
साईभक्तांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी दर्शनपास काढावा लागत होता. परंतु, आता एक एप्रिलपासून श्रींचे थेट दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे दर्शनपास काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची सुटका होणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या कडक नियमावलीनंतर आता शिर्डीत होणारा रामनवमी उत्सव पांरपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे साई संस्थानचे अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
शिर्डी येथील साई अतिथी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड. जगदीश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, सचिन गुजर, अविनाश दंडवते, सुहास आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कोविडमुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सत्यनारायण, अभिषेक पूजा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. मंदिर परिसरातील बॅरिकेड्स हटविण्यात येतील, मंदिर परिसरातील ग्रामदैवतांचे दर्शन व द्वारावती भक्तनिवासच्या समोरचा बगीचा खुला करण्यात येणार आहे. भक्तांना दर्शनरांगेतून जाण्यासाठीचे बायोमेट्रिक पास बंद करण्यात येणार असले तरी झटपट व व्हीआयपी दर्शन पासेस सुरू राहणार आहेत.
लाडू स्पर्धेचे आयोजन
भाविकांना दिला जाणारा लाडूचा प्रसाद हा उत्तम दर्जाचा मिळावा, यासाठी चविष्ट लाडू स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये उत्तम लाडू बनविणाऱयांना लाडू प्रसाद बनविण्याचे काम दिले जाणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.


























































