स्वतः Sai Baba पालखीसोबत चालत असल्याचा भास होतो; शिर्डीला निघालेल्या भाविकांनी सांगितले थक्क करणारे अनुभव

 

रामनवमीचा उत्सव जवळ येताच मुंबईत साईभक्तांना पालखी पदयात्रेचे वेध लागतात. यामुळेच आता मुंबईतून मनाच्या साई पालख्या शिर्डीकडे रवाना झाल्या आहेत. डोक्यावर हॅट आणि पांढरे कपडे परिधान करून हजारो साई भक्त या पदयात्रेत सहभागी होतात. मार्च व एप्रिल महिन्यात मुंबई ते शिर्डी दरम्यान नाशिक मार्गावर रस्त्यावरून चालणारे हे साईभक्त सहज नजरेस पडतात.

गेली अनेक वर्षे हि पदयात्रेची परंपरा चालत आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे या परंपरेत खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा या पदयात्रा सुरु झाल्याने साई भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.

मुंबईतील मनाच्या पालख्या

साईलीला मंडळ – लालबाग, साई सेवक मंडळ – दादर, साईछाया मंडळ – परळ, श्रद्धा सबुरी सेवा मंडळ – लोअर परळ, साई विठ्ठला – माहीम, साई नंदादीप – जोगेश्वरी या मुंबईतील मनाच्या पालख्या दरवर्षी शिर्डीकडे रवाना होतात.

साईलीला मंडळ पालखी लालबाग, रामचंद्र खाटपे (सल्लागार) – आमच्या पालखीची सुरुवात १९८६ साला पासून झाली. साई बाबांच्या कार्याचा प्रसार करणे आणि तरुणांना योग्य मार्गाला लावणे या उद्देशाने या पालखीची सुरुवात करण्यात आली होती. पदयात्रेवेळी विविध प्रकारे समाजप्रबोधन करण्यात येते. त्याचप्रमाणे तरुणांना साईबाबांची शिकवण शिकविण्यात येते. ज्याप्रमाणे पंढरीच्या वारीला गाव खेड्यातील वारकरी शिस्तीत सहभागी होतो. त्याच शिस्तीत साई पालखी मधील पदयात्री या साई वारीत सहभागी होतो. वारकऱ्यांचा आदर्श साई पालखीच्या पदयात्रेत ठेवला जातो. या पदयात्रेदरम्यान रस्त्यात विविध ठिकाणी शाळांमध्ये उपयोगी वस्तू वाटण्यात येतात. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते.

मुंबई ते शिर्डी हे २९० किमी अंतर आहे. पदयात्रेदरम्यान दररोज ३० किलोमीटर अंतर पार केले जाते. शिर्डीला जाताना वाटेत श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये दर्शन घेतले जाते. त्यानंतर तेथील गंगा डोक्यावर घेऊन पालखी शिर्डीकडे मार्गस्थ होते. १० दिवसांनी हि पालखी शिर्डीला पोहोचते. अनेक ठिकाणी हि पालखी मुक्कामाला असते.

पालखी पदयात्रा आयोजीत करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. आमच्या पालखी मध्ये सुमारे ३ हजार लोक चालतात. या पदयात्रींचे जेवण अल्पोपहार चहा तसेच सोबत डॉक्टर मेडिकल किट याचा खर्च भागविण्यासाठी पदयात्रींकडून नाममात्र शुल्क आकारले जाते. बाकी अनेक साई भक्तांकडून पैशांच्या स्वरूपात तसेच अन्न धान्याच्या स्वरूपात मदत होते. गोरगरिबांसाठी या पालखीची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्याकडे पैसे नसले तरी त्याला पदयात्रेत सहभागी होता येते.

ज्या घरात पालखी थांबली त्या घराचा उद्धार झाला

खाटपे सांगतात कि मी स्वतः २९ वर्षे पालखी मध्ये चालत आहे. त्यामुळे मला या पालखी मध्ये अनेक चांगले अनुभव आले आहेत. साई बाबांची निस्वार्थपणे सेवा केल्यावर बाबा आपल्याला फळ देतातच. पालखी मार्गात ज्या ज्या घरात पालखी थांबते त्या घराचा उद्धार झाला आहे. एखाद्या झोपडीत पालखी थांबल्यावर पुढील दोन वर्षात त्या झोपडीच्या बांगला झालेला आम्ही पहिला आहे. म्हणूनच प्रत्येकाला या पदयात्रेत सहभागी होण्याची इच्छा होते.

साई सेवक मंडळ दादर, अशोक देसाई (सेक्रेटरी) – १९८१ पासून आमच्या पालखीची सुरुवात झाली. त्यावेळी साई बाबांच्या श्रद्धेपोटी अनेक साई भक्त एकट्याने शिर्डीला चालत जायचे. ते पाहून शिर्डी येथील शिंदे नावाच्या सुरक्षारक्षकाने लेंडीबाग येथे या पदयात्रा करणाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील पदयात्रींना एकत्र चालत येण्याचे व पालखी घेऊन येण्याचे आवाहन केले. त्यांचे हे विचार सर्वांना पटले व १९८१ साली अवघ्या ४३ जणांमध्ये दादर येथून साई सेवक मंडळाची पहिली पदयात्रा निघाली. यंदाचे मंडळाचे ४२ वे वर्ष असून या पालखीत सुमारे ८ हजार पदयात्री चालतात.

तरुणांना एकत्रित करून त्यांना भक्ती मार्गाला लावणे, बाबांची शिकवण देऊन त्यांना व्यसनाधीनतेपासून लांब ठेवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. पदयात्रेच्यावेळी दरदिवशी सकाळी ५ वाजता आरती होते. व निशाण पुढे निघते. या निशाणाच्या पुढे पदयात्री जात नाहीत. पदयात्रेत सहभागी झाल्यावर कुठेही न रेंगाळता, थट्टा मस्करी न करता कोणतेही व्यसन न करता केवळ साई नामाचा जप करत चालत राहावे लागते.

साईबाबांची कृपा असल्याने या सर्व गोष्टींचे नियोजन जुळून येते. सदस्यांकडून ९ दिवसांच्या पदयात्रेचे केवळ ५०० रुपये आकारले जातात. अनेक जणांकडून दान देखील मिळते. यामुळे संपूर्ण पदयात्रेच्या खर्चाचे नियोजन होऊन जाते.

साईबाबांमुळे संकट टळले

पदयात्रेदरम्यान अनेकदा विविध चमत्कारिक अनुभव देखील येतात. जणू साई बाबा स्वतः पालखी सोबत असल्याचा आम्हाला अनेकदा भास होतो. एके वर्षी पदयात्रा शिर्डीकडे निघाली असताना वाटेत जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे जनरेटरमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. आता जनरेटरचा स्फोट होणार या भीतीने कोणाचीच त्या जनरेटर जवळ जाऊन तो बंद करण्याची हिम्मत होत नव्हती. मात्र मी हिम्मत करून तो जनरेटर बंद केला. यावेळी जनरेटर आगीच्या गोळ्याप्रमाणे लाल झाला होता. जनरेटर बंद करून मागे वळालो तोच मला साईबाबांचा फोटो काच तुटलेल्या अवस्थेत आढळला. आमच्यावर येणारे संकट साई बाबांनी स्वतःवर घेतले होते. हा चमत्कार पाहून आम्ही सगळे थक्क झालो होतो.