संत बाबा संतोकसिंघ यांच्या मारेकऱ्य़ांना पंजाब पोलिसांनी घातले कंठस्नान घातले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

नांदेड शहरातील नगिनाघाट परिसरात असलेल्या  भागात संत बाबा  संतोकसिंघ यांचा अज्ञात मारेकऱ्य़ांनी 11 मार्च रोजी दोघांनी निर्घृण खून केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. पंजाब पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंठस्नान घालून त्यांना यमसदनी पाठविले आहे.

नांदेड शहरात नगिनाघाट भागात  गुरुद्वारा लंगर साहिबच्या पाठीमागे जत्थेदार संत बाबा संतोकसिंघ मोहनसिंघ नहेंग यांचा गुरुद्वारा आहे. संत बाबा  संतोकसिंघ हे झोपले असतांना 11 मार्च रोजी पहाटे तीन वाजता त्यांचा खून करण्यात आला. त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह बघितल्यानंतर गुरमितसिंघ उर्फ बादल देवेंद्रसिंघ महाजन यांनी लगेच पोलिसांना ही बाब कळविली.

11 मार्च रोजी ही घटना भल्या पहाटे घडल्यानंतर यातील दोन्ही आरोपी पळून गेले होते. ते पंजाबात गेल्याची माहिती नांदेड पोलिसांना मिळाली होती. या घटनेसंदर्भात वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबत पंजाब पोलिसांशी संपर्क साधून सदरचे आरोपी आपल्या भागात आले असल्याची माहिती पुरविली होती.

21 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी याबाबत गस्त घालून आरोपी गुरदेवसिंघ खालसा (73) रा.गंडा कॉलनी तरणतारण रोड अमृतसर आणि मेहताबसिंघ उर्फ नरेंद्रसिंघ खंडेवाला बाबा रा.तरणतारण पंजाब हे दोघेही तरणतारण जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजबिरसिंघ (अमृतसर) यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा पंजाबी भाषेत आडे सो झेडो अर्थात आडवा येईल त्यास खतम करुन असे आवाहन पोलिसांना या मारेकऱ्य़ांनी दिले.

यावेळी पोलिसांशी झटापट झाल्यानंतर या दोन्ही आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस उपअधीक्षक राजबिरसिंघ आणि पोलीस निरीक्षक बलविंदरसिंघ व पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंघ हे तिघे जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांना आडवे पाडले व आणि कंठस्नान घातले.

या दोघांचाही या खुनाशी थेट संबंध असल्याने संत बाबा संतोकसिंघ यांचा खून करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले. जखमी पोलीस अधिकाऱ्य़ांना अमृतसर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत भिखीखंड (पंजाब) येथील पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपीविरुध्द कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी ही माहिती दिली असून, पंजाब पोलिसांनी  शिताफीने पकडलेल्या व त्यांना यमसदनी पाठविलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे.