केशरचे शरीराला कोणते फायदे होतात?

केशर हे जगातील दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे. खाद्यपदार्थांना रुचकर करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून केशराचा वापर केला जातो. हिंदुस्थानात जम्मू आणि काश्मिरमध्ये केशराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी केशर हे उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे.

केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं. केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतात. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशराचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं.

मात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. शिवाय ते सौंदर्यवर्धकही आहे. खाद्य संस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. नैवेद्य शुद्ध करण्यासाठी त्यात आवर्जून केशर वापरलं जातं. शिवाय केशरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, फॉलिक ऍसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअम असते. अनेक पोषक तत्वांमुळे अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच केशर उपयुक्त असते. त्वचेच्या स्वास्थासाठी प्राचिन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केशराचा वापर करण्यात येतो.

हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो. कोणताही गोड पदार्थ केशराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खीर, बिर्याणी, लस्सी, मसाले दूध, मोदक, रसमलाई अशा अनेक पदार्थांची सजावट केशराने केली जाते.

केशरामुळे स्मरणशक्ती वाढते. शिवाय वयोमानानुसार वृद्धांमध्ये होणाऱ्या अल्झायमर आणि विस्मरणाच्या समस्येला दूर करण्यासाठी वृद्धांनादेखील केशराचा चांगला फायदा होऊ शकतो. केशरामुळे पचनाच्या कार्यात चांगली सुधारणा होऊ शकते. ज्यांना पोट दुखणे, ऍसिडिटी, अल्सर अथवा पचनासंबधित अन्य समस्या असतील त्यांनी नियमित केशराचा वापर करावा. शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना केशराचे दूध प्या, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप मिळू शकेल.

मात्र लक्षात ठेवा केशर उष्ण गुणधर्मीय असल्याने स्वयंपाकात दररोज केशराचा वापर करू नका. कधीतरी केशराचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. केशरामुळे खाद्यपदार्थ आणखी स्वादिष्ट होतात.

केशराचा अती वापर मात्र घातक ठरू शकतो. गरोदरपणी केशर घेणे चुकीचे जरी नसले, तरी त्याचा अती वापर केल्यास गरोदर स्त्रीला त्रास होऊ शकतो. शिवाय बाळंतपणानंतर स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील केशर देऊ नये. केशराच्या अती वापरामुळे गर्भाशय संकुचित होते. गरोदर महिलांचे यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही अती प्रमाणात केशराचा वापर आहारात केला, तर तुमची त्वचा पिवळसर दिसू लागते. जर तुमचे डोळे आणि त्वचा पिवळी दिसत असेल तर तुम्हाला काविळ झाली आहे, असे निदान करण्यात येते. मात्र जर तुम्हाला केशराची ऍलर्जी असेल तरीदेखील तुमची त्वचा पिवळी दिसू लागते. त्यामुळे केशराचा वापर करताना सावध रहा. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राजेंद्र म्हात्रे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या