
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱया महापालिका कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा 100 टक्के वापर व्हावा, त्याचप्रमाणे महापालिकेचा व्यवहार जास्तीत जास्त सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी महापालिका कर्मचाऱयांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिपत्रकान्वये मुंबई महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱयांनी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असून त्याप्रमाणे संबंधित आस्थापनांना लेखी स्वरूपात कळविलेले आहे, परंतु संबंधित कर्मचाऱयांना सदर वेतनवाढ आजपर्यंत देण्यात आलेली नाही. याविषयी अनेक कर्मचारी संघटना तसेच कर्मचाऱयांनी आमदार सुनील प्रभू यांची भेट घेतली होती.
या पार्श्वभूमीवर सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापर्यंत उपरोक्त अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत महापालिकेने 2018 रोजी ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार पूर्वअनुमतीने मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱया कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात याव्यात. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता कर्मचाऱयांनी वेळ व पैसा खर्च केला असून काम आणि घरच्या जबाबदाऱया सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेच्या ठराव क्रमांक 1165 ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, तर या महत्त्वाच्या विषयाची तपासणी करून येत्या आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल व तीन महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू उपस्थित होते.
























































