्हाला संसदेत बोलायची संधी दिली जात नाही. यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट असू शकत नाही. मी राहुल गांधी यांचा निषेध करते, त्यांना देशातून बाहेर काढलं पाहिजे, असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे.