
सामना ऑनलाईन । भोपाळ
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रज्ञा ठाकूर हे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भोपाळमधून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. भोपाळ हा भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे यंदा काँग्रेसने या मतदारसंघातून ज्येष्ठनेते दिग्विजय सिंह यांना तिकीट दिले आहे. साध्वी प्रज्ञा व दिग्विजय सिंह यांना एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाते. त्यामुळे जर हे दोघे एकमेकांविरोधात लढले तर ही लढत नक्कीच रंगतदार होणार आहे.




























































