12 वीच्या परीक्षेत आर्ची पास, इंग्लिशमध्ये गाडी घसरली मात्र टक्केवारी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

‘मराठीत सांगितलेलं कळतं नाय का. इंग्लिशमध्ये सांगू का’, असा गावरान ठसक्यात डायलॉग मारणारी ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची 12 वीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवून पास झालीय. पण इंग्लिशचा रूबाब झाडणाऱ्या आर्चिला इंग्लिशमध्ये मात्र इतर विषयाच्या तुलनेने फारच कमी मार्क मिळाले आहेत..

रिंकू 9 मध्ये असताना चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ या मराठी चित्रपटासाठी तिची अभिनेत्री म्हणून निवड केली.या चित्रपटाचे दोन वर्षे शूटिंग सुरु होते. या दरम्यान रिंकूची 10 वीची परीक्षा झाली. शूटिंगच्या धावपळीत अभ्यास करुन तिने 10 वीच्या परीक्षेत 66.40 टक्के मार्क मिळविले होते. तेंव्हा इंग्लिशमध्ये तिला 59 मार्क पडले होते.

12 वी च्या परीक्षेत आर्चीला 10 वीच्या परीक्षेपेक्षा अधिक मार्क अपेक्षित होते. कारण गेल्या दोन वर्षांत आर्चीची उठबस ही इंग्लिश आणि हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये अधिक वाढली आहे. मात्र 12 वीच्या परीक्षेत रिंकुला इंग्लिशमध्ये 54 मार्क मिळाले आहेत. इंग्लिशमध्ये कमी असले तरी दहावीच्या तुलनेत टक्केवारीत मात्र तिने 16 टक्क्यांची वाढ केली आहे.